Shankarrao Gadakh on Jayakwadi:समन्यायी पाणी धोरणाला न्याय देण्याची गरज असताना महाराष्ट्रातील सरकार यामध्ये दुजाभाव करीत असल्याने शेतकऱ्यांची व्यथा म्हणून मुळा धरणातून जायकवाडी धरणात पाणी द्यायला कडाडून विरोध केला जाईल. दुष्काळी स्थितीवर डोळेझाक करणाऱ्यांना पाण्याच्या प्रश्नासाठी प्राणपणाने लढा दिला जाईल, असा खणखणीत इशारा आमदार शंकरराव गडाख यांनी शासन आणि प्रशासनाला दिला आहे.
अहमदनगर - संभाजीनगर रस्त्यावरील घोडेगाव (ता. नेवासे) येथे आज सकाळी दहा वाजता तालुक्यातील शेतकऱ्यांची वर्दळ सुरू झाली. सकाळी सव्वा दहा वाजता आमदार गडाख यांचे आगमन होताच उपस्थितांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. साडेदहा वाजता हजारो शेतकरी, ग्रामस्थ, व्यावसायिक व कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसले. काही वेळेतच रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सर्व लहान रस्त्यावर हातात निषेधाचे फलक घेऊन शेतकरी उभे असल्याने पोलिस यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली.
आमदार गडाख यांनी ‘समन्यायी’चा कायदा सोलापूर जिल्ह्याला लागू होत असताना पुणे जिल्ह्यातील धरणांतून पाणी सोडण्याच्या नियोजनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगून येथे हिंमत चालत नसलेले मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याकरिता टाहो फोडत असल्याचा आरोप केला.
निळवंडे धरणात पाणीसाठा झालेला असून कालवे नसल्याने हे पाणी लाभक्षेत्रात सोडण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हे पाणी निळवंडेत नुसतेच साठवून ठेवायचे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.(Latest Marathi News)
‘मुळा’चे पाणी खरोखर जायकवाडीपर्यंत जाणार का याचा विचार करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी भाषणात सांगितले.माजी सभापती कारभारी जावळे यांनी प्रास्ताविक केले. अशोक गायकवाड, बाळासाहेब सोनवणे, अशोक येळवंडे, योगेश होंडे, डॉ. अशोक ढगे, मच्छिंद्र म्हस्के, संजय नागोडे यांनी आपल्या भाषणात अतिवृष्टी, गारपिटीटने झालेले कांद्याचे नुकसान व सध्याच्या दुष्काळजन्य स्थितीवर शासनाच्या नावाने खडे फोडले. सुभाष राख यांनी सूत्रसंचालन केले. माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी आभार मानले.
शेतकरी भावनाविवश
तालुक्यात प्रथमच पावसाचा निच्चांक झालेला असून विहीर, कूपनलिकाचे पाणी शेवटची घटका मोजत आहे. सोयाबीन, कपाशीनंतर काय हा प्रश्न सर्वासमोर आहे. मुळातून किती आवर्तन मिळणार याची शाश्वती नाही अशातच दोन टीएमसी पाणी खाली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी आपली व्यथा ‘सकाळ’शी मांडताना चिंता व्यक्त केली. बोलताना काहींच्या डोळ्यात अश्रू आले होते. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.