मुंबईः एक देश, एक निवडणूक ही संकल्पना वास्तवात आणण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे. काल यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. समितीचा अहवाल बाजूने आलाच तर डिसेंबर महिन्यात निवडणुका लागू शकतात, अशी चर्चा आहे.
३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत इंडिया आघाडीची बैठक संपन्न झाली. कालच केंद्राने एक देश, एक निवडणुकीसंदर्भात समिती गठीत केल्याची घोषणा केल्याने बैठकीवरची चर्चा तिकडे वळली. मात्र खरंच डिसेंबरमध्ये निवडणुका लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपने डिसेंबर महिन्यासाठी देशातील खासगी विमानं आणि हेलिकॉप्टर्स बुक केली आहेत, अशी चर्चा कालच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत झाल्याचं आज उद्धव ठाकरेंनी सांगितलं. ठाकरे गटाच्या वतीने 'होऊ द्या चर्चा' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, त्यात ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, भाजपकडून घराणेशाहीचा उद्घोष सुरु आहे. परंतु मी तुमच्या घराण्याबद्ल बोलतच नाही कारण तुमच्या घराण्याचा इतिहासच नाही. जी लोकं कुटुंबव्यवस्था नाकारतात त्यांनी दुसऱ्याच्या घराणेशाहीबद्दल बोलू नये. कुटुंबव्यवस्था आणि घराणं ही आमच्या हिंदूची संस्कृती आहे.
मात्र हीच जाणीव नसल्यामुळे तुम्ही गॅस सिलिंडर महाग केलं केलं आहे. २०१२ मध्ये आम्ही गॅस सिलिंडरसाठी आंदोलन केलं होतं. सुषमा स्वराज यांनी भारत बंद आंदोलनासाठी मला फोन केला होता. मी सिलिंडर हातात घेऊन आंदोलन केलं. मी त्या आंदोलनाला गेलो होतो. तेव्हा अडीचशे-तिनशे रुपये दर होता आज गॅस बाराशेच्या घरात गेला आहे.
ठाकरे पुढे म्हणाले की, सिलिंडर आज दोनशे रुपयांनी कमी केलाय. पाच साल लूट और दो महिने की छूट.. असं झालंय. मागे सुशीलकुमार शिंदेंनी शेतकऱ्यांचं वीज बील माफ केलं होतं. पण सत्ता आली की दुपटीने वसुली केली. हे सगळे जुमले आहेत. या जुमल्यांवर त्यांचे इमले बांधले जात आहेत.
डिसेंबरमधील संभाव्य निवडणुकांबद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यात एक-दोन जणांनी चिंता व्यक्त केली की, भाजपकडून डिसेंबर महिन्यामध्ये खासगी विमानं आणि हेलिकॉप्टर बुक केली गेली आहेत. त्यामुळे निवडणुका होऊ शकतात.
परंतु मी म्हणतो, आपल्याकडे जमीन आहे. जमीन तापली की पाऊस पडतो. स्वातंत्र्यलढ्यात आपल्याकडे होती का विमानं? सामान्य माणूस रस्त्यावर उतरला आणि इंग्रजांना म्हणाला चले जाओ.. आपल्याला पुढे होऊन निवडणुका जिंकायच्या आहेत, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.