sakal gofan article esakal
महाराष्ट्र बातम्या

गोफण | आमच्याही पक्षात कलाकार पाहिजे!

Gofan Satire Article: ''काय म्हणता?'' सखारामबुवा खुलले होते. ''माझं झाडाझुडूपाचं काम ह्यवढं आवडलं दादाराजेला? पण आपल्याला फुल्ल इज्जत पाह्यलेज.. अजिबात मजाक-मस्ती खपायची न्हाई. नाहीतर म्हणाल गल्लीत गोंधळ घालून दिल्लीत मुजरा करा..''

संतोष कानडे

मजल दरमजल करीत दोन यापारी एकदाचं त्या गावकुसात येऊन पोचलं. गाव हेरुन त्यांनी कडच्या उंच डोंगरावर नजर मारली. ''इथेच असणार त्यो'' असं पुटपुटत झपाझप पावलं टाकत डोंगर चढायला सुरुवात केली. डोंगराच्या बरगडाला एका कवठाच्या झाडाखाली एक खासा इसम बीडी फुकत निवांत बसला व्हता.

दोघांनी त्याला इच्चारलं, ''सखाराम कुठं घावल बाबा..'' त्या बाबानं एक कटाक्ष टाकत माघारी इचारलं, ''कोण सखाराम?''

''कोण सखाराम काय इच्चारता? सखाराम बाईंडर''

नाव ऐकताच त्या बाबानं ढेकळावर रगडून बीडी इजिवली. बसा की वाइस, कुठून आलात पाव्हणं? काय काम काढलंत सखारामाकडं?

त्या दोघांनी बुड टेकवलं. डेऱ्यातलं गार पाणी घशात घटाघटा घोटलं. जरा शहाणं झाल्यासारखं वाटल्यावर त्यातला एक बोलला, आमी दादाराजेंची माणसं.. सखारामला राजेसायबानी बोलावणं धाडलंय.. हाय तसा घ्येऊन या म्हण्लेत.

बोलणं आयकताच बाबाच्या कपाळावर घाम डबडबला. पण नेहमीची बेफिकीरी दाखवून बाबा बोलले, ''आमचा सखाराम ग्वाड माणूसय, त्याच्यावर दादाराजेंची खप्पामर्जी काय म्हणून? याच्याअगुदर राजानी सखारामाचं त्वांड भरुन कवतिक केलं व्हतं की!''

''आवं बाबा, कोण म्हण्तं खप्पामर्जी? रागबिग काय न्हाय बगा. फकस्त घ्येऊन या म्हणलेत.. तुमी कुठं घावल त्ये सांगा''

बाबा जरा चिडलेच, ''ऱ्हाव द्या पाव्हणं. म्या क्या पत्ता द्यायचा ठेका घ्यातलाय तवा. जावा तुमचं तुमी बघा.. नीट इच्चारलं तर नीट उत्तर द्यावा म्हाताऱ्या माणसाला.''

दोघातला एक जरा बाबाच्या कानाजवळ आला, ''बाबा कसंय.. तुमच्या सखारामाला कलाकार म्हणून पवारशाहीच्या दरबारात मानाचं पद मिळणारे.. त्या शिंदेशाहीने परक्या गोईंदाला कसा दरबारात घेतला.. तसा''

आता तर बाबा उचकलेच, ''काय ब्वालता पाव्हणं.. तुमच्या राजाला जाऊन सांगा, ह्यो सखाराम असं कुणापुढंबी त्वांड रंगवून नाचणार न्हाई.. समजलंत काय? सातासमुद्रापलीकडं मानमरातब राखलेला माणूसय.. असातसा नाय''

ते दोघे चक्रावलेच, ''बाबा तुमाला काय मनून एवढा रागलोभ.. तुमी आपलं सखारामाचा पत्ता सांगा.. तुमचं काय हेवढं?''

बाबा बोलले, ''माझं काय? आवं मीच सखाराम. हिकडं गावात, रानात, जंगलात आल्यावर मी असाच दिसतो.. नाकातोंडात फुफुटात जातो. म्हणून तर तुम्ही चुकलात.''

त्या दोघांना जरा हाबाडाच बसला.. मंग कुठं गयावया कराया लागले, ''आवं सखाराम बुवा.. माफ करा-माफ करा, आमचं चुकलंच. पण खरंच सागतो, तुमचा मानमरातब ठेवायला तुमाला बोलावलंय. तुमाला अजिबात कलाकारी दावायची गरज नाही. दादाराजेंना तुमचं रानावनातलं कामच जाम आवडलंय.''

''काय म्हणता?'' सखारामबुवा खुलले होते. ''माझं झाडाझुडूपाचं काम ह्यवढं आवडलं दादाराजेला? पण आपल्याला फुल्ल इज्जत पाह्यलेज.. अजिबात मजाक-मस्ती खपायची न्हाई. नाहीतर म्हणाल गल्लीत गोंधळ घालून दिल्लीत मुजरा करा..''

''नाही वं..नाही वं'' म्हणत व्यापाऱ्याचं सोंग घेऊन आलेल्या दोघांनीही आपली खरी ओळख करुन दिली. एक होते गोदाकाठच्या पंचवटीचे नटसम्राट, दरबारातले मानाचे मंत्री मगनराव बाहुबळे आणि दुसरे होते दादाराजेंचे प्रमुख सरदार सुनाजी तंटेकरे.

दोघांनीही आहे तशाच स्थितीत सखारामबुवांना उचलून नेलं. बुवांच्या दोन्ही खिशात झाडांच्या गोळा केलेल्या बिया होत्या.. जाता-जाता जमेल तसं बिया उधळत ते 'जय श्रीराम'चा नारा देत होते. जे पेराल तेच उगवतं, असं बुवा नेहमी सांगत.. आज ते एक नवीन झाड लावायला निघाले होते, त्या झाडाला कुठली फळं येतात, हे अगदी महिन्याभरात कळणार होतं.

समाप्त!

गोफण- भाग 58

Santosh Kanade

Email: santosh.kanade@esakal.com

'गोफण'चे मागील भाग वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT