राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून बहुतेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज पुणे आणि मुंबईसह आणखी पाच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. तर राज्यात आठवड्यात मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज राज्यातील पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोकणात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. आज सोमवारी (ता. १८) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जैसलमेर, कमी दाब क्षेत्राचे केंद्र, सागर, दाल्टोनगंज जमशेदपूर, दिघा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. उत्तर अंदमानात समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.
पुण्यात पावसाच्या हलक्या सरी
गेल्या आठवडाभरापासून सुटीवर असलेल्या पावसाने अखेरीस सार्वजनिक सुटीच्या दिवशी शहर आणि जिल्ह्यात हजेरी लावली. रविवारी (ता. १७) पहाटेपासूनच अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, तर दिवसभर ढगाळ हवामान पाहायला मिळाले.
गौरी-गणपतीच्या पार्श्वभूमीवर शहरात रविवारी नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. पण सकाळपासूनच रिमझीम पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची तारांबळ उडाली. तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
सध्या पुण्यासह राज्यातच मॉन्सूनसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे दिवसभर सामान्यतः ढगाळ वातावरण आणि सकाळी किंवा संध्याकाळी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे गणेशाच्या आगमनाच्यावेळी वरुणराजाची हजेरी लागण्याची दाट शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.