Loksabha election 2024 Esakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha: राखीव मतदारसंघांतही रंगताहेत चुरशीच्या लढती! उमेदवार, वक्तव्यांमुळे मतदारसंघ चर्चेत; अमरावती, सोलापूरकडे लक्ष

Loksabha: राज्यात पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात मतदान पार पडले आहे. आता सर्वसाधारण मतदारसंघांबरोबरच राखीव मतदारसंघातील प्रचारही विविध उमेदवारांच्या अस्तित्वाने व त्यांच्या वक्तव्याने चर्चेत येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: राज्यात पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात मतदान पार पडले आहे. आता सर्वसाधारण मतदारसंघांबरोबरच राखीव मतदारसंघातील प्रचारही विविध उमेदवारांच्या अस्तित्वाने व त्यांच्या वक्तव्याने चर्चेत येत आहे. अमरावतीतून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा, सोलापूर मतदारसंघातून प्रणिती शिंदे तर रामटेकमधून उमेदवारी नाकारली गेलेल्या रश्मी बर्वे यांच्यामुळे हे मतदारसंघ चर्चेत आले आहेत.

केंद्रीय मतदारसंघ फेररचना आयोगाने मतदारसंघांची २००८ रोजी फेररचना केल्यानंतर २००९ रोजी झालेल्या पहिल्या निवडणुकीनंतर राज्यात अनुसूचित जातींचे (एससी) पाच तर अनुसूचित जमातीचे (एसटी) चार मतदारसंघ अस्तित्वात आले. याआधी राज्यात ‘एससी’चे उस्मानाबाद, पंढरपूर व बुलडाणा हे तीन व ‘एसटी’चेही धुळे, नंदूरबार व डहाणू हे तीन मतदारसंघ होते.

या सर्व मतदारसंघावर सुरूवातीला कॉँग्रेस व नंतर अलिकडच्या काळात भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. आता ‘एससी’साठी रामटेक, अमरावती, लातूर, सोलापूर व शिर्डी हे पाच तर ‘एसटी’साठी पालघर, नंदूरबार, गडचिरोली-चिमूर व दिंडोरी हे चार मतदारसंघ राखीव झाले आहेत.

अमरावती मतदारसंघात नवनीत राणा, कॉँग्रेसचे दर्यापूरचे आ. बळवंत वानखेडे, ‘वंचित’चे आनंदराज आंबेडकर व प्रहारचे दिनेश बूब हे लढत आहेत. जातप्रमाणपत्रावरून व हनुमान चालिसा आंदोलनावरून गेली पाच वर्षे भाजपची बाजू लावून धरणाऱ्या नेत्या म्हणून राणा उदयास आल्या. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राणांचा उल्लेख ‘नटी’, ‘नाची’ असा केल्यानेही अमरावती मतदारसंघ चर्चेत आला. प्रकाश आंबेडकरांचे भाऊ आनंदराज येथून रिंगणात आहेत.

सोलापुरात काँग्रेसच्या आ. प्रणिती शिंदे व भाजपचे राम सातपुते यांच्यातली लढाईही घराणेशाहीविरूद्ध सर्वसामान्य घरातील उमेदवार अशी रंगविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यंदा ‘वंचित’चा उमेदवार नसल्याने त्याचा फायदा कॉँग्रेसला होण्याची शक्यता आहे.

रामटेकमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले आहे. येथे महायुतीतून शिवसेनेकडून राजू पारवे, कॉँग्रेसकडून शामकुमार बर्वे, तर ‘वंचित’चे समर्थन घेऊन कॉँग्रेसचे बंडखोर अपक्ष किशोर गजभिये रिंगणात आहेत. विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापल्याने महायुतीत भाजप व शिवसेनेत संघर्ष निर्माण झाला होता. शेवटी शिवसेनेने ही जागा राखली मात्र त्यांना उमेदवार कॉग्रेसमधून आयात करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा या मतदारसंघात झाली आहे.

शिर्डी या आणखी एका राखीव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खा.सदाशिव लोखंडे व शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात पुन्हा लढत रंगणार आहे. लोखंडे दोनदा तर वाकचौरे एकदा खासदार राहिले आहेत. लोखंडेचीं हॅटट्रिक वाकचौरे रोखतात का हे पाहणे, औत्सुक्याचे असेल.

लातूर मतदारसंघात गेल्या सलग तीन निवडणुकीत भाजपने यश मिळविले आहे. यंदा भाजपचे विद्यमान खा. सुधाकर श्रृगारे, काँग्रेसचे डॉ.शिवाजी काळगे, व ‘वंचित’चे नरसिंह उदगीरकर यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात कॉँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख व भाजपचे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भूमिका महत्वाची असते. अमित देशमुख व त्यांचे कुटुंब कॉँग्रेसच्या प्रचारात लागले आहे. मात्र भाजपला अजून गटबाजीला तोंड द्यावे लागते आहे.

असा आहे सामना

अनुसूचित जातींच्या नंदुरबार मतदारसंघातून भाजपच्या खा. डॉ. हिना गावित तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. त्यांची लढत कॉँग्रेसच्या ॲड. गोवाल पाडवी यांच्याशी आहे. खा.माणिकराव गावित यांचा २०१४ मध्ये एक लाखांहून अधिक मतांनी डॉ. हिना गावित यांनी पराभव केला व त्या देशभर चर्चेत आल्या होत्या.

विदर्भातील गडचिरोली-चिमूर या ‘एसटी’च्या राखीव मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. इथे भाजपचे विद्यमान खा.अशोक नेते, कॉँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान व ‘वंचित’चे हितेश मडावी यांच्यात लढत झाली आहे. दिंडोरी या आणखी एका एसटीच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार आपले दुसऱ्यांदा नशीब अजमावत आहेत. त्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे भास्कर भगरे यांच्याशी लढत देणार आहेत. महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ कॉँग्रेसकडून राष्‍ट्रवादीच्या वाट्याला आला.

‘एसटी’च्या पालघर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून राजेंद्र गावित तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून भारती कामडी या रिंगणार आहेत. या मतदारसंघावरही महायुतीचे वर्चस्व राहिले आहे. दिंडोरी व पालघर या मतदारसंघात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT