Sakal Exclusive: सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे' अभियानांतर्गत सुमारे १ कोटी पुरुषांच्या मोफत आरोग्य तपासणीचा टप्पा नुकताच यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. सदर अभियानांतर्गत आगामी काळात राज्यातील सुमारे ४ कोटी ६७ लाख लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे.
अभियानांतर्गत ४ डिसेंबर २०२३ पर्यंत १८ वर्षांवरील १ कोटी ७२ हजार पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यापैकी ९२ लाख लाभार्थ्यांच्या आवश्यक त्या चाचण्या आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आल्या असून १६ लाख लाभार्थ्यांना औषधोपचार देण्यात आले आहेत. (Free health checkup for 1 crore patients in state news)
सुमारे तेरा हजार लाभार्थ्यांवर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गतच्या रुग्णालयांमध्ये करण्यात आल्या आहेत. अभियान ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर गरजेनुसार कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
आरोग्यवर्धिनी केंद्र उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील सामुदायिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय यास्तरावर रुग्णांना आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.
सर्व आरोग्य संस्थांमध्ये १८ वर्षांवरील पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक चाचण्या, गरजेनुसार ईसीजी, सिटीस्कॅन, एक्स-रे आदी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. गरजेनुसार रुग्णांच्या आवश्यक शस्त्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गतच्या रुग्णालयांमध्ये मोफत केल्या जाणार आहेत.
गरजेनुसार रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी वैद्यकीय महाविद्यालय व शासनमान्य महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत केलेल्या रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानासाठी विशेष ‘अॅप'ची निर्मिती करण्यात आली आहे.
‘अॅप'च्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यातर्फे रुग्णांची नोंदणी, त्यांना दिलेले औषधोपचार व करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया, करण्यात आलेल्या चाचण्या या माहितीची नोंद केली जाते.
आरोग्यदायी ‘ॲप'
धर्मादाय रुग्णालयांविषयीचे आरोग्य आधार ‘ॲप' व राज्यातील खासगी आरोग्य संस्थांची नोंदणी करणे. यासह महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ‘ॲप', आरोग्यवर्धिनी केंद्रांमधील कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी यांची दैनंदिन उपलब्धता, कामावर आधारित मोबदल्याची अदाकरण याचे संनियंत्रण करण्यासाठी समुदाय आरोग्याधिकारी ‘ॲप' आरोग्य विभागातर्फे कार्यान्वित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.