Kalyan News sakal
महाराष्ट्र बातम्या

Kalyan News: शेवटच्या एका तासात चित्र पालटले, कल्याणमध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदान

कल्याण लोकसभा मतदारसंघात 50 टक्के मतदान | 50 percent polling in Kalyan Lok Sabha constituency

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombivali News : कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा 50.12 टक्के मतदान झाले असून गेल्या निवडणूकांचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. 2014 व 2019 साली अनुक्रमे 42.88 व 44.21 टक्के मतदान झाले होते.

प्रथमच ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदार संघात 50 चा टक्का गाठला गेला असून हा वाढीव 6 टक्के वाढीव मतांचा कौल विजयी उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहे. उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण मतदारसंघात मतांची टक्केवारी वाढली असून याचा फायदा विजयी उमेदवारास मताधिक्य वाढविण्यासाठी होतो का हे आता पहावे लागेल. (Kalyan News )

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत असून महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर तर महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. सोमवारी 20 मे ला लोकसभेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली.

कल्याण लोकसभेत 50 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यापूर्वी कल्याण लोकसभेत मतदानाचा आकडा हा 34 टक्के ते 45 टक्क्यांपर्यंत राहीला आहे. मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी तशी फारशी दिसत नव्हती. कल्याण लोकसभेत 20 लाख मतदारांची नोंद असून यातील किती मतदार मतदानासाठी बाहेर पडतात याची कसोटी निवडणूक आयोगापासून राजकीय पक्षांची देखील होती. (loksabha 2024 election)

मतदार केंद्रावर असणाऱ्या अपुऱ्या सोयी सुविधांमुळे नागरिक हैराण असतानाच मतदान यादीत नाव देखील न सापडल्याने अनेक मतदार मतदान न करताच माघारी फिरले. यामुळे दुपारी 3 नंतर मतदान केंद्रावर शुकशुकाट दिसून येऊ लागला. सायंकाळी 4 नंतर पुन्हा गर्दी होईल असे वाटत असतानाच मतदार काही बाहेर पडत नव्हते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतांचा अंदाज घेतला असता 41 टक्के मतदानाची नोंद झाली होती.(shirkant shinde)

मतांची टक्केवारी कमी असल्याचे दिसताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यावरुन तडक सुपुत्र खासदार शिंदे यांच्या कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर निघाले. प्रत्येक प्रभागात जाऊन पदाधिकाऱ्यांकडून धावता आढावा घेत मतदारांना बाहेर काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच महायुतीला बिनशर्थ पाठिंबा देणारे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील कल्याण ग्रामीण, डोंबिवली मतदारसंघाचा आढावा घेत जास्तीत जास्त मतदान करण्याच्या सूचना केल्या. यामुळे एका तासात कल्याण लोकसभेतील चित्र पालटले आणि चक्क 10 टक्क्यांनी मतांचा आकडा वाढल्याचे चित्र दिसून आले.

2009 साली कल्याण मध्ये 34 टक्के मतदान झाले होते. 2014 साली 42.94 टक्के मतदान झाले होते, तर 2019 साली 44.27 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी 1.33 टक्क्यांनी वाढ झाली होती. 2014 व 2019 चे मतदान पाहता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होती. 2019 ला राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना 2 लाख 15 हजार मते मिळाली होती, तर श्रीकांत शिंदे यांना 5 लाख 58 हजार मते मिळाली होती. 3 लाखांच्या लीडने शिंदे यांनी विजय मिळविला होता. यंदा मतदारांच्या संख्येत वाढ झाली असली तरी मतदानाच्या टक्केवारीत देखील वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यावर्षी शिवसेनेत फूट पडली असून शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. यामुळे शिवसैनिकांचा कौल नेमका कोणाकडे हे ही या निवडणूकीच्या निकालाने स्पष्ट होणार आहे. यामुळे शिंदे गटाची प्रतिष्ठा व मुख्यमंत्री यांचे सुपूत्र निवडणूकीच्या रिंगणात असल्याने शिंदे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. महायुतीला राष्ट्रवादी, मनसे, भाजपा यांची साथ मिळाली असल्याने जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी मिळविण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. महायुतीचे पारडे येथे जड असून यंदा मतांचा वाढलेला टक्का महायुतीला विजयाच्या रेकॉर्डब्रेक हॅट्रिक कडे घेऊन जातो का ? हे पहावे लागेल.

विधानसभा निहाय मतांची टक्केवारी पाहता कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कल्याण पूर्व, उल्हासनगर येथे मतांचा टक्का गेल्यावेळे पेक्षा जास्त वाढला आहे. उल्हासनगर मध्ये सर्वाधिक मतांची टक्केवारी म्हणजेच 12 टक्के मतदान तर कळवा मुंब्रात सर्वाधिक कमी म्हणजेच 2 टक्के मतदान झाले आहे. अंबरनाथ मध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. शेवटच्या तासाभरात मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून या वाढीव मतदारांचा कौल नेमका कोणाला जातो ? हे निकालाअंती स्पष्ट होईल. महायुतीचे पारडे येथे जड असले तरी सुरुवातीला मतांची कमी असलेली टक्केवारी यामुळे महायुतीला जास्तीत जास्त मताधिक्यांचा टप्पा गाठणे शक्य होणार नाही असे चित्र होते. मात्र गेल्या निवडणूकांचा मोडलेला रेकॉर्ड आणि वाढीव मतदारांचा कौल आता विजयी उमेदवार किती लीडने विजयी होते हे पहावे लागेल.

मतदार संघ 2024 2019 टक्क्यांची वाढ

अंबरनाथ 47.07 44.01 3.06

उल्हासनगर 51.10 39.0 12.01

कल्याण पूर्व 52.19 43.02 9.17

डोंबिवली 51.67 42.05 9.62

कल्याण ग्रामीण 51.01 42.50 8.51

कळवा मुंब्रा 48.72 46.50 2.22

2024 मतदानाची टक्केवारी

पुरुष - 52.19 टक्के

महिला - 47.75 टक्के

इतर - 21.63 टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT