सोलापूर : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेची मुदत दहा वर्षांपर्यंत असून, योजनेच्या पहिल्याच टप्प्यात सोलापूरचा सहभाग झाला. लहान-लहान विमानतळांना जोडून सर्वच शहरांमधील नागरिकांना अवघ्या अडीच हजारांमध्ये विमान प्रवास (एक तास) करता येईल, अशी ही योजना आहे. योजनेची पाच वर्षे संपली, पण सोलापूरला ‘उडान’ची प्रतीक्षाच आहे. सोलापुरातील होटगी रोडवरील विमानतळावर आता सुरक्षिततेच्या कारणावरून व्हीआयपींचे देखील विमान उतरविण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे विमानतळ असूनही काहीच उपयोग नाही, अशी आवस्था झाली आहे.
कर्नाटक, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशाच्या सीमेवरील सोलापूर जिल्हा व्यापारासाठी, वैद्यकीयदृष्ट्या मध्यवर्ती तथा सोयीचा मानला जातो. महामार्गांच्या कनेक्टिव्हिटीमुळे सोलापूरमध्ये उद्योगवाढीसाठी मोठी संधी आहे. मुंबई, पुण्यातील एमआयडीसींमधील जागा उद्योगांनी व्यापल्यानंतर सोलापूर शहर- जिल्ह्यात उद्योग वाढतील, असा अनेकांना विश्वास आहे. त्यातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. त्यासाठी सोलापूरची विमानसेवा सुरू व्हावी, अशी अनेकांची मागणी आहे. परंतु, पाच-सहा वर्षे होऊनही होटगी रोडवरील विमानतळासाठी प्रमुख अडथळा ठरलेल्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या (को-जन) चिमणीचा अंतिम फैसला झालेला नाही. विमानतळ विकास प्राधिकरणाने विमानतळाला नेमकी अडचण काय, यासंदर्भात वेळोवेळी स्पष्ट केले आहे. दरम्यान, तत्कालीन खासदार ॲड. शरद बनसोडे यांनी स्मार्ट सिटीत समावेश झालेल्या सोलापूरचा ‘उडान’मध्ये समावेश असावा, यासाठी विशेष प्रयत्न केले होते. ऑक्टोबर २०१६ रोजी योजनेची घोषणा झाली आणि एप्रिल २०१७ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. पहिल्या टप्प्यातील ६८ शहरांच्या यादीत सोलापूरचा समावेश झाला. त्यानंतर कोल्हापूर, पुणे, शिर्डी, नागपूर अशा अनेक शहरांमध्ये ही योजना कार्यान्वित झाली. पण, पहिल्या टप्प्यातील सोलापूरला अद्याप ‘उडान’ची प्रतीक्षाच असून, चिमणीचा अडथळा दूर झाल्याशिवाय ते अशक्य असल्याचे विमानतळ विकास प्राधिकरणाचे म्हणणे आहे.
‘उडान’ योजना अन् सद्य:स्थिती
- विमानातून प्रवास करण्याचे सामान्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये ‘उडान’ची घोषणा
- योजनेअंतर्गत सुरवातीची तीन वर्षे विमान कंपन्यांना केंद्राकडून अनुदान दिले जाते
- अडीच हजार रुपयांत सामान्य व्यक्ती देशात कुठेही एक तासाचा विमानातून प्रवास करू शकतो
- ‘चिमणी’च्या अडथळ्याने विमान उतरविण्यास अडचणी; अडथळे दूर होताच स्पाईस अन् एअर अलायन्स सेवा द्यायला तयार
- योजनेची मुदत ऑक्टोबर २०२७ पर्यंत; पाच वर्षांत सोलापूर विमानतळावरून ‘उडान’चे विमान उडलेच नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.