सोलापूर : किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच ‘केसीसी’ योजनेतून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी कर्ज दिले जाते. ‘केसीसी’साठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात. यामध्ये स्वत:च्या मालकीची जमीन असणारे, इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो. याशिवाय २०१८-१९च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पशुपालन (शेळीपालन, मेंढीपालन कुक्कुटपालन) आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाचाही योजनेत समावेश केला आहे. कर्ज नाकारणाऱ्या बॅंकेविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते.
KCC साठी अर्ज कसा करायचा?
सरकारने पीएम-किसान योजनेच्या वेबसाइटवरच किसान क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज ऑनलाइन उपलब्ध असून तो अर्ज डाऊनलोड करण्यासाठी गुगलवर ‘पीएम-किसान’ टाइप करा. त्यानंतर पंतप्रधान किसान सन्मान निधीची वेबसाइट ओपन होईल. त्यावर उजव्या कोपऱ्यात डाऊनलोड केसीसी फॉर्म हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास अर्ज ओपन होईल. त्यातील माहिती भरून अर्ज सबमिट करावा, काही दिवसांनी आपल्याला ‘केसीसी’ मिळेल. किसान क्रेडिट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया नि:शुल्क आहे. तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी कोणतेही शुल्क आकारू नये, असे आदेश इंडियन बँक असोसिएशनने दिले आहेत. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना ‘सीएससी’ किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जावे लागते.
कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करताना...
- अर्ज भरताना अर्जातील ‘ए’ भागासमोर ‘फॉर ऑफिस यूझ’ लिहिलेले असून त्यातील माहिती बँक भरेल. शेतकऱ्यांनी यात काहीही माहिती भरायची गरज नाही.
- ‘बी’ भागात तुम्हाला कोणते ‘केसीसी’ हवे (नवीन की जुने केसीसी, कर्ज मर्यादा वाढवायची, केसीसी बंद पडल्याने पुन्हा सुरू करणे) याची माहिती भरावी. त्याखाली किती रुपयांचे कर्ज हवे ते नमूद करावे.
- ‘सी’ भागात अर्जदाराचे नाव, पीएम-किसान सन्मान योजनेचे पैसे ज्या बँक खात्यात जमा होतात, तो खाते क्रमांक आणि तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेअंतर्गत इन्शुरन्स घ्यावयाचा असल्यास त्यासमोरच्या ‘येस’ म्हणावे.
- ‘डी’ रकान्यात आपल्याकडील कर्जाची माहिती द्यावी. कोणत्या बँकेकडून कर्ज घेतले, शाखेचे नाव, किती कर्ज शिल्लक किंवा थकबाकी किती हे टाकावे.
- ‘ई’ रकान्यात जमिनीबद्दल माहिती द्यायची आहे. गाव, सर्वे किंवा गट क्रमांक, जमीन मालकीची आहे की भाडेतत्वाची की सामाईक मालकीची आहे, तो पर्याय टीक करवा. पुढे किती एकर शेतजमीन आहे आणि खरीप, रब्बी आणि इतर कोणती पिके घेतात, याची माहिती भरा.
- ‘एफ’ रकाना मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. यात तुमच्याकडे एकूण दूध देणारे प्राणी, शेळ्या आणि मेंढ्या, वराह, कोंबड्या किती आहेत, याची माहिती द्यायची आहे. कर्जापोटी सिक्युरिटी म्हणून काय मालमत्ता देणार हे भरून सगळ्यात शेवटी सही करायची आहे.
- अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून बँकेत द्यावी. त्यासोबत सातबारा आणि आठ-अ, दुसऱ्या बँकेतून कर्ज न घेतल्याचे शपथपत्र, आधार व पॅन कार्ड आणि तीन पासपोर्ट साईज फोटो देखील द्यावेत. कागदपत्रे बँकेत जमा केल्यावर दोन आठवड्यात तुमच्या पत्त्यावर बँकेने कार्ड पाठवायला हवे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
केसीसीतून कर्ज किती मिळते?
केसीसीअंतर्गत शेतकऱ्याला किती कर्ज द्यायचे, त्या शेतकऱ्याचे उत्पन्न किती, त्याच्याकडे जमीन किती आणि लागवडीखालील क्षेत्र किती, यावरून ठरते. केसीसीअंतर्गत शेतकऱ्याला तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. केसीसीवरून मिळालेल्या कर्जाला ७ टक्के व्याजदर आकारला जातो. पण, शेतकरी कर्जाची परतफेड वर्षभरात करणार असेल, तर व्याजदरात ३ टक्के सवलत मिळते. शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करणे अपेक्षित आहे. किसान क्रेडिट कार्डअंतर्गत लोन घेतलेल्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आल्यास ५० हजारांचे विमा संरक्षण मिळते. इतर धोक्यांसाठी २५ हजारांचे विमा संरक्षण आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.