K. Chandrashekar Rao Sakal
महाराष्ट्र बातम्या

BRS: भारत जिंकण्यासाठी BRS पोहचली संघभूमीत, मोदींना फाईट देण्याचं स्वप्न बघणारे KCR कोण?

भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे.

राहुल शेळके

K. Chandrashekar Rao BRS: भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांनी पक्षाचे पहिले कार्यालय नागपुरात थाटले आहे. आज के. चंद्रशेखर राव नागपूर दौऱ्यावर आहेत.

बीआरएसच्या विस्तारासाठी चंद्रशेखर राव यांनी नांदेड येथे पक्षाचा मोठा सोहळा घेतला होता. तसेच बीआरएस पक्ष विदर्भात विस्तारासाठी प्रयत्न करत आहे. बीआरएस पक्ष महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अनेक नेत्यांच्या संपर्कात आहे.

चंद्रशेखर राव राज्यातील शेतकऱ्यांना जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील जाहीर सभांमध्ये तेलंगणा सरकारच्या वतीने शेतकरी आणि दलित समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘रयतू बंधू’ आणि ‘दलित बंधू’ या दोन योजनांचा प्रामुख्याने ते उल्लेख करत आहेत.

महाराष्ट्रातील शेतकरी आणि दलित समाजाला या योजना राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. भारत राष्ट्र समिती पक्षाचा मुख्य केंद्रबिंदू शेतकरी आणि दलित समाज आहे.

केसीआर सरकारच्या वतीने तेलंगणामध्ये विविध निर्णय घेण्यात आल्याने महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांना भारत राष्ट्र समितीचे आकर्षण वाटू लागले आहे.

के. चंद्रशेखर राव हे सुरुवातीला युथ काँग्रेसमध्ये होते. एनटी रामाराव यांच्या तेलगु देसम पार्टी मध्ये त्यांनी प्रवेश केला, त्यावेळी ते तेलगु अस्मितेने भारावलेले होते. तेलगु देसम पक्षाकडून त्यांना आमदारकी, खासदारकी पासून ते मंत्रीपदापर्यंत काम करण्याची संधी मिळाली.

आंध्रप्रदेश आणि तेलंगणाचा वाद चंद्राबाबू नायडू यांच्या काळात चव्हाट्यावर आला होता तेव्हा ते मुख्यमंत्री होते.

काय आहे आंध्रप्रदेश आणि तेलंगणा वाद?

आंध्रप्रदेश आणि तेलंगणा वादाला मोठा इतिहास आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशींनुसार, तत्कालीन हैदराबाद (तेलंगण) प्रांत भाषिक आधारावर आंध्र प्रदेशात विलीन करण्यात आला होता.

परंतु राज्याचा हा भाग इतर भागांच्या तुलनेत आर्थिक, शैक्षणिक आणि इतर सर्वच पातळ्यांवर मागासलेला होता. यानंतर लगेचच तेलंगणाला वेगळे राज्य करण्याची मागणी पुढे आली होती. तेव्हापासून आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांचा वाद चर्चेत आहे.

के चंद्रशेखर राव यांचा प्रवास:

के चंद्रशेखरराव यांनी 27 एप्रिल 2001 ला तेलगु देसम पार्टीचा राजीनामा दिला आणि तेलंगणा राष्ट्र समिती नावाचा पक्ष स्थापन केला.

काँग्रेसचे वाय एसआर रेड्डी जो पर्यंत मुख्यमंत्री होते तो पर्यंत चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचा विकास झाला नाही. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाला काँग्रेसने हरवले आणि तेव्हा सगळ्यांना वाटलं की तेलंगणाचा मुद्दा आता कालबाह्य झाला आहे.

परंतु काँग्रेसला निवडणुक जिंकून देणारे वायएसआर रेड्डींचे अपघाती निधन झाले आणि आंध्रमध्ये काँग्रेस पक्ष कमजोर झाला.

वाय एसआर यांच्या चिरंजीवाला त्यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पडलं होत पण घराणेशाहीवर शिक्का नको म्हणून त्यांना ते पद नाकारण्यात आलं होतं. काँग्रेस फोडून जगमोहन रेड्डी यांनी वायएसआर काँग्रेस नावाचा नवा पक्ष स्थापन केला.

चंद्रशेखर राव यांचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जोडण्याचा प्रयत्न

झालेला घोळ निस्तरण्यासाठी काँग्रेसने हात पकडला तो चंद्रशेखर राव यांचा. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा वेगळे राज्य बनवण्याच्या बदल्यात पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे आश्वासन त्यांनी सोनिया गांधीना दिले. मनमोहनसिंग सरकारनेही ही मागणी मान्य केली.

पण ऐनवेळी चंद्रशेखर राव यांनी काँग्रेसला धोका दिला. तेलंगणा राज्य बनले पण चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष काँग्रेसमध्ये विलीनच केला नाही. त्यामुळे काँग्रेसची मोठी गोची झाली. तेव्हापासून काँग्रेसचे राजकीय शत्रू चंद्रशेखर राव आहेत.

के चंद्रशेखर राव यांचे निवडणुकीतील यश:

2014 मध्ये वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती झाली तेव्हा के चंद्रशेखरराव पहिले मुख्यमंत्री झाले. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 119 पैकी 63 जागा जिंकल्या. 2014 च्या मोदी लाटेतही ते जिंकून आले हे विशेष.

2018 च्या अखेरीस झालेल्या दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 88 जागा जिंकल्या. दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर आला.

2014 मध्ये काँग्रेसकडे 21 जागा होत्या आणि 2018 मध्ये काँग्रेसला फक्त 19 जागा मिळाल्या होत्या. शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि कर्जमाफी या महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे केसीआर यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली.

तेलंगणा राष्ट्र समिती ते भारत राष्ट्र समिती:

9 डिसेंबर 2022  हा दक्षिणेच्या राजकारणातील महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो कारण तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या TRS चे नाव बदलून भारत राष्ट्र समिती केले. राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याचा केसीआरचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जाते.

निवडणूक आयोगाने TRS चे नवीन नाव BRS असे मंजूर केले. तेलंगणा राष्ट्र समिती (TRS), प्रादेशिक राजकारणात महत्त्वाचा असलेला दोन दशके जुना पक्ष, KCR यांना राष्ट्रीय नेता म्हणून प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने त्यांनी या पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती (BRS) असे केले.

तेलंगणा राज्याच्या निर्मितीचा अजेंडा घेऊन TRS पक्षाची स्थापना 2001 मध्ये झाली होती. आता मुख्यमंत्री केसीआर यांना राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळेल की उत्तर भारतासह इतर राज्यांमध्ये त्यांचे नेतृत्व स्वीकारले जाईल हा येणारा काळाच ठरवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT