Former MP Raju Shetti esakal
महाराष्ट्र बातम्या

Raju Shetti : 'जोपर्यंत तोडगा निघणार नाही, तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही'; राजू शेट्टींचा कारखानदारांना स्पष्ट इशारा

कारखानदार म्हणतील तोच दर आम्ही स्वीकारणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

दहा वर्षांपूर्वी ऊस दराचे आंदोलन व्हायचे त्यावेळी राजू शेट्टी खूप आक्रमक असायचे. त्यांना आम्ही बरीच गणिते समजून सागांयचो.

कोल्हापूर : गेल्यावर्षीच्या गळीत हंगामातील प्रतिटन ४०० रुपयांच्या मागणीमध्ये आम्ही दोन पावले मागे येण्यास तयार आहोत, पण कारखानदार म्हणतील तोच दर आम्ही स्वीकारणार नाही. आता साखर कारखान्यांनी (Sugar Factory) पुढाकार घेऊन तोडगा काढावा. गेल्यावर्षीचा हिशेब पूर्ण झाला तरच यंदाचा गळीत हंगाम सुरू होईल, याची कारखानदारांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Collector Rahul Rekhawar) आणि साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. मात्र, बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. शेट्टी म्हणाले, ‘‘पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्याशी चर्चा झाली. मुश्रीफ यांनी यातून मार्ग काढण्यासाठी प्राथमिक स्वरूपात कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची बैठक घ्यावी, अशा सूचना केली होती.

त्यानुसार आम्ही मार्ग काढण्यासाठी एक पाऊल मागे घेण्यास तयार आहोत; मात्र कारखानदारांनी चिरीमिरी दिल्यासारखा दर समोर ठेवला आहे. यातूनही तोडगा काढण्यास आम्ही तयार नाही. आमची माझी मागणी ४०० रुपये दुसरा हप्ता द्या, अशी आहे. हा आग्रह सोडायला आम्ही तयार आहोत. यातून कारखानदार कोणता मार्ग काढतात ते सांगा. आम्हालाही संघर्ष नको आहे. कारखान्यांच्या प्रतिनिधींनी अध्यक्षांशी चर्चा करून तत्काळ तोडगा काढावा.'

योग्य तो तोडगा काढावा जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत.’’ जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, ‘‘राज्य सरकारने एक नोव्हेंबरपासून राज्यातील हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वीच आंदोलनकांनी ऊसतोडी व रोखणे, वाहनांचे टायर फोडणे, ती पेटवणे असे मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनानेच तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

सध्यातरी या तोडग्यावर निर्णय झाला नाही; परंतु पुढच्या काही दिवसांत पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढला जाईल. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी आपण घेऊ.’’ यावेळी संजय पोवार, जर्नादन पाटील, मंडलिक कारखान्याचे वीरेंद्र मंडलिक, भोगावती कारखान्याचे संजय पाटील, बिद्रीचे के. एस. चौगले, दालमियाचे रंगा प्रसाद, दत्त कारखान्याचे एम. व्ही. पाटील, शरद कारखान्याचे शरद आवटी उपस्थित होते.

साखर तज्ज्ञ पी. जी. मेढे म्हणाले, ‘‘जिल्हातील साखर कारखानदार मायनसमध्ये आहेत. त्यांना एकरकमी एफआरपीव्यतिरिक्त जादा दर देता येणार नाही.’’ स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील तोट्यात असलेला भोगावती कारखाना एफआरपीपेक्षा जादा दर देतो. बिद्री कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक दर दिला; परंतु राजाराम, गुरुदत्त, दत्त, शरद आणि जवाहर कारखानदारांची रिकव्हरी चांगली असताना त्यांना का दर देता येत नाही?’’

जादा दराच्या पैशाचा मालक कोण

राजू शेट्टी म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेकडून कारखानदारांनी मागील हंगामात किती रुपये दराने साखर विकली याचा हिशेब मागवला होता. यावर मार्चनंतर तीन हजार ४०० रुपयांपेक्षाही जादा दराने साखर विकली. त्या पैशाचा मालक कोण? ते पैसे शेतकऱ्याचे आहेत. एप्रिलनंतर साखरेचा दर वाढला. भविष्यात दर वाढणार आहेत. त्यातून तुम्ही तरतूद करा. यावर मेढे यांनी कायद्यामध्ये तशी तरतूद नसल्याचे सांगितलं. शेट्टी यांनी लगेच तोच धागा पकडत मी साखर आयुक्तांकडे बसून कारवाई होणार नाही, याची तरतूद करतो तुम्ही आमचे पैसे द्या, असे आव्हान दिले.’’

गुन्हे दाखल करू नका!

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘‘ऊस दरावर लवकरात लवकर तोडगा निघावा, यासाठी आपण इथे आलो आहोत. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आंदोलन लवकरात लवकर मागे घेण्याचे आवाहन केले. त्यावर शेट्टी म्हणाले, की आम्ही कोर्टाचे कज्जे खेळून दमलोय. आम्हालाही हौस नाही. तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करू नका. २०० टन ४०० टनवाला कोण आंदोलनात येत नाही. सामान्य शेतकरी आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका.’’

राजू शेट्टी आता परिपक्व : मेढे

दहा वर्षांपूर्वी ऊस दराचे आंदोलन व्हायचे त्यावेळी राजू शेट्टी खूप आक्रमक असायचे. त्यांना आम्ही बरीच गणिते समजून सागांयचो; परंतु ते मान्य नसायचे. अलीकडे ते खूप परिपक्व झाले आहेत, अशी श्री. मेढे कौतुकाने म्हणाले. ते दोन वेळा खासदार होते. त्यांनी शेतकऱ्यांबरोबर कारखानदारीबाबतचेही काही विषय संसदेत मांडल्याने त्याचा कारखानदारीलाही फायदा झाल्याचेही मेढे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT