विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर आधारित प्रसाद ओक दिग्दर्शित सिनेमा येतोय. त्याचं कथानक फिरतंय एका मुरब्बी राजकारणी आणि एका लावणी नृत्यांगणेभोवती. घुंगराच्या तालात हरवलेल्या राजकारण्याची भूमिका साकारली आहे आदिनाथ कोठारे यांनी तर नृत्यांगनेची भूमिका साकारली आहे अमृता खानविलकर यांनी. सिनेमाचा ट्रेलर आल्यापासून त्याची चर्चा जोरदार सुरु होतीच पण यानिमित्ताने महाराष्ट्रात एका जुन्या प्रकरणाची चर्चा मात्र पुन्हा नव्याने ताजी झाली. गोपीनाथ मुंडे यांचे बरखा बहार प्रकरण. अनेकजण दावा करत आहेत की चंद्रमुखी हा सिनेमा निश्चितच गोपीनाथ मुंडे यांच्यावर आधारित आहे. तो दावा खरा खोटा हे सिनेमा पाहिल्यावरच कळेल पण आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो कि हे बरखा बहार प्रकरण होतं तरी काय?
राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच. भ्रष्टाचार, काळा पैसा, अनाधिकृत कामे आणि व्यक्तीगत आरोपांना राजकारण्यांना तोंड द्यावं लागतं हे आपल्याला माहिती असेल. त्यातले काही आरोप खरे असतात तर काही आरोप खोटेही असतात. त्यामुळे कधीकधी काही नेत्यांना अशा आरोपाखाली अडकवण्याच्या प्रयत्न करुन खाली खेचण्याचा प्रयत्न केला जातो. असाच काहीसा प्रयत्न मराठवाड्यातील भाजपाचे दमदार चेहरा आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत घडला होता. बरखा पाटील या महिलेशी त्यांचे संबंध असल्याचा आरोप करुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
हा किस्सा आहे डिसेंबर १९९६ मधला. १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाच्या युतीचं सरकार सत्तेत आलं होतं. त्यावेळी भाजपाकडून प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी प्रचाराची मोठी जबाबदारी पार पाडली होती. तर बाळासाहेबांच्या अस्सल ठाकरी बाजातील भाषणाची साथ घेऊन हे सरकार भाजपा आणि शिवसेनेने स्थापन केलं होतं. दरम्यान कॉंग्रेसला विरोधात लढताना सत्ता स्थापन करता आली नव्हती पण प्रचारावेळी शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंवर सडकून टीका केली होती. १९९५ मध्ये सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होत.
भाजप शिवसेनेने जानेवरी १९९५ मध्ये आपले सरकार स्थापन केल्यानंतर आण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहीम काढली होती. त्या मोहिमेअंतर्गत त्यांनी तात्कालीन उपमु्ख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यामध्ये त्यांनी त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे काही कागदपत्रं दाखल केले होते. त्या कागदपत्रात त्यांनी बरखा गोपीनाथ मुंडे आणि प्रतिक गोपीनाथ मुंडे या दोघांच्या नावाने पुण्यात फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप लावला होता.
त्यानंतर हे प्रकरण माध्यमात पसरलं गेलं आणि त्याची जोरदार चर्चा होऊ लागली होती. बरखा नावाची आणि गोपीनाथ मुंडे यांचं नाव लावणारी ही बाई कोण आहे? अशा चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यांना जनतेच्या आणि विरोधकांच्या टिकेला सामोरं जावं लागलं होतं. प्रकरण वाढल्यामुळे त्यांनी खुलासेही केले होते पण आरोप थांबले नाहीत. गोपीनाथ मुंडे यांनी या दोघांच्या नावे फ्लॅट खरेदी करुन दिला असून ते पुण्यात आल्यावर त्या फ्लॅटवर आरामासाठी जातात असे आरोपही त्यांच्यावर झाले होते.
कोण होत्या बरखा पाटील ?
बरखा पाटील पुण्यातील चौफुला येथील राहणाऱ्या एक नृत्यांगणा (तमाशा कलावंत) होत्या. त्यांना एक मुलगा होता. आपल्या मुलाच्या आणि आपल्या नावापुढे गोपीनाथ मुंडे यांचं नाव लावायच्या. बरखा आणि त्यांच्या मुलाच्या नावाने पुण्यात फ्लॅट खरेदी केल्यावरुन हा वाद निर्माण झाला होता पण बरखा पाटील यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर कसलेच गंभीर आरोप केलेले नव्हते. आण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या मोहिमेंतर्गत सादर केलेल्या पुराव्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं होतं.
प्रकरणानंतर काय झालं?
या प्रकरणाची माध्यमांत आणि लोकांमध्ये एवढी चर्चा झाली की त्यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली होती. या प्रकरणामुळे त्यांना त्यांच्या व्यक्तीगत आणि राजकीय जीवनात प्रचंड त्रास झाला होता. या प्रकरणाच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येत होत्या त्यामुळे हे प्रकरण खेड्यांपर्यंत पोहचलं होतं. त्यांच्यावर व्यक्तीगत आरोप लावल्यामुळे त्यांना काही लोकांपासून त्रासही झाला पण ते उपमुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना राजकीय टीका आणि रोषाला तोंड द्यावं लागलं होतं.
प्यार किया तो डरना क्या...? अस म्हणत बाळासाहेबांचा पाठिंबा
हे प्रकरण लोकांमध्ये पसरल्यानंतर मुंबईतील एका पत्रकार परिषदेत शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. ते दोघे एका पत्रकार परिषदेत बोलत असताना बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी भाषेत गोपीनाथ मुंडेंकडे पाहत "ठीके गोपीनाथराव, प्यार किया तो डरना क्या?" असं म्हटलं होतं. बाळासाहेबांच्या या वक्तव्याचीही जोरदार चर्चा माध्यमांमध्ये त्यावेळी झाली होती. शिवसेनेच्या सामना या वर्तमानपत्रात "प्यार किया तो डरना क्या?" अशा हेडिंगने पहिल्या पानावर बातमी छापून आली होती. त्यामुळे बाळासाहेबांनी गोपीनाथरावांना पाठिंबा दिला अशाही चर्चा झाल्या होत्या.
मुंडे यांच्यावरील अजूनही काही आरोप
त्या घटनेनंतर गोपीनाथ मुंडे यांच्यावर आणखी काही आरोप लावले गेले होते. बरखा पाटील प्रकरणानंतर काही महिन्यांतच एका वर्तमानपत्राने एका मुलीचा शाळेचा दाखला छापला होता. शितल गोपीनाथ मुंडे असं त्या मुलीचं नाव होतं. तेव्हाही त्यांच्यावर आरोप झाले होते आणि त्याप्रकरणी त्यांना माध्यमांना खुलासे द्यावे लागले होते. पण बरखा प्रकरणानंतर त्यांच्यावर खूप टीका झाली होती आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणीही केली होती. त्यामुळे बरखा प्रकरणाचा त्यांना राजकीय आणि व्यक्तीगत जीवनात खूप त्रास झाला होता.
कसं निवळलं प्रकरण
या घटनेनंतर काही दिवसांतच गोपीनाथ मुंडेंनी हे प्रकरण त्यांचे मित्र आणि जेष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या कानावर घातली. त्यावेळी गोपीनाथ यांनी "आमच्या लग्नातही आम्ही गाणेबजावणे करतो, माझ्या समाजात आणि गावात असं सारं चालतं....हे शहरी नियम आम्हाला कशाला लावता राव? अशी व्यथा त्यांनी द्वादशीवार यांना सांगितली. ‘तेव्हा सुरेश द्वादशीवार यांनी अण्णा हजारेंची भेट घेऊन एका चांगल्या होतकरू आणि स्वकष्टाने वर आलेल्या बहुजन समाजातल्या कार्यकर्त्याचा असा हिरमोड कशासाठी? असं समजावून सांगितलं. अण्णा हजारेंनी गोपीनाथ मुंडे यांना भेटायला बोलावलं व हे घुंगराचं प्रकरण अखेर संपुष्टात आलं.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्यापुढील राजकीय कारकिर्दीत बरखा बहार या घटनेचा पुन्हा अडथळा कधीच आला नाही.
संदर्भ :- दैनिक भास्कर, ABP माझा, साधना साप्ताहिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.