सोलापूर : महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर शिंदे-फडणवीसांचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर सरकारला एक वर्ष पूर्ण होताच राष्ट्रवादीचा मोठा गट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सहभागी झाला. त्यामुळे राज्याच्या पावसाळी अधिवेशनात मतदारसंघातील समस्यांपेक्षा राजकीय चर्चेलाच उधाण येईल, असे सर्वांनाच वाटत होते. पण, सत्ताधारी व विरोधातील बहुतेक आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील समस्यांना प्राधान्य दिले. सोलापूर जिल्ह्यातील काही आमदारांनी मतदारसंघातील मोजकेच प्रश्न मांडले. पण, जिल्ह्यातील काँग्रेसच्या विशेषत: विरोधातील एकमेव आमदार असलेल्या प्रणिती शिंदेंनी विविध प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधत कधी आक्रमक भूमिका घेतली तर कधी संयम देखील दाखविला.
राज्यातील बहुतेक राजकीय पक्षाचे नेते म्हणतात, ८० समाजकारण व २० टक्के राजकारण, तेही निवडणुकीपुरतेच. पण, सद्य:स्थिती तशी आढळत नाही. राज्याच्या वारंवार बदलणाऱ्या समिकरणावरून आता पुढच्यावेळी मतदान करावे की नाही?, असा प्रश्न अनेक मतदारांना पडला आहे. तरीदेखील, पक्षनिष्ठा व मतदारसंघातील मतदारांचा विश्वास जपत आमदार प्रणिती शिंदेंनी विडी कामगार, यंत्रमाग कामगार, सोलापूर शहरातील पाणी प्रश्न, रेल्वेच्या जागेत वर्षानुवर्षे राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सभागृहात विचारले. वेळप्रसंगी सभापतींसह मुख्यमंत्री, संबंधित खात्याच्या मंत्र्यांनाही त्यांनी उत्तर द्यायला भाग पाडले. त्यांनी सोलापूर विमानतळाचा प्रश्न उपस्थित करताना बोरामणी विमानतळाचा रखडलेला प्रश्न सभागृहात मांडला. त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांची चांगलीच गोची झाल्याचेही पाहायला मिळाले.
श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडताना तेथील कामगारांना रस्त्यांवर आणल्याचाही मुद्दा त्यांनी मांडला. त्यावेळी आमदार सुभाष देशमुखांना त्या विषयावर बोलावे लागले. मणिपूरमधील महिलांवरील अत्याचारावरून देखील त्यांनी भाजपवर निशाणा साधला. राजकारणात टिकून राहण्यासाठी कोणतीही शैक्षणिक संस्था, साखर कारखाना नसतानाही आमदार प्रणिती शिंदे यांनी केवळ कामाच्या बळावर मोदी लाटेतही आपला मतदारसंघ कायम राखला आणि एकाच मतदारसंघातून (शहर मध्य) विजयाची त्यांनी हॅटट्रिक केली, हे विशेष.
लोकसभेला प्रणिती शिंदेंचे पारडे जड?
तरुण-तरुणी, हातावरील पोट असलेले कामगार व महिलांचे प्रश्न सातत्याने मांडून त्यावर सरकारला निर्णय करायला भाग पाडणाऱ्या आमदार प्रणिती शिंदेंना आजवर पक्षाकडून मंत्रिपद मिळाले नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले असते तर जिल्ह्यातील काँग्रेसला नक्कीच आणखी बळ मिळाले असते. पण, पदाची अपेक्षा न करता जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक होणाऱ्या आमदार प्रणिती शिंदेंनी त्यांच्या मतदारसंघात चहूबाजूंनी विरोधकांकडून कोंडी केली जात असतानाही विजय मिळवलाच. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा या मतदारसंघात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. या मतदारसंघांमध्ये काँग्रेसला मानणारा मतदार देखील लक्षणीय आहे. दुसरीकडे भाजपच्या उमेदवारापेक्षा प्रणिती शिंदेंनाच मदत केलेली बरी, अशी भूमिका घेऊन अनेक नेते निवडणुकीवेळी त्यांना मदत करू शकतात. त्यामुळे भाजपविरोधात आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार राहिल्यास वडिलांच्या पराभवाचा बदला त्या निश्चितपणे पूर्ण करतील, असा विश्वास अनेकांना वाटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.