मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातील वाद मागील वर्षभरात चांगलाच गाजला. किरीट सोमय्या यांनी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. मविआला प्रत्येक ठिकाणी विरोध करण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. यामुळे त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला होता. आता त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले आहे. त्यांच्या ट्विटवर एकनाथ शिंदे गट नाराज झाला आहे.
‘मंत्रालयात आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्रींना (uddhav thackeray) हटविल्याबद्दल अभिनंदन केले.’ असे वादग्रस्त ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. किरीट सोमय्या व पुत्र नील सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तसेच या भेटीचा फोटोही ट्विटसह जोडला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना भाजपकडून किरीट सोमय्या यांनी त्यांची पोलखोल करण्याचे ठरवले होते. वेगवेगळे घोटाळे बाहेर काढत होते. मविआचे तब्बल ४० घोटाळे बाहेर काढणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. यामुळे ते कोणते घोटाळे उघड करणार आणि कोणावर हल्ला करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महाविकास आघाडीविरुद्ध किरीट सोमय्या (Kirit Somaiya) अशी स्थितीच महाराष्ट्रात निर्माण झाली होती. यामुळे त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला होता. पुण्यामध्ये शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापतही झाली होती. तसेच त्यांच्या कारवर हल्लाही करण्यात आला होता. यावेळी त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली होती. रक्तही निघाले होते. मात्र, हे रक्त नसून सॉस असल्याचे सांगण्यात येत होते.
यावरून महाविकास आघाडी आणि किरीट सोमय्या यांच्यातील संघर्ष प्रत्येकाला पाहायला मिळाला. ने अनेकदा महाविकास आघाडी सरकारचा माफिया सरकार असा उल्लेख करीत होते. मात्र, आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ‘माफिया मुख्यमंत्रींना (uddhav thackeray) हटविल्याबद्दल अभिनंदन केले’ असे ट्विट केले आहे.
शिंदे गटाचा आक्षेप
किरीट सोमय्या यांनी फोटोसह ट्विट करीत ‘माफिया मुख्यमंत्रींना हटविल्याबद्दल अभिनंदन केले’ असे लिहिले आहे. सोमय्यांनी माफिया शब्द वापरणे चुकीचे असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले. मतभेद असले तरी उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करायची नाही असे दीपक केसरकर व शिंदे गटाने ठरविलेले आहे.
देवेंद्र फडणवीसांना दिली माहिती
किरीट सोमय्या जे बोलले ते आक्षेपार्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी यावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, संपर्क होऊ शकला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत कळविले आहे. आमच्यात जे काही ठरले आहे, त्यानुसार भाजप नेत्यांनी वागावे, असे फडणवीसांना सांगितल्याचे दीपक केसरकर म्हणाले.
किरीट सोमय्यांनी दिले स्पष्टीकरण
‘माफिया मुख्यमंत्रींना हटविल्याबद्दल अभिनंदन केले’ असे ट्विट केल्यानंतर शिंदे गट नाराज झाला. यानंतर ‘उद्धव ठाकरे यांनी मला, माझ्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. नवनीत राणांना तुरुंगात टाकले होते. यामुळे मी त्यांना माफियाच म्हणतो’ असे स्पष्टीकरण दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.