महाराष्ट्र बातम्या

Shivrajyabhishek 2023 : अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या इंग्रजांनी रायगडावर येऊन शिवरायांना मुजरा केला, हे राज्याभिषेकाने झाले

शिवराज्याभिषेक ही भारतीय इतिहासातील क्रांतिकारक घटना आहे. मध्ययुगात एतद्येशीयांनी राज्याभिषेक करणे, राजा होणे, राज्य करणे हे कल्पनेच्या पलीकडे होते.

डॉ. श्रीमंत कोकाटे

शिवराज्याभिषेक ही भारतीय इतिहासातील क्रांतिकारक घटना आहे. मध्ययुगात एतद्येशीयांनी राज्याभिषेक करणे, राजा होणे, राज्य करणे हे कल्पनेच्या पलीकडे होते. कोणत्यातरी शाहीच्या हाताखाली चाकरी करणे, वतन मिळविणे, जहागिरी सांभाळणे, मनसबीत धन्यता मानणे या वर्तुळापलीकडे कोणाची झेप नव्हती.

अनेक पराक्रमी सरदार हे मोगल, निजाम, आदिलशहा यांच्या सेवेतच समाधान मानत होते. आपला जन्म केवळ दुसऱ्याची चाकरी करण्यासाठी झाला आहे, असा दृढ समज भारतीयांमध्ये झालेला होता. पराक्रम गाजवायचा, रक्त सांडायचे पण ते दुसऱ्याच्या सत्तेसाठी, अशा गुलामीचे जीवन एतद्देशीय जगात होते, या गुलामीला तिलांजली देण्याचे ऐतिहासिक कार्य छत्रपती शिवाजीराजांनी केले.

आपणदेखील लढू शकतो, आपणही जिंकू शकतो आणि आपणही उत्तम प्रकारे राज्यकारभार करू शकतो, ही जाज्वल्य प्रेरणा छत्रपती शिवाजीराजांनी रयतेच्या मनात निर्माण केली. याला मूर्त स्वरूप आले ६ जून १६७४ रोजी! या दिवशी छत्रपती शिवाजी राजेंनी रायगडावर राज्याभिषेक केला. या घटनेचे वर्णन समकालीन कृष्णाजी अनंत सभासदांनी अत्यंत रसभरीतपणे केलेले आहे. वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट यांनी पौरोहित्य केले. शिवाजीराजे ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर बसले. असंख्य लोक रायगडावर आले होते.

राज्याभिषेकासाठी सुमारे एक कोटी बेचाळीस लक्ष रुपये इतका खर्च आला, असे प्रदीर्घ वर्णन सभासदांनी केलेले आहे. शेवटी सभासद म्हणतात ‘या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. हा मराठा पातशः एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.’ आताच्या अफगाणिस्तानपासून ते बांगलादेशपर्यंत आणि नेपाळपासून तमिळनाडूपर्यंत मोगल बादशाह औरंगजेब, आदिलशहा, कुतुबशाचे राज्य होते.

औरंगजेबाचा वार्षिक महसूल सुमारे ५० लक्ष रुपये होता, तर शिवाजीराजांचा महसूल जेमतेम एक लक्ष रुपये होता. औरंगजेबाचे सैन्य सुमारे सात लक्ष होते, तर शिवाजी राजेंचे सैन्य सुमारे पाऊण लक्ष होते, अशा कठीण परिस्थितीत लढणे, राज्य निर्माण करणे व राज्याभिषेक करून घेणे, हे मोठे भव्य, दिव्य आणि उत्तुंग असे कार्य होते. एका बाजूला औरंगजेबाची दहशत होती, तर दुसऱ्या बाजूला शुद्राचार शिरोमणी सारख्या ग्रंथांचा पगडा समाजमनावर होता.

आजच्या युगात क्षत्रिय उरले नाहीत, त्यामुळे शिवरायांनी राज्याभिषेक करणे धर्मबाह्य आहे, असा पुकारा झाला, याचा पुसटसा उल्लेख समकालीन डच दप्तरात येतो. शिवाजीराजांनी मोठ्या युक्तीने सर्व विरोध मोडून राज्याभिषेक केला. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकासाठी एकूण अकरा हजार लोक आपल्या परिवारास रायगडावर जमले, असे डच दप्तर सांगते, तर सभासद पन्नास हजार व्यक्ती जमल्याचे नमूद करतात.

सभासदाची मांडणी अनेकदा अतिशयोक्त पद्धतीची आहे. अतिशयोक्त भाग वजा केला, तरी मोठ्या संख्येने रयत रायगडावर उपस्थित होती. तीन घटिका रात्र उरली असता म्हणजे सहा जूनच्या पहाटे राजश्री शिवाजी राजे भोसले सिंहासनी आरूढ झाले, अशी नोंद समकालीन जेधे शकावली करते.

मातोश्री जिजामातांची उपस्थिती

शिवाजीराजांना राज्याभिषेक प्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या मातोश्री जिजामाता उपस्थित होत्या, याबाबतचे वर्णन डच दप्तरात पुढीलप्रमाणे येते ‘शिवाजी महाराजांच्या मातोश्री जरी सुमारे ८० वर्षे वयाच्या होत्या, तरी राज्याभिषेक समारंभाला उपस्थित राहण्यासाठी आल्या. त्यानंतर बारा दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

राज्याभिषेकप्रसंगी त्यांनी शिवाजी राजांना २५ लक्ष पॅगोडे दिले.’ स्वतःचे स्वतंत्र राज्य असावे, हे जिजाऊंचे स्वप्न होते. ते शिवरायांनी प्रत्यक्षात साकार केले, याचा अत्यानंद जिजामाता यांना होणे स्वाभाविक होते. राज्याभिषेकाच्या प्रसंगी आणखीन एक महत्त्वाची व्यक्ती रायगडावर उपस्थित होती, त्याचे नाव हेन्द्री ऑक्सिडन! हा मुंबईकर इंग्रजांचा अर्थात ईस्ट इंडिया कंपनीचा दूत म्हणून रायगडावर उपस्थित होता. त्यांनी सर्व इतिवृत्त लिहून ठेवले आहे.

तो १३ मे १६७४ रोजी मुंबईवरून रायगडासाठी निघाला आणि १९ मे रोजी रायगडाच्या पायथ्याला पाचाडला पोहोचला. तो बावीस मे रोजी रायगडावर पोहोचला याप्रसंगी शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या तयारीत व्यग्र असल्याचे तो सांगतो. शिवाजीराजांनी प्रतापगडावर जाऊन भवानी मातेला सुवर्णछत्र अर्पण केल्याचे तो सांगतो.

राज्याभिषेक समारंभ पार पडल्यावर ६ जूनच्या सकाळी सात आठच्या दरम्यान हेन्ड्री ऑक्सिडनला दरबारात उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. त्यांनी ६ जून रोजी सकाळी उपस्थित राहून शिवरायांना राज्याभिषेक प्रसंगी नम्रतेने शुभेच्छा दिल्या. याबाबतचा महत्त्वपूर्ण वृत्तांत त्याने पुढील प्रमाणे दिलेला आहे. ‘६ जून सात-आठच्या सुमारास आम्ही राजाच्या दरबारी गेलो. अप्रतिम, सुंदर अशा सिंहासनावर शिवाजीराजे विराजमान झाले होते. सर्व खाशी आणि मातब्बर मंडळी भरजरी पोशाखात अदबीने उभी होती.

युवराज संभाजीराजे, पेशवे मोरोपंत, सन्माननीय विद्वान पुरोहित सिंहासनाच्या पायऱ्याशी बसले होते. मी काही अंतरावर अदबीने उभा होतो. राजांना पेश करण्याची हिऱ्याची अंगठी घेऊन नारायण शेणवी आमच्या शेजारीच थांबला होता. राजांनी आमच्या आगमनाची दखल घेतली आणि आम्हाला जवळ बोलावले. आम्ही सिंहासनाच्या पायरीशी गेलो. राजांचे दर्शन घेऊन जबाबदारीने परत फिरणे भाग होते. अगदीच उलट पावली नव्हे, परंतु लवकरच आम्ही तिथून निघालो. मी तेवढ्यात सभेचे निरीक्षण केले. अनेक राजचिन्हे सिंहासनाभोवती झळकत होती.

उजव्या बाजूला दोन भाल्यांच्या टोकावर मोठ्या दातांचे सुवर्णमत्स्य लटकवले होते. डावीकडे बरीच अश्वपुच्छे बांधलेली होती. एका डौलदार भाल्याच्या टोकावर न्यायाचे प्रतीक असलेला सोन्याचा तेजदार तराजू झुलत होता. आम्ही परत फिरून दरबाराच्या द्वारापाशी आलो. सजविलेले दोन छोटे हत्ती त्या ठिकाणी दिमाखात उभे होते. सोन्याचे लगाम असलेले सजवलेले दोन सुंदर घोडे ऐटीत उभे होते. अत्यंत अवघड धोकादायक वाटेने हत्ती आणि घोडे या गडावर आणले कसे असतील, या विचाराने मला कौतुक वाटले.’

स्फूर्तिदायक घटना

रायगड हा पूर्वेकडचा जिब्राल्टर आहे असे डग्लस म्हणतो. तो अभेद्य आहे, अजिंक्य आहे, म्हणून तोच गड शिवरायांनी राज्याभिषेकासाठी निवडला. राज्याभिषेक जून महिन्यात करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, याच काळात कोकणात मान्सूनचे आगमन होते, अशा काळात कोकणात शत्रूला आक्रमण करणे महाकठीण होते. शिवाजीराजे दूरदृष्टीचे राजे होते.

शिवाजीराजांनी राज्याभिषेक करून शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट केली. भूमिपुत्रांचे मांडलिकत्व नष्ट झाले. राज्याभिषेक हा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण भारतीयांसाठी स्फूर्तिदायी घटना आहे. शिवरायांची प्रेरणा घेऊन छत्रसाल राजाने स्वतंत्र राज्य निर्माण केले. राज्याभिषेक ही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, भाषिक स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ आहे. राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे, ही घटना संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक, स्फूर्तिदायक आणि आनंददायी आहे.

स्वाभिमानाची निर्मिती

ज्या इंग्रजांच्या साम्राज्याचा सूर्य कधी मावळत नाही, असे म्हटले जात असे व ज्यांचे अर्ध्या जगावर राज्य होते अशा इंग्रजांनाही आश्चर्यचकित करणारा हा राज्याभिषेक सोहळा होता. अजून त्यांनी सुंदर सिंहासनाचा उल्लेख केला आहे, की जे ३२ मण सोन्याचे होते, असे सभासद सांगतो. राजशिष्टाचाराचे पालन करून शिवरायांना मुजरा केला, ऑक्सिडन पाठमोरा किंवा उलट पावलाने मागे फिरला नाही, हेही तो आवर्जून सांगतो.

शिवरायांनी राजचिन्हे धारण केली होती, याची तो नोंद करतो. राज्याभिषेकापूर्वी ती धारण करण्यास आक्षेप होता. शिवाजीराजे म्हणजे शहाजीराजे या सरदाराचा बंडखोर पुत्र आहे, त्यांना राजमान्यता नव्हती. राज्याभिषेकाने ते सार्वभौम राजे झाले. ते स्वतंत्र राज्याचे अधिपती झाले. न्यायाचे प्रतीक असणारे सुवर्ण तराजू झुलत होते, असे ऑक्सिडन सांगतो, यावरून स्पष्ट होते की राज्याभिषेकाने शिवरायांना न्यायदंड आणि राजदंड वापरण्याचा अधिकार प्राप्त झाला.

न्यायाच्या राज्यावर शिक्कामोर्तब झाले. रायगडावर हत्ती कसे? याचे ऑक्सिडनला कौतुक वाटले. अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या इंग्रज प्रतिनिधींनी रायगडावर येऊन शिवरायांना मुजरा केला, हे राज्याभिषेकाने झाले. मोगल, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, आदिलशाही आक्रमणापुढे एतद्देशीयांनी शरणागती पत्करली होती, अशा कठीण काळात शिवाजीराजे लोककल्याणासाठी जुलमी सत्ताधीशाविरुद्ध ठामपणे उभे राहिले. औरंगजेबाचा वारू त्यांनी रोखला.

औरंगजेब पुढे सत्तावीस वर्षे महाराष्ट्रात थांबला. तो लढला, त्याने अनेक किल्ले जिंकले; परंतु त्याला शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य आणि येथील मावळे कधी जिंकता आले नाहीत, कारण शिवरायांनी राज्याभिषेकाच्या माध्यमातून निर्माण केलेला स्वाभिमान! आपले राज्य हेच स्वराज्य ही भावना रयतेत दृढ झाली होती. राज्याभिषकाने रयतेत चैतन्य निर्माण झाले. शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट झाली.

हतबल, निराश झालेल्या जनतेच्या मनात धैर्य, शौर्य, आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम राज्याभिषेकाने झाले. राज्याभिषेकाने नवीन कालगणना सुरू झाली, याला शिवशक म्हटले जाते. शिवाजीराजे शककर्ते राजे झाले. त्यांनी राज्यव्यवहार कोशाची निर्मिती केली. स्वराज्याच्या चलन व्यवस्थेसाठी टांकसाळ सुरू केली. स्वतःची अर्थव्यवस्था निर्माण केली. अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली.

राज्याभिषेक आणि शिवरायांना राजमुकुट, छत्र-चामर धारण करण्याचा अधिकार मिळाला. त्यांना अधिकृतपणे व्यापार तह, आंतरराष्ट्रीय करार करण्याचा अधिकार प्राप्त झाला. त्यांना पदव्या, रयतेला आर्थिक, भाषिक, सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळाले. राज्य सार्वभौम झाले. राज्याभिषेकाने स्वराज्याला अधिष्ठान प्राप्त झाले.

राज्याभिषेकामुळेच पुढे प्रजा तळहातावर प्राण घेऊन सत्तावीस वर्षे औरंगजेबाविरुद्ध लढत राहिली, पुढे ब्रिटिशांविरुद्ध लढली. राज्याभिषेकाने भारतीय स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली. अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक, देशभक्तांनी शिवरायांची प्रेरणा घेऊन देशात विविध क्षेत्रांत कार्य केले, ही राज्याभिषेकाची फलश्रुती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT