सोलापूर : पिकांवरील विविध प्रकारच्या नवीन रोगांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्येला पिकांवरील रोगामुळे घटलेली उत्पादकता किंवा नुकसान हेदेखील प्रमुख कारण आहे. अशा कठीण प्रसंगात बळिराजाला आधार म्हणून ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पिकांवरील रोगाचे निदान व अचूक उपाय सांगणारे ॲप विकसित केले आहे. सुरवातीला त्यात सोयाबीन व टोमॅटो (त्रैमासिक पिके) पिकांचा समावेश केला आहे.
डीप लर्निंगच्या सहाय्याने पिकांचे रोगनिदान करणारे हे मोबाईल ॲप ऑर्किड अभियांत्रिकीतील शुभम दिलीप शेळके, प्रतीक शेखर टोणपे, नागेश मल्लिनाथ बिराजदार, आशुतोष मनेष सोनकवडे, आकाश दिलीप तेगमपल्ले, रोहित सोमसिंग राठोड या विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार व प्रा. डॉ. विपुल बाग यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केले आहे. त्यासाठी डीप लर्निंग, अँड्रॉइड, इमेज प्रोसेसिंग अशा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. ॲपद्वारे पिकांच्या पानांवरील रोग सुरवातीच्याच टप्प्यावर ओळखता येणार आहे, जेणेकरून त्वरित उपचार करून शेतकरी पिकांचे नुकसान टाळू शकतो. पिकाच्या पानांचे फोटो काढून त्या ॲपवर अपलोड केल्यास नेमका कोणता रोग झाला आहे, याची माहिती मिळवू शकतो. तसेच ॲपमधील पूर्वीच्या फोटोसारखीच स्थिती तुमच्या पिकांची झाली असल्यास त्याचीही माहिती काहीवेळात मिळणार आहे. त्यात पिकांवरील रोगाचे नाव आणि त्यावरील उपायही सांगितले जातात. सध्या सोयाबीन व टोमॅटो पिकांवरील प्रत्येकी पाच प्रमुख रोगांवर हे ॲप निदान सांगते. हे ॲप वापरण्यासाठी सहज व सोपे आहे.
शेतकऱ्यांचे वाढेल उत्पादन
वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी शेतीचे उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. आता युवकांचा शेतीकडे कल वाढला आहे. पण, अनेकदा नवीन शेतकऱ्यांना पिकांवरील रोग अचूकरीत्या ओळखता येत नाही आणि त्यामुळे उत्पादनातून पिकांसाठी केलेला खर्चही निघत नाही. चुकीची औषधे फवारली, वेळेवर तो रोग न समजल्यास पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊन आत्महत्या वाढतात. पण, या ॲपमुळे निश्चितच पिकांवरील रोगनिदान जलद व अचूकपणे होऊन शेती उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.