Dr Balaji Tambe Sakal
महाराष्ट्र बातम्या

घराघरांत पोचविले आयुर्वेदाचे महत्त्व

श्रीगुरू बालाजी तांबे यांनी संतुलन ओम मेडिटेशन (एसओएम) आणि संतुलन क्रिया योग (एसकेवाय) ही तंत्रज्ञाने विकसित केली होती.

सकाळ वृत्तसेवा

पूर्ण नाव : डॉ. भालचंद्र ऊर्फ बालाजी वासुदेव तांबे

जन्म दिनांक : २८ जून १९४०

ठिकाण : बडोदा, गुजरात

कुटुंब : पत्नी श्रीमती वीणा. संजय व सुनील ही मुले

आयुर्वेद, अध्यात्म, भारतीय संगीत, भारतीय परंपरा आणि सण-उत्सव, ध्यानधारणा अशा अनेकविध विषयांत श्रीगुरू बालाजी तांबे यांनी आपला लौकिक निर्माण केला, एवढेच नव्हे तर सातासमुद्रापार त्याचा प्रसार केला. युरोपात कार्यशाळा घेऊन भारतीय विद्यांबाबत जागरूकता निर्माण केली. संगीताचा उपचारासाठी वापराचे चांगले परिणाम जगाला निदर्शनाला आणून दिले. ध्यानधारणा, ओम साधना यांवरही त्यांनी मोठे संशोधन केले. गर्भसंस्काराचा त्यांनी प्रचार केला, तसेच भगव्‌त गीतेवरील त्यांची प्रवचने आणि लेखन खूप गाजले.

संतुलन ओम मेडिटेशन

श्रीगुरू बालाजी तांबे यांनी संतुलन ओम मेडिटेशन (एसओएम) आणि संतुलन क्रिया योग (एसकेवाय) ही तंत्रज्ञाने विकसित केली होती. अध्यात्माला प्रोत्साहन देणाऱ्या ‘आत्मसंतुलन व्हिलेज’ या समग्र उपचार केंद्राची स्थापना केली. त्यांनी जगातील पहिले आणि एकमेव अशा ओम मंदिराची उभारणी केली. अध्यात्मावरील अनेक ग्रंथांचे लेखन केले. यातील अनेक ग्रंथ योगासने, आयुर्वेद आणि तत्सम विषयांना वाहिलेली आहेत. अत्यंत व्यापक संशोधन करून त्यांनी संगीताद्वारे उपचाराच्या काही रचनांची निर्मिती केली. श्रीगुरू बालाजी तांबे यांनी विविध प्रकारची आपली तज्ज्ञता सिद्ध केली आहे.

परदेशातही प्रसार

कार्ला येथे आश्रम असलेल्या श्रीगुरू तांबे यांचे जर्मनीतील म्युनिच, फ्रँकफर्ट आणि ग्लीकेन येथेही वास्तव्य असायचे. आपल्या कार्यातून त्यांचा शिष्य परिवार साऱ्या जगभर पसरलेला आहे. त्यांनी व्यापक अभ्यास, चिंतन, संशोधन तसेच अध्यात्माच्या बैठकीतून तसेच अभियांत्रिकी, आयुर्वेदिक यांच्या ज्ञानातून आपली स्वतःची वेगळी व प्रभावी शैली विकसित केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशात आणि परदेशातही अनेक प्रकल्प आकाराला आणि नावारूपाला आले.

वेदअध्ययनावर भर

वेदातील स्तोत्र आणि मंत्र यांच्या मनुष्याच्या शरीरावर आणि मनावर होणारा परिणाम यावर चार दशकाहून अधिक काळ व्यापक संशोधन आणि तपश्चर्या केली आहे. त्यांच्या संशोधन आणि अभ्यासातून संगीताचे २५ अल्बम साकार झाले आहेत. त्यातील १३ अल्बम टाइम्स म्युझिकने आणलेले आहेत. गरोदर मातांना अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरलेल्या गर्भसंस्कार या अल्बमच्या सात लाखांवर प्रती खपल्या आहेत.

संशोधनपर साहित्य

श्रीगुरू बालाजी तांबे यांनी तीन भाषांमध्ये वीसवर ग्रंथांचे लेखन केले आहे. कार्ला, तसेच जर्मनीतील ग्लीकेन येथे त्यांनी आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर सुरू केले आहे. श्रीमद् भगवतगीतेवर त्यांची ‘साम’ वाहिनीवर मालिका असून, तिचे एक हजारावर भाग प्रसारित झाले आहेत. युरोप आणि अमेरिकेतील अनेक नियतकालिकांत त्यांचे लेख आणि संशोधनपर साहित्य प्रकाशित झाले आहे. मराठीतील अनेक नियतकालिकातही त्यांचे लेखन प्रसिद्ध झालेले आहे. संस्कृतमधील वेदांचे सामान्यांना आकलन व्हावे, ते समजून सांगावेत यासाठी श्रीगुरू बालाजी तांबे यांनी विविध लेख लिहिले आहेत, त्यांचेही एका ग्रंथात संकलन केले आहे.

‘सकाळ’ फॅमिली डॉक्टर

‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्टर’ या पुस्तिकेसाठी श्रीगुरू बालाजी तांबे यांनी शेकडो लेख लिहिले. त्यांनी या पुस्तिकेसाठी दोन दशकांच्या आसपास मार्गदर्शनही केले. आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, आपल्या प्रथा परंपरा आणि त्यांचे महत्त्व, संगीत, सण, उत्सवांमागील आध्यात्मिक व आरोग्य यांची सांगड घालणारे त्यांचे लेख मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत. यातील काही लेखांचा संग्रह करून त्यांना ग्रंथरूपाने प्रसिद्धीही दिली गेली. ‘फॅमिली डॉक्टर’ पुस्तिकेचे अनेक नियमीत वाचकांनी संकलन करून त्याचे मोठे खंडही तयार केले आहेत. फॅमिली डॉक्टर या पुस्तकाच्या एकूण १५ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

वारसा वडिलांकडून

श्री गुरू बालाजी तांबे यांना वैदिक अध्ययनाबाबतचा वारसा घरातूनच लाभला होता. त्यांचे वडील वेदशास्त्रसंपन्न वासुदेव तांबे शास्त्री हे वेद आणि प्राचीन ग्रंथ यांच्या ज्ञानाबाबत अधिकारी व्यक्ती होते. श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई. स्वामी श्री. वासुदेवानंद सरस्वती, श्री रंगावधूत महाराज, श्री लोकनाथतिर्थ महाराज यांचा आशीर्वाद त्यांच्या वडिलांना लाभलेला होता. श्रीगुरू बालाजी तांबे यांच्यावर त्यांच्या वडिलांचे संस्कार आणि प्रतिभासंपन्नता लाभली होती. ते लहानपणापासूनच वेदातील काही भाग म्हणत असत. श्रीगुरू बालाजी तांबे यांना त्यांच्या वडिलांनीच त्या काळातील ख्यातनाम आयुर्वेदाचार्यांचा परिचय करून दिला होता. त्यांच्याकडून आयुर्वेदिक औषधनिर्माणशास्त्र आणि निदानाची पद्धती त्यांनी आत्मसात करून घेतली.

अनेक विकारांवर उपचार

श्रीगुरू बालाजी तांबे यांनी स्थापन केलेल्या उपचार केंद्रात हृदयाच्या समस्या, मधुमेह, मेंदूचे विकार तसेच अपत्यहीन दांपत्यावर उपचार केले गेले. याच केंद्रात तयार केलेली आयुर्वेदिक औषधे १९८४पासून युरोपात निर्यात होत आहेत. त्यांनी आयुर्वेदातील दोनशेवर औषधींची निर्मिती केली असून, त्यांची एफडीएकडे नोंदणी झालेली आहे. आत्मसंतुलन व्हिलेजमध्ये विकसित केलेली संतुलन पंचकर्म ही पद्धती एकमेवाद्वितीय आहे. येथे आयुर्वेदिक उपचाराला योगासने, संगीत आणि ध्यानधारणा यांची जोड दिली जाते. उपचाराची स्वतःची खास पद्धती त्यांनी विकसित केलेली आहे.

पंचकर्माचा हजारोंना लाभ

श्रीगुरू तांबे यांच्या पंचकर्म पद्धतीचा हजारो लोकांनी लाभ घेतलेला आहे. आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा प्रसार करण्यासाठी युरोपातील अनेक ठिकाणांना भेटी देऊन त्याचा प्रचार केला आहे. त्या-त्या भागात त्यांचा अनुयायी वर्गही मोठा आहे. त्यांची उपचार पद्धती, अध्यात्माच्या चौकटीत दाखवलेला मार्ग या माध्यामांतून माणसाचे जगणे सुसह्य, गुणवत्तापूर्ण व्हावे, हाच हेतू होता. सध्याच्या धकाधकीच्या युगात आणि स्पर्धात्मक वातावरणात, तसेच भौतिक सुखाबाबत वाढत असलेली लालसा लक्षात घेत त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, आरोह, अवरोह यांवर मात करण्याची त्यांची पद्धती उपयुक्त ठरली आहे. लक्ष्मीबाई तांबे चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत बालाजी तांबे फाउंडेशनचे कामकाज चालते. ट्रस्टचा खास विभाग ग्रंथांची निर्मिती, कार्यशाळा, आध्यात्मिक मूल्ये आणि परंपरांची रुजवात करत असतो.

आयुर्वेदीय गर्भसंस्कार

गरोदर मातांना अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरलेल्या गर्भसंस्कार या पुस्तकाच्या सात लाखांवर प्रती खपल्या असून ते विविध भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. या पुस्तकाच्या ८१ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT