नागपूर - प्रत्येक ठिकाणच्या संस्कृतीची प्रतिके असणारी स्मारके अन् संग्रहालयांचे लवकरच रुपडे पालटणार आहे. राज्यातील अशा विविध ठिकाणांची डागडुजी आणि जतन करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ४२ तज्ज्ञ वास्तुविशारदांशी (आर्किटेक्चर) करार केला आहे.
त्यामुळे, हजारो वर्षांचा इतिहास जपणाऱ्या या वास्तूंना लवकरच नवी झालर लागलेली पाहायला मिळणार आहे. राज्य शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या अखत्यारीत येणारे हे संग्रहालय व स्मारक आहेत.
जतन व दुरुस्तीची कामे पुरातत्त्वशास्त्र संकेतानुसार, मूळ स्थापत्यरचना कायम ठेवून व्हावीत, संग्रहालयशास्त्रानुसार संग्रहालयाची उभारणी, विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक व्हावीत या दृष्टीने राज्य शासनाच्या या विभागाने खाजगी वास्तुविशारदकांशी करार केला आहे.
या अंतर्गत नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयासह (अजब बंगला) राज्यभरातील १३ संग्रहालयांचा कायापालट होणार आहे. संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट), माती परीक्षण चाचणी (सॉईल टेस्टिंग), भूचाचणी (जिओ टेस्टिंग) तसेच संवर्धन पूर्व गरजेच्या असलेल्या सर्व चाचण्या या वास्तुविशारदकांना कराव्या लागणार आहे.
वाघनखांचेही निमित्त
लंडन येथून आणण्यात येणारी वाघनखे १६ नोव्हेंबर २०२३ ते १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत राज्यातील विविध संग्रहालयांमध्ये राहणार आहेत. या निमित्त संग्रहालयांमधील वर्दळ वाढणार आहे. शिवाय, सुरक्षेचे कारणही महत्त्वाचे आहे. त्यामुळे, राज्यातील संग्रहालयांत दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत.
अजब बंगल्याचा विस्तार
अजब बंगला म्हणून ओळख असलेल्या मध्यवर्ती संग्रहालयाला १३० वर्षांचा इतिहास आहे. ब्रिटिशकालीन या वास्तूमध्ये बदल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून जाणकार करीत होते. तसेच, संग्रहालयातील वस्तूंची संख्या पाहता जागा देखील कमी पडत होती.
यामुळे लवकरच अजब बंगल्याच्या इमारतीचा विस्तार करण्यात येणार असून विस्तार होणारी संग्रहालयाची राज्यातील ही एकमेव इमारत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही वास्तू सुसज्ज करण्यात येईल. त्यासाठी वास्तुविशारद आराखडा तयार करीत आहेत.
जुनी इमारत, इमारतींचा विस्तार आणि वाघ नखांच्या आगमनाच्या दृष्टीने राज्यभरातील या संग्रहालयांची दुरुस्ती होणार आहे. काही इमारती अत्यंत जुन्या झाल्याने भेट देणाऱ्यांच्या सोयीसाठी संग्रहालयांमध्ये आवश्यक बदल करण्यात येत आहेत.
- अमोल गोटे, सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.