मुंबई : टपाल विभागाच्या सर्वेक्षणात सहभागी व्हा आणि बक्षिस किंवा अनुदान मिळवा असे सांगणारी एखादी लिंक तुम्हाला समाजमाध्यमांवर दिसली असेल किंवा ईमेल आणि लघुसंदेशाद्वारे प्राप्त झाली असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन टपाल विभागाने केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून टपाल विभागाच्या अनुदान योजनांच्या विविध संकेतस्थळांनी समाजमाध्यमांवर धुमाकूळ घातला आहे. व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम यांवर विविध यूआरएल आणि संकेतस्थळे प्रसारित केली जात आहेत. इतकेच नव्हे तर ईमेल आणि लघुसंदेशाद्वारेसुद्धा ही माहिती प्रसारित केली जात आहे. यात एका सर्वेक्षणाच्या आधारे आर्थिक लाभ मिळवण्याचे आमिष दाखवले जात आहे; मात्र भारतीय टपाल विभागाने अशी कोणतीही योजना राबवली जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रसारित होणाऱ्या लिंक्समध्ये एक सर्वेक्षण देण्यात आले आहे. या सर्वेक्षणातील प्रश्नावली भरल्यानंतर अनुदान, बोनस, बक्षिस, इत्यादी मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले आहे. नागरिकांनी अशा फसव्या योजनांना बळी पडू नये. तसेच बँक खाते क्रमांक, जन्मदिनांक, इत्यादी वैयक्तिक माहिती आणि ओटीपी कुणालाही देऊ नये, असे आवाहन टपाल खात्याने केले आहे.
नागरिकांना फसवणाऱ्या या लिंक्सविरोधात योग्य ती पावले उचलण्याचे काम सध्या टपाल विभागात सुरू आहे. तरीही, नागरिकांनी मात्र याबाबत काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.