imd predicted monsoon winds active in central india including maharashtra agriculture water shortage Esakal
महाराष्ट्र बातम्या

Monsoon Update : मॉन्सून दाखल होऊनही राज्यात उष्णतेची लाट कायम; पेरण्या रखडल्या; धरणसाठा तळाशी, वाचा सविस्तर

मृग नक्षत्र सुरु होऊन आठवडा उलटला तरी पावसाने हुलकावणी दिल्याने पेरण्या रखडल्या असून शेतकरी चिंतेत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात मॉन्सून दाखल होऊनही तो अद्याप बरसला नसल्याने बळीराजाचे डोळे आभाळाकडेच लागलेले आहेत. मृग नक्षत्र सुरु होऊन आठवडा उलटला तरी पावसाने हुलकावणी दिल्याने पेरण्या रखडल्या असून शेतकरी चिंतेत पडला आहे.

त्यामुळे कृषी विभागानेही ‘पुरेशी ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये,’ असा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. राज्यात सध्या खरीपाच्या १४२ लाख हेक्टरपैकी (ऊस वगळून) केवळ एक लाख ४४ हजार हेक्टरवरच पेरणी झाली आहे.

राज्यातील धरणांनी तळ गाठल्याने आता शेतीसाठी पाणी सोडणे अशक्य असल्याचीही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारकडून मदतीची भूमिका कधी घेतली जाणार? याकडे नजर लागली आहे.

राज्यात अनेक भागांत यंदा वळवाचा पाऊस पडलाच नाही. मृग नक्षत्र लागले की पेरण्या सुरू होतात. मात्र, आठ जूनपासून मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर एक आठवडा उलटला तरीही मॉन्सून फिरकलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जमिनीच्या मशागती करूनही पावसाअभावी पेरणी करता येत नाही, अशी स्थिती आहे. राज्यात यंदा जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांत केवळ साडेपाच मिलिमीटरपर्यंत पाऊस झाल्यामुळे चिंता वाढली आहे.

अर्थात, गेल्या वर्षीदेखील याच कालावधीत पाऊस १० मिलिमीटर झालेला होता. मात्र जमेची बाजू अशी होती, की गेल्या खरिपात वळवाच्या पावसामुळे काही भागांत ओल तयार झाली होती व मृगात पेरण्यांना चांगली सुरुवात झालेली होती. यंदाची स्थिती बिकट दिसत आहे.

अभ्यासकांचा अंदाज

हवामानशास्त्र अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मेच्या अखेरीस पक्षांनी घरटी बांधण्यास सुरवात केल्याचे आढळल्याने महिनाभर मॉन्सूनची खोळंबा होईल, असे संकेत मिळाले होते. कृषी विभागाचे अधिकारी १२ ते १३ जुलैच्या आसपास पेरणीलायक पाऊस होण्याची शक्यता वर्तवत आहेत. हवामानशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात चांगली पर्जन्यवृष्टी अपेक्षित आहे.

मॉन्सूनच्या विलंबाचे परिणाम

  • मूग, उडीद, ज्वारीच्या सर्वसाधारण नऊ लाख २४ हजार हेक्टरवरील पेरण्यांवर शेतकऱ्यांकडून फुली शक्य

  • हे क्षेत्र सोयाबीन, कापूस, तुरीकडे किंवा ज्वारीकडे वर्ग होण्याची शक्यता

  • यामुळे बाजारात भाववाढीचे संकट ओढावण्याची शक्यता

  • राज्यातील ५४७ गावे आणि १,४०४ वाड्यांना ४२६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

थोडक्यात महत्त्वाचे...

  • राज्यात खरीप पिकांखाली असलेल्या केवळ १.२९ टक्के क्षेत्रावरच पेरणी.

  • राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २९९ तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा २५ टक्के सुद्धा पाऊस नाही.

  • सोयाबीन, तूर, ज्वारी, कापूस अशा पिकांची पेरणी खोळंबली

  • धरणांमध्ये जलसाठा २४ टक्के

सरकारकडून अपेक्षा

  • आर्थिक अडचणीवर उपाय म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधीचे तिन्ही हप्ते मिळावेत

  • जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था व्हावी

  • शैक्षणिक शुल्कासह प्रवास भाड्यात विद्यार्थ्यांना मिळावी सवलत

  • विम्यासह पीककर्जाची प्रभावी अंमलबजावणी केली जावी

पेरण्यांसाठी योग्य स्थिती निर्माण होण्यासाठी २५ ते ३० मिलिमीटर क्षमतेचे कमीत कमी चार ते पाच पाऊस होणे आवश्‍यक आहे. साधारणतः एकूण १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर ओल पुरेशी खोलवर जाते. त्यामुळे पेरा केल्यानंतर बियाणे उगवण्यास अडचण येत नाही. राज्यभर पुरेसे बियाणे उपलब्ध आहे. मात्र उगवण चाचणी केल्यानंतरच बियाण्यांचा उपयोग करणे गरजेचे आहे.

- दिलीप झेंडे, राज्याचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : भाजप 100 जागांवर आघाडीवर, सलग तीन निवडणुकांमध्ये केले शतक पार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती 200 पार; महाविकास आघाडीची मोठी निराशा

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

SCROLL FOR NEXT