पुणे : स्वातंत्र लढ्यात महाराष्ट्रातील (maharashtra) महत्वाचे नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील (krantisinh nana patil). पत्रीसरकारच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र क्रांती करुन ब्रिटीश सरकारला पळता भुई थोडी केली. आता या महान क्रांतीकारकाचा दुर्मीळ असा फोटो समोर आला आहे. त्या फोटोमागची कहाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नातवाने शेअर केली आहे. गोणपाटाचा पोशाख परिधान केलेले तरुण वयातील क्रांतिसिंह नाना पाटील यांचे हे दुर्मीळ छायाचित्र आहे. ते छायाचित्र विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठास कॉम्रेड आनंद मेणसे यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांच्या जयंतीनिमित्त भेट दिले आहे. नाना पाटील यांचे पैलवानासारखे व्यक्तिमत्व या छायाचित्रातून स्पष्ट दिसते. मेणसे यांना हे छायाचित्र मुंबईच्या ज्येष्ठ नेत्या कॉम्रेड प्रेमाताई पुरव यांच्याकडे मिळाला. प्रेमाताई आणि क्रांतिसिंहांचे कौंटुबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते.
क्रांतिसिंह नाना पाटलांचे नातू वकील सुभाषबापू पाटील यांनी फेसबुकवर (facebook) दुर्मीळ अशा फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात असं म्हटलं आहे की, 1932 सालच्या दरम्यान क्रांतिसिंहांना पहिल्यांदा तुरुंगवास झालेला त्यावेळचे हे छायाचित्र आहे. तुरुंगवास सोडताना त्यांना इस्लामपूर पोलीस ठाण्यास हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले होते. यासाठी ते येडे मच्छींद्र येथून सकाळ संध्याकाळ कृष्णा नदी पार करून इस्लामपुरास जात. काही दिवसांनी रोजचे चालत जाणे जिकरीचे बनले होते. तेव्हा त्यांनी इस्लामपूर येथे वास्तव्य करण्याचे ठरवले. इस्लामपूर येथे राहणे, जेवणे आर्थिकदृष्टया परडवणारे नव्हते, तसेच सरकारनेही घर जमीन जप्त केली होती.
..आणि अनेकजण त्यांना पोते बुवांच म्हणू लागले
क्रांतिसिंहांनी तेव्हा तत्कालीन काँग्रेस कमिटीकडे मदतीसाठी विनंती केलेली, पण ती नाकारण्यात आली. मग त्यांनी हमाली करण्याची तयारी केली असता तेथील हमालांनी त्यांना मनाई केली. आम्ही आमच्या कमाईतून तुमचा खर्च भागवतो, असे म्हटले. हमालांनी घेतलेल्या भूमिकेला त्यांनी स्पष्ट नकार देत झाडाच्या एका पारावर मुक्काम ठोकला. गाडगेबाबांचे एक शिष्य त्यांना दोन भाकरी आणि कालवण देत पण पोलिसांचा सरोमिरा सुरु झाल्यावर तेव्हा त्यांनीही जेवण देण्याचे बंद केले. भूक भागवण्यासाठी क्रांतिसिंह मक्याच्या कणसावर दिवस काढू लागले. पोटाला खायला पैसे नव्हते तर अंगावरील कपड्याचे काय? यावरती उपाय म्हणून त्यांनी हमाला कडून एक पोते घेतले. त्यास दोन्ही बाजूनी भोके पडून सदर म्हणून घालण्यास सुरुवात केली. यावेळी अनेकजण त्यांना पोते बुवांच म्हणू लागले.
दरम्यान, क्रांतिसिंहांचे हे छायाचित्र अनमोल असा ठेवा आहे. आज या छायाचित्राची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्या क्रांतिसिंहांच्या वाटचालीचा इतिहास यानिमित्ताने सर्वांसमोर उभा राहिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.