महाराष्ट्र बातम्या

गोफण | सुखाची झोप उडाली, वस्तादांचा मोठा गेम

संतोष कानडे

पुण्यातल्या प्रभात रोडवरच्या एका बागेत कायम दिसणारं 'सुखवर्धन' नावाचं एक फुलपाखरु होतं. हर्षोल्हासाने कायम आनंदी राहणारा त्याचा स्वभाव असला तरी नेहमी या झाडावरुन त्या झाडावर; अशी निष्ठाबदल करण्याची त्याची खोड होती. हे फुलपाखरु दिसायला देखणं इतकं की एखाद्या चित्रपटातल्या नायकालाही लाजवेल.

दोन-चार महिन्यातून कधीतरी मग हे फुलपाखरु उडत-उडत आजीच्या गावी जावं तसं त्याच्या फंदापुरात जाई. हे गाव त्याला अजिबात आवडत नसे, पण करणार काय? गावच्या मेहरबानीवरच पुण्यातला डामडौल आणि सुख अवलंबून होतं म्हणे.

एकेदिवशी बागडता-बागडता या फुलपाखराला एक सुखाचं झाड सापडलं. सुखाची झोप काय असते, हे त्याला त्या दिवसापासून कळलं. रोज उठायचं.. झाडावर बागडायचं, गप्पा मारायच्या, कधी सन्मान तर कधी अपमान सहन करायचा.. मिष्टान्नावर ताव मारुन सुखाने झोपी जायचं. कसली चौकशी नाही, कुठला तपास नाही की काळ्या कोठडीत जाण्याची भीती नाही.. सगळंकसं गुडीगुडी सुरु होतं.

शेवटी फुलपाखरु असलं आणि निष्ठावान नसलं तरी त्याला एक मन होतं. मानसन्मानाच्या अडून केलेला अपमान त्याला सहन होत नव्हता. कधी या फांदीवर बसायचं नाही तर कधी त्या फांदीकडे फिरकायचं नाही, अशी दमदाटी होऊ लागली. झाडावरच्या मोठ्या पक्षांचा त्याला त्रास होत होता.

एकेदिवशी त्याला तर स्वतःच्याच फांदीवर बसायची अडचण झाली. 'अरे ही माझी फांदीय मला बसू द्या.. माझ्या जागेवर तुम्ही दुसऱ्याला बसवू शकत नाहीत.' त्याचा हा त्रागा होता, पण कुणीच ऐकून घेतलं नाही. वैतागून मग या सुखवर्धन फुलपाखराने सुखाचं झाड सोडून आपलं बस्तान दुसऱ्या झाडावर बसवण्याचा निर्णय घेतला.

जाण्यापूर्वी त्याने झाडावरच्या देवापक्षाला नाराजी बोलून दाखवली. देवापक्षी रागाने लालबुंद झाला.. 'तुझी सुखाची झोप मी उडवल्याशिवाय राहणार नाही.. ध्यानात ठेव' तरीही फुलपाखराने काही ऐकलं नाही. 'मी झोपेचा त्याग करेन' असं म्हणत सणसणीत उत्तर दिलं.

देवापक्षी जाम संतापला होता. असेच एकेक पक्षी उडून गेले तर आपल्या झाडावरचा किलबिलाट कमी होईल, दुसऱ्या झाडावरचे पक्षी आपला मान राखणार नाहीत, आपलं झाडच आपल्यावर रुसेल, अशी भीती देवापक्षाला सतावत होती. त्यामुळे देवापक्षाने जातोय कुठे, असं म्हणत फुलपाखराचा पाठलाग केला.

तर हे फुलपाखरु इथे-तिथे नाही तर थेट बारागावी असलेल्या भल्यामोठ्या वडाच्या झाडावर जाऊन बसलं. झाडाच्या शेंट्यावर वस्ताद नावाचा गरुड बसला होता. 'आलास फुलपाखरा.. ये-ये' असं म्हणत वस्तादाने फुलपाखराचं स्वागत केलं. फुलपाखरु छाती ताणूनच वस्तादासमोर उभं राहिलं.

'आलोय मी.. आता मी कशी त्यांची जिरवतो बघा. फक्त मला सुखाची झोप पाहिजे, तेवढी द्या..' फुलपाखराने मनातलं सांगितलं. वस्तादाने चोहोबाजूला तीक्ष्ण नजर टाकली. पिंपळात दडून बसलेला देवापक्षी वस्तादाने हेरला होता.

वस्ताद म्हणाले, 'ऐकून घे फुलपाखरा.. कायम डोळे उघडे ठेवून झोपायचं, कोण-कधी-कुठून-कसा हल्ला करेल याचा नेम नसतो. तुझे शत्रू आता वाढले आहेत. त्यामुळे आमच्या झाडावर एकतर कमी झोपायचं आणि झोप आलीच तर डोळ उघडे ठेवायचे... यालाच सुखाची झोप म्हणतात.'

फुलपाखराच्या इवलुशा कपाळावर आठ्या पडल्या.. 'तुम्ही तर म्हणाला होता दिवसरात्र झोपायचं.. बिनधास्त रहायचं, मी असल्यावर इकडे फिरकायची कुणाची हिंमत नाही.. मग?' डोळे उघडे ठेवून कसं झोपणार? आणि यात सुख कुठंय?

वस्ताद म्हणाले, 'जसा तू आलास तसेच एकेकजण माघारी येतायत.. एकदा का सगळे आले की मग आपल्याला खरंखुरं सुख मिळणार, मग वाट्टेल ते करा अन् वाट्टेल तसं राहा... सुखच सुख पू्र्वीसारखं, आठवतंय ना ते सुख?'

'हो..होS. चांगलंच!' असं म्हणत फुलपाखराचे डोळे जुन्या सुखात बुडाले.. स्वप्न रंगवत रंगवत जागं राहण्याची सवय आता त्याला लावून घ्यायची होती.. डोळे उघडावे अन् काळी कोठडी दिसावी, या भीतीपोटी त्याची गाळण होई.

समाप्त!

गोफण- भाग 57

Santosh Kanade

Email: santosh.kanade@esakal.com

'गोफण'चे मागील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - धनंजय पोवारचा घरातला प्रवास संपला, डीपी दादा झाले घराबाहेर

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नरधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

Latest Maharashtra News Updates: : पुणे- मुंबई मार्गावर खासगी बसला आग

SCROLL FOR NEXT