मुंबईः राज्यात सत्तापक्षाकडे बहुमत असतांना अजित पवारांचं बंड का झालं? असा प्रश्न अनेकांना पडला. परंतु त्याची उत्तरं शोधण्यासाठी १९७७ पासूनचा देशाचा राजकीय इतिहास बघावा लागेल. एवढंच नाही तर मागच्या काही वर्षांपासून अनेक राज्यांमध्ये भाजपची होत असेलली पिछेहाट; याचा अभ्यास करावा लागेल. खासदार अमोल कोल्हे यांनी या सगळ्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास करुन एक मांडणी केली आहे.
अमोल कोल्हे यांनी 'अमोल ते अनमोल' या त्यांच्या यू ट्युब चॅनेलवर एक अभ्यासपूर्ण व्हीडिओ अपलोड केला आहे. त्यामध्ये त्यांनी राज्यात सध्या स्थापन झालेल्या ट्रिपल इंजिन सरकारची इनसाईड स्टोरी मांडली आहे. अजित पवारांच्या बंडामागची राजकीय गणितं त्यामध्ये त्यांनी नमूद केलेली आहेत.
व्हीडिओमध्ये काय सांगतात अमोल कोल्हे?
राज्यात ट्रिपल इंजिन सराकर स्थापन झालेलं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी या घटनेचा निषेध केला. परंतु भाजपवर अशी वेळ का आली? असा प्रश्न उपस्थित होतोय.
२७ जून २०२३ नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये भाषण केलं. त्यावेळी त्यांनी एक गॅरंटीही दिली होती. एनसीपीने ७० हजार कोटी रुपयांचे घोटाळे केले. महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह बँक घोटाळा, महाराष्ट्र सिंचन घोटाळा, अवैध खणन घोटाळा, याची लिस्ट लांब आहे, असं सांगून त्यांच्यावर कारवाईची गॅरंटी मोदींनी दिली होती. परंतु २ जुलै २०२३ रोजी अजित पवार सत्तेत सहभागी झाले. पंतप्रधानांनी छातीठोकपणे गॅरंटी कशी दिली? त्याविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्र भाजपची प्रतिमा मलिन का केली?
महाराष्ट्र भाजप नेतृत्वाची प्रतिमा मलिन करण्याचा धोका केंद्रीय नेतृत्वाने का पत्करला, असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित करुन त्याची कारणमीमांसा केली आहे. कंबरेचं सोडून डोक्याला गुंडाळण्याची परिस्थिती का ओढावली? कारण महाराष्ट्रात स्थित सरकार होतं. एकूण २८८ आमदारांपैकी भाजपकडे १०६ आमदार आहेत. शिंदेंचे मिळून १५४ चा बहुमताचा आकडा सत्तापक्षाकडे होता. तरीही अजित पवारांना सत्तापक्षात घेऊन भाजपकडची ६ खाती, शिंदेकडची ३ खाती त्यांना देण्यात आली. नेमकं असं का घडलं?
लक्ष्य फक्त लोकसभा
अमोल कोल्हे पुढे सांगतात, २०२४मध्ये होणारी लोकसभा, हेच यामागचं खरं कारण आहे. भाजपला धोक्याची कळली आहे. १९७७ पासून आजपर्यंत सलग तीन टर्म एका पक्षाला देशातील जनतेने संधी दिलेली नाही. भाजपच्या दोन टर्म पूर्ण होत आहेत. तिसऱ्या टर्मला धोका निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
दुसरीकडे भाजपने आश्वासनं देऊन पूर्ण केलेली नाहीत. दोन कोटी तरुणांना रोजगार, महागाई; या मुद्द्यांमुळे भाजपची पिछेहाट होऊ शकते. देशात १४ राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही. या राज्यांमध्ये लोकसभेच्या ३०९ जागा आहेत. २०१९ मध्ये भाजपच्या फक्त १२९ जागा त्या १४ राज्यातून निवडून आलेल्या आहेत.
बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटकध्ये भाजपची पिछेहाट होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून देणं क्रमप्राप्त आहे. म्हणूनच आधी एकनाथ शिंदे आणि आता अजित पवारांचं बंड घडवून आणलं गेलं. काही सर्व्हेंमधूनही ही बाब अधोरेखित झालेली दिसून येते. काल 'सकाळ' समूहाने केलेल्या सर्व्हेमध्ये ४७.७ टक्के लोकांनी 'मविआ'ला पसंती दिली असून ३९.३ टक्के लोकांनी महायुतीच्या बाजूने कल दिला.
कोल्हे पुढे सांगतात...
२०१९मध्ये देशभरातून भाजपला ३८ टक्के मतं मिळाली होती. ६२ टक्के लोकांनी भाजपला नाकारलं होतं. विरोधक एकत्र आले तर ६२ टक्क्यांचा धोका होऊ शकतो, हे भाजपला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे राजकीय अपरिहार्यता झालीय. या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या आयुष्यात काय फरक पडणार, असा सामान्यांचा प्रश्न आहे. परंतु त्यांच्या प्रश्नांकडे कुणाचं लक्ष नाही.
प्रत्येक निवडणुकीत १० टक्के नवमतदार असतो. त्याच्यापुढे असा सत्तेचा गदारोळ सुरु असेल तर काय परिणाम होईल, याचा विचार करणं गरजेचं आहे. परंतु भाजपकडून सध्या साम, दाम, दंड, भेद काहीही करा, पण २०२४ ची लोकसभा जिंका, हेच खाली सांगितल्याचं दिसून येतंय. त्यामुळेच अजित पवारांच्या बंडाला वेगळा अर्थ असल्याचं कोल्हेंनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.