बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या, मराठी भाषिकांच्या काळ्या दिनाला विरोध करणाऱ्या कन्नड संघटनांनी राज्योत्सव मिरवणूक मोठ्या प्रमाणात काढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यशासनाने राज्योत्सव मिरवणूकीला परवानगी दिली नाही तर राज्यभरातील सर्व कन्नड संघटना बेळगावात येवून आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे. राज्योत्सव मिरवणुकीला परवानगी देण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी कन्नड संघटनांनी राज्य शासनाला २२ ऑक्टोबरची मुदत दिली आहे. शिवाय सोमवारी (ता.१८) बेळगावातील सर्व कन्नड संघटना याबाबत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेणार आहेत. कोणत्याही स्थितीत यावेळी राज्योत्सव मिरवणूक काढणारच असेही कन्नड संघटनांनी जाहीर केले आहे. कोरोनाचे कारण देवून राज्योत्सव मिरवणूकीला परवानगी दिली जात नाही, पण हे कारण चुकीचे आहे.
जानेवारी महिन्यापासून बेळगावात भाजपचे अनेक कार्यक्रम झाले आहेत, निवडणूका झाल्या आहेत, दौड झाली आहे, मग राज्योत्सव मिरवणूक का नाही? असा सवाल कन्नड संघटनांनी केला आहे. शनिवारी बेळगावात कन्नड संघटनांची बैठक झाली. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली. जोवर राज्यशासनाकडून मिरवणूकीला परवानगी मिळणार नाही तोवर राज्योत्सवाशी संबंधित कोणत्याही बैठकीत कन्नड संघटना सहभागी होणार नाहीत असा इशाराही देण्यात आला आहे.
कोरोनामुळे गतवर्षी काळा दिन मूक सायकल फेरी व राज्योत्सव मिरवणूकीलाही परवानगी देण्यात आली नव्हती. पण मराठा मंदीर येथे झालेल्या काळा दिन कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न काही संघनटनानी केला होता. यंदा बेळगावात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी १५ नोव्हेंबरपर्यंत मिरवणूकांवरील बंदी कायम आहे. त्यामुळेच १ नोव्हेंबर रोजीच्या राज्योत्सव मिरवणूकीला परवानगी देण्यात आलेली नाही. गेल्या आठवड्यात राज्योत्सवसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी शहरातील प्रत्येक प्रभागात यावेळी राज्योत्सव कार्यक्रम केला जाईल अशी वल्गना कन्नड संघटनांनी केली. पण पोलिस आयुक्तानी लागलीच त्याबाबत स्पष्टीकरण दिले. बेळगावात राज्योत्स कार्यक्रम कोरोना नियमांचे पालन करूनच होईल. मिरवणूक काढण्यास परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळेच बिथरलेल्या कन्नड संघटनांनी आता राज्यशासनावर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यानी बेळगावचे जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना राज्योत्सव मिरवणुकीला परवानगी देण्याची सूचना करावी अशी मागणी कन्नड संघटनांनी केली आहे. राज्योत्सव संपुर्ण कर्नाटकात साजरा केला जातो. यावेळी संपूर्ण राज्यात कोरोना नियमांचे पालन करूनच हा उत्सव साजरा केला जाणार आहे. मग बेळगावात मिरवणुक काढण्याची गरज काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी कोरोना काळातही राज्योत्सव मिरवणूक काढण्याचा घाट कन्नड संघटनांनी घातला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.