मुंबई : ‘‘कोविडकाळात निर्माण करण्यात आलेल्या पीएम केअर फंडासह ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच नागपूर महापालिकेतील व्यवहारांचीही उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. तसेच तुमच्यात हिंमत असेल तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व राज्यांच्या कारभाराची चौकशी करा,’’ असे आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिले.
ज्या सरकारचा जन्मच खोक्यातून झालेला आहे, ते काय चौकशा करणार, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. मुंबई महापालिकेत कोविडकाळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत त्या काळातील खरेदीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांपासून तत्कालीन पालिका अधिकारीदेखील चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.
या प्रकरणात ठाकरे कुटुंबीयांचे नाव घेतले जाऊ लागल्याने संतापलेल्या ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्रातील भाजप सरकारबरोबरच शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला. मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि नगरसेवकांचा मेळावा आज शिवाजी मंदिर सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
मुद्दाम मुफ्तींच्या बाजूला बसलो
पाटण्याला आपण मुद्दामच मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्याचे ठाकरे यांनी सांगत मुफ्ती यांना ३७० कलम उठवणार नाही, असे आश्वासन देत त्यांच्यासोबत सरकार स्थापल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचे मुफ्ती तसेच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबतचे फोटो दाखवत माझ्याकडे अल्बमच करून ठेवलाय, असेही ते म्हणाले. हे वागणे चुकीचे असेल, तर तुमचे नेतेही गुन्हेगार आहेत, त्यावर बोला, असे प्रत्युत्तर फडणवीसांना देताना आपण मुद्दामच मुफ्तींच्या बाजूला बसलो असल्याचे त्यांनी सांगितले.
फडणवीस यांनी खालच्या पातळीवर येऊ नये
मी पाटण्याला गेलो, तर हे कुटुंब वाचवायला गेले म्हणतात. फडणवीसांनी इतक्या खालच्या पातळीवर येऊ नये. कुटुंब त्यांनाही आहे, अनेक व्हॉट्सअॅप चॅट बाहेर येत आहेत. आम्ही अद्याप त्यावर बोललेलो नाही. त्यावर बोलावे लागले तर त्यांना केवळ शवासन करावे लागेल. मी माझ्या कुटुंबाबाबत संवेदनशील आहे, मी माझे कुटुंब जपणार, असेही ते म्हणाले.
माझे कुटुंब खुली किताब : फडणवीस
‘‘मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजप परिवार एक खुली किताब आहे, उद्धव ठाकरे. मुंबई कुणी लुटली, मृतांच्या टाळूवरचे लोणी कुणी खाल्ले याचे उत्तर द्या,’’ असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांना ट्विटरवरून दिले.
‘‘आमच्या घरात शिरू नका, आम्ही तुमच्या घरात शिरु,’’ असे सांगत तुमच्या घरचे व्हॉट्सॲप चॅट उपलब्ध असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. हे विधान बुकीच्या मुलीने अमृता फडणवीस यांना केलेल्या व्हॉट्सॲपबाबत असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी ‘‘ज्या व्हॉट्सअॅप चॅटबाबत तुम्ही बोलताय, ते आता आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत.
कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही,’’ असे सांगितले. चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर सामान्य शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्रिपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर बोला, मराठी माणसाला कुणी ओरबाडले, १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले याबद्दल बोला असे आव्हान फडणवीस यांनी दिले. आता शवासन कुणाला करावे लागते ते कळेलच, अशा आक्रमक भाषेत या ट्विटचा शेवट करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.