सोलापूर : दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळीचा फटका आणि दुसरीकडे शेतमालाचे व दुधाच्या पडलेल्या दरामुळे व केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्या थकबाकीदार शेतकऱ्यांना बॅंकांकडून नवीन कर्जही मिळत नाही. त्यामुळे राज्यातील अडचणीतील शेतकऱ्यांचा एकदा सातबारा कोरा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष व काँग्रेस नेत्यांनी केली आहे.
राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीनुसार १ जानेवारी २०२३ ते ३० एप्रिल २०२४ या १४ महिन्यांच्या काळात तब्बल तीन हजार ६८९ शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कर्जबाजारीपणा हेच आहे. लागवड केलेले पिक ऐन हाताशी आल्यावर नैसर्गिक आपत्तीमुळे वाया जाण्याच्या संकटामुळे आणि शेतमालाला रास्त भाव मिळत नसल्याने बळिराजाला त्याच्या डोक्यावरील कर्ज फेडताच आले नाही. पूर्वीचे कर्ज थकीत असल्याने बॅंकांकडून नवीन कर्ज मिळत नाही. दुसरीकडे बॅंकेत गेल्यावर नाही म्हटले तरी सिबिल पाहिलेच जाते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकाराचा दरवाजा ठोठावा लागत असून सावकाराने जमिनी बळकावल्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. संकटाच्या चक्रव्युहातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्याचा सातबारा कोरा व्हायलाच पाहिजे, अशी सर्वांचीच मागणी आहे. आता राज्य सरकार अधिवेशनात त्याची घोषणा करणार का, याकडे राज्यातील सव्वाकोटी शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
केंद्र व राज्य सरकारची चुकीची धोरणे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी हवीच
कांदा निर्यातबंदी, पामतेल, सोयाबीन पेंड, कापूस आयात, साखरेवरील निर्यातबंदी अशा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला. राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांना दुधाला रास्त भाव मिळाला नाही. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, अशी आमची मागणी आहे.
- राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांना एकरी ५० हजार ते एक लाखांच्या मदतीची मागणी
राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत असून त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. दुष्काळातून सावरताना पूर्वीचेच कर्ज असल्याने नव्याने कर्ज मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफी करावी. याशिवाय १० ते २० वर्षांपासून शेतकऱ्यांना मोठा फटका सोसावा लागला असून त्याबदल्यात एकरी ५० हजार ते एक लाखांची मदत द्यावी, अशीही मागणी आहे.
- बच्चू कडू, अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष
तेलंगण सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना द्यावी संपूर्ण कर्जमाफी
तेलंगणात काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असून त्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही संपूर्ण कर्जमाफी द्यावी. दुधाचे दर पडलेले असून दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी अशा संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या असून सरकारने संवेदनशिलपणे विचार करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी आमची मागणी आहे.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस, महाराष्ट्र
१६ महिन्यातील शेतकरी आत्महत्या
विभाग शेतकरी आत्महत्या
कोकण ०००
पुणे ३८
नाशिक ३९०
छ.संभाजीनगर १,३५५
अमरावती १,५२३
नागपूर ३८३
एकूण ३,६८९
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.