नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे आदर्श आहेत. साहित्य संमेलनात त्यांचा अवमान होत असेल तर तेथे जाऊन तरी काय करायचे? असा सवाल करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनाला भेट देण्याचे टाळले. अवॉर्ड वापसी, नाराजी व टीका असे एक ना अनेक प्रयत्न झाले, परंतु लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे असल्याने काही साहित्यिक व कथित विचारवंत एकांगी बोलत आहे. कुठल्यातरी विचाराने प्रभावित होऊन ते बोलत असून ते नैराश्यग्रस्त झाल्याची टीका त्यांनी जावेद अख्तर यांच्यावर केली.
आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे हिंदी कवी जावेद अख्तर यांनी पूर्वीच्या काळी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात साहित्यिक एकत्र येऊन विरोध करायचे परंतु आता तशीच स्थिती निर्माण झाल्याचे वक्तव्य केले होते. कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आहेत. संमेलन होत असलेले नाशिक सावरकरांची कर्मभूमी आहे.
यापूर्वी साहित्य संमेलनच नव्हे तर नाट्यसंमेलन, पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदसुद्धा सावरकरांनी भूषविले आहे. अशा प्रकारचा बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव व्यक्ती आहेत. साहित्य संमेलनस्थळाला कुसुमाग्रजांचे नाव दिले, त्याचे स्वागतच; परंतु केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून या दोन्ही महान व्यक्तींची उंची कमी केली जात आहे. आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान व आदर असून, संमेलनालासुद्धा शुभेच्छा आहेतच; परंतु जेथे आमचे आदर्शच (सावरकर) अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे, असा सवाल करीत श्री. फडणवीस यांनी संमेलनावर बहिष्कार टाकला.
हा तर शिवसेनेचा निर्लज्जपणा
शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना सावरकरांचे वारसदार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘‘शिवसेना सावरकरांची कसली वारसदार? असे बोलायला लाज वाटली पाहिजे. दोन दिवसांपूर्वी संसदेत खासदारांचे निलंबन झाले तेव्हा माफी मागायला आम्ही सावरकर आहोत का? असे शिवसेना सदस्यांचे बोल होते. हा निव्वळ निर्लज्जपणा आहे.’’ संजय राऊत काँग्रेसचे प्रवक्ते असल्यासारखे बोलत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्यांना प्रखर विरोध केला आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याची टीका फडणवीस यांनी केली.
सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? ; राऊत
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची शिवसेना हीच खरी वारसदार असून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्याच विचारांचे पालन करत होते. भाजपला सावरकरांबाबत एवढे प्रेम होते तर मग त्यांना भारतरत्न हा सन्मान का देण्यात आला नाही? असा थेट सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांना केला आहे. बाळासाहेबांनी सावरकरांचाच हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचे काम केले. आम्ही घाबरट नाही. ‘हिंदुत्वा’च्याबाबतीत देखील आम्ही कधीही यूटर्न घेतलेला नाही. राम विलास पासवान यांनी राममंदिराबाबत जी वक्तव्ये केली होती, त्यानंतरही त्यांच्या मांडीला मांडी लावून कोण बसले होते? असा सवाल देखील राऊत यांनी केला.
आज समारोप
मराठी साहित्य संमेलनाचा समारोप उद्या (ता. ५) सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होईल. या समारोप कार्यक्रमासाठी पवार आणि चपळगावकर यांचे आज शहरात आगमन झाले आहे. दरम्यान राज्यातील मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत. त्याबद्दलची चिंता आज साहित्य संमेलनाच्या स्वागत समिती सदस्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. तसेच मराठी शाळा सुरू राहण्यासाठी सरकारने काळजी घेत असताना अनुदान द्यावे, अशी आग्रही मागणी सरकारकडे केली जाणार आहे. निफाडमधील न्या. महादेव गोविंद रानडे यांचे स्मारक पूर्णत्वास जावे आणि वामनदादा कर्डक व बाबूराव बागूल यांचे स्मारक नाशिकमध्ये व्हावे, असा प्रस्ताव यजमानांतर्फे देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.