सोलापूर : येथील ऋतुराज शिंदे या आपल्या सख्ख्या मित्राच्या खूनाचा बदला सहा मित्रांनी ऋतुराजचे वडील सुरेश शिंदे ऊर्फ गामा पैलवान यांच्या साथीने घ्यायचे ठरवले. ७ सप्टेंबर २०१८ रोजी त्या सर्वांनी नवी पेठेतील मोबाईल गल्लीत रात्रीच्या सुमारास रिंगण करून आबा कांबळेचा खून केला. या खटल्यात जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली आणि न्यायालयाने सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
सोलापुरातील ‘खून का बदला खून’ हा खटला संपूर्ण राज्यभर गाजला. सोलापुरातील ऋतुराज शिंदे याचा खून २००४ मध्ये झाला होता. त्यात आबा मुख्य आरोपी होता. दोन वर्षानंतर आबाला २००६ मध्ये जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पण, आठ वर्षांनी आबा उच्च न्यायालयातून निर्दोष सुटला. आपल्या मित्राला संपविणारा आपल्यासमोर बिनधास्तपणे वावरतोय, याची चिड, सल ऋतुराजच्या वडिलासह मित्र नीलेश महामुनी, रविराज शिंदे, अभिजित शिंदे, प्रशांत शिंदे, तौसिफ विजापुरे व नितीन खानोरे या सर्वांनाच होती. त्यांनी ऋतुराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आबा कांबळेला संपवायचे प्लॅनिंग केले. ७ जुलै २०१८ रोजी आबा व मित्र अजय व पप्पू रायगडला सहलीसाठी जाण्यावर चर्चा करीत थांबले होते. त्यावेळी हलका पाऊस असल्याने ते मोबाईल गल्लीत आडोशाला थांबून बोलत होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी आबाला रिंगण करून घेरले आणि एकापाठोपाठ तब्बल ५६ वार करून त्याचा खून केला. तत्पूर्वी, त्यांनी मंगळवार बाजारातून आठ धारदार कोयते विकत घेतले होते.
आबाचा खून झाल्यानंतर भाचा शुभम धुळराव याने फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी ८ जुलैला विविध ठिकाणाहून आरोपींना जेरबंद केले. तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त डॉ. दीपाली काळे, फौजदार चावडीचे पोलिस निरीक्षक श्री. जगताप यांनी गुन्ह्याचा तपास करून २४६ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. ८ जुलै २०१८ ते २६ एप्रिल २०२४ या काळात आरोपी जेलमध्येच होते. त्यांनी विविध कारणे देऊन जामिनासाठी प्रयत्न केले, पण सरकारचे वकील ॲड. राजपूत यांनी आरोपींना जामीन मिळू दिला नाही. खटल्याच्या निकालाची तब्बल १२१ पाने आहेत. आरोपी व सरकारपक्षातर्फे सहा वर्षे वेळोवेळी या खटल्यासंदर्भातील युक्तिवाद सुरू होता. उलट तपासात आरोपींच्या वकिलांनी विविध मुद्द्यांवर आक्षेप घेतले, पण त्याला अन्य निकालांचे दाखले देत सरकार पक्षाने त्यांचे मुद्दे खोडून काढले. अखेर न्यायालयाने सर्व साक्षी-पुरावे व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना जन्मठेप ठोठावली.
आरोपी निलेशने तुरूंगात लिहले ‘मित्रप्रेम’ पुस्तक
आबा कांबळे खून प्रकरणातील आरोपी २०१८ पासून तुरूंगातच होते. या काळात आरोपी नीलेश महामुनी याने ऋतुराज व आरोपी मित्रांसोबतचे संबंध, ऋतुराजच्या खुनानंतर त्याचे वडील गामा पैलवान याने मुलाच्या चिथेवर बदला घेण्याची घेतलेली शपथ व आबा कांबळेचा खून, हा संपूर्ण प्रवास एका पुस्तकात लिहून ठेवला. त्या पुस्तकाला त्याने ‘मित्रप्रेम’ नाव दिले होते, असेही सांगितले जाते.
साक्षी-पुराव्यांच्या आधारे आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
आबा कांबळे खून प्रकरणात पोलिसांनी ४७ साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते, पण सरकार पक्षातर्फे त्यातील २८ साक्षीदार तपासण्यात आले. दोन नेत्र साक्षीदारांची साक्ष व हत्यारे, आरोपी व मृताच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, शवविच्छेदन व वैद्यकीय अहवाल असे पुरावे या खटल्यात महत्त्वाचे ठरले. पोलिसांनी चांगला तपास केला होता. खटल्याच्या सुनावणीवेळी उच्च व सर्वोच्च न्यायालयातील विविध खटल्यांमधील २० निकालांचे दाखले देण्यात आले. अखेर सातही आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
- प्रदीपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील, सोलापूर
‘तो’ कॅन्टीनवालाही ठरला महत्त्वाचा दुवा
आबा कांबळेचा खून करून आरोपी दुचाकीवरून मंगळवेढा रोडने जात असताना वाटेत त्यांची दुचाकी पंक्चर झाली. त्यावेळी ते एका चहा कॅन्टीनवर थांबले. त्याठिकाणी त्यांनी चहा-बिस्किटे खाल्ली. त्यांच्या अंगातील शर्ट उलटे घातलेले दिसल्याने कॅन्टीनवाल्याने त्यांना विचारणा केली. त्यावेळी गुटखा, माव्याचे डाग पडल्याने उलटे कपडे घातल्याचे सांगितले व तेथून काहीजण बसमधून कर्नाटकच्या दिशेने गेले. यासंदर्भातील माहिती पोलिस तपासात समोर आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.