आंबेठाण : मागील एक वर्षांपासून दररोज सकाळी मित्रांसोबत चालायला जाणाऱ्या एका मित्राने अचानक जाणे बंद केले. त्याला दररोज बोलावून मित्र देखील कंटाळले. मग एक दिवस अचानक सगळे मित्र वाद्यांच्या गजरात चालायला न येणाऱ्या मित्राच्या घरी गेले. अगदी भल्या सकाळी वाजंत्री घेऊन मित्र घरी आल्याने चालायला न जाणारा मित्र इतका लाजला की त्याने यापुढे मी एकही दिवस खाडा करणार नाही असे आश्वासन अन्य मित्रांना दिले.
आपल्या मित्राला चांगली सवय लागावी यासाठी मित्रांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक होत असून यातून त्या मित्राला मात्र चांगलाच धडा मिळाला आहे.
त्याचे असे झाले की, वाकी बुद्रुक, खरपुडी, मांजरेवाडी आणि आजूबाजूच्या गावातील १२ ते १५ मित्र मागील चार ते पाच वर्षांपासून पहाटे पाच ते सकाळी आठ पर्यंत या वेळेत मॉर्निंग वॉक आणि व्यायामाला जात असतात. व्यायाम, योगादेखील करत असतात. त्यांच्यात मागील एक वर्षापासून संभाजी गाडे हा खरपुडी येथील मित्र सहभागी झाला होता. जवळपास एक वर्ष हा नित्यनियम सुरू होता. परंतु अलीकडच्या १५ ते २० दिवसांपासून गाडे याने वेगवेगळी कारणे देऊन चालायला येणे टाळले तर कधी फोन बंद करून ठेवत असे.
आपला मित्र आपल्या सोबत चालायला यायला टाळत आहे हे लक्षात येता एक दिवस अचानक अन्य मित्रांनी वाजंत्री सोबत घेऊन आणि मांडवडहाळे हातात घेऊन गैरहजर राहणाऱ्या मित्राच्या घरी गेले. सुरुवातीला त्या मित्राला आणि त्याच्या घरातील लोकांना काय झाले ? याबाबत काहीच समजेना. परंतु नंतर जेव्हा सगळा प्रकार लक्षात आला तेव्हा घरातील आणि आजूबाजूची सगळी मंडळी पोट धरून हसू लागली.
जो मित्र चालायला येणे टाळत होता तो मात्र खूप ओशाळला आणि यापुढे मी कधीही सकाळी चालायला आणि व्यायाम करायला यायला टाळाटाळ करणार नाही असा शब्द मित्रांना दिला आणि सर्वांना चहापाणी करून उद्यापासून वेळेत हजर राहील असा शब्द दिला.
आपल्या मित्राला चांगली सवय लागावी म्हणून मित्रांनी मला धडा दिला आहे. यापुढे मी कधीही व्यायाम करायला जायला टाळणार नाही.
- संभाजी गाडे (गैरहजर राहणारा मित्र)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.