सोलापूर : मुंबई, पुण्यासारख्या बड्या शहरांमध्ये वाहनांची, उद्योगांची झालेली दाटीवाटी पाहता आता सोलापूरशिवाय उद्योजकांना पर्याय नाही, अशी स्थिती आहे. दळणवळणाच्या भरपूर उत्तम सुविधा असलेल्या सोलापुरात आयटी पार्क होण्यासाठी सातत्याने रेटा लावला जात आहे. केवळ राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रश्न प्रलंबित रहात असल्याचे चित्र आहे. सोलापुरात आयटी पार्क झाल्यास ‘रिव्हर्स मायग्रेशन'ला मोठी संधी आहे.
गेल्या पाच वर्षांपासून कधी तासिका तत्वावरील तर कधी जमेल तसे काम या भूमिकेतील पालकमंत्र्यांमुळे सोलापूरच्या विकासाचे स्वप्न हे दिवास्वप्नच राहिले आहे. केवळ सक्षम नेतृत्वाअभावी विमानतळ, समांतर जलवाहिनी, टेक्स्टाईल पार्क, गारमेंट पार्क, रेल्वे पूल, उड्डाण पूल, उजनीचे नियोजन या प्रश्नांबरोबच आयटी पार्कचा विषयही गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. सोलापूरच्या विकासाची भूमिका मांडताना सोलापूरला ‘बाप' नसल्याची खंत व्यक्त होत असते. गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीला मंत्रिपदाची तसेच पालकमंत्रीपदावर संधी दिली गेली नाही. त्याचा सोलापूरकरांना राग आहे. आता याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे.
आयटी पार्क संबंधात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक झाली. सकारात्मक चर्चा झाल्याने हा विषय पुढे जाईल, अशी अपेक्षा आहे. परंतु यासाठी पुन्हा राजकीय इच्छाशक्ती व जनरेटा आणि पाठपुराव्याची गरज आहे. त्याची सुरवात सोलापूर विकास मंचने केली आहे. विमानतळ, स्मार्ट सिटी, आयटी पार्क असे विकासाचे विषय पटलावर घेतल्याने विकास मंचची भूमिका कौतुकास्पदच आहे. राज्यातील बड्या शहरांमध्ये झालेल्या दाटीवाटीमुळे पुण्यातील ४७ आयटी कंपन्या आपला उद्योग अन्यत्र हलवणार असल्याचे वृत्त होते. सोलापुरात पायाभूत सुविधा उपलब्ध असताना त्यांना आपल्याकडे का आणले जात नाही, तसा पाठपुरावाही केला जात नाही. यासाठी ताकदीच्या नेत्याची कमतरता भासली, हे मात्र खरे आहे.
आता सोलापुरातून विमानाचे उड्डाण तसेच आयटी कंपन्यातील तरुणाईला लागणारे मॉल, खाद्य संस्कृती, करमणुकीची साधने उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यातून स्मार्ट सोलापूरचा आर्थिक स्तर उंचावणार आहे. शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा दिल्यानंतर अनेक उद्योग सोलापुरात येतील, असे स्वप्न अजूनतरी प्रत्यक्षात आले नाही. पण, आयटी पार्कचा विषय मार्गी लागल्यास सोलापुरातून नोकरीनिमित्त मोठ्या शहरांनी गेलेल्या तरुणाईला सादही घालावी लागेल. ते परतल्यास येथील निवृत्त आई-बाबांनाही हायसे वाटल्याशिवाय राहणार नाही. सोलापुरातील औद्योगिक वसाहतीत जागा तर उपलब्ध आहेच. अनेक बंद पडलेल्या उद्योजकांनाही यातून लाभ होईल. तसेच विस्तारीकरणासाठी एमआयडीसीने लगतच्या १५१.३२ हेक्टरचा प्रस्तावही दिलेला आहे. अनेकवेळा मागणी करुनही प्लॉट मिळण्यासाठी तडजोडी कराव्या लागत असल्याचाही कटू अनुभव येथील उद्योजकांना येत आहे.
अजून किती प्रतीक्षा!
चिंचोळी एमआयडीसीत आयटी पार्कसाठी एक मोठी इमारत उभी केली गेली. १० फेब्रुवारी २००१ रोजी अत्यंत थाटामाटात त्याचे उद्घाटनही झाले. परंतु सोलापूरकरांच्या दुर्दैवाने पुढे त्याचे काहीही झाले नाही. सोशल मीडियावर त्यावेळच्या कोनशिलेचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २३ वर्षानंतर कोनशिला पहायला मिळाली व प्रत्यक्षात सुरवात व्हायला अजून किती वर्षे लागणार, असा तिखट सवाल केला जात आहे.
...तरच विकास निश्चितपणे होणार!
सोलापुरात सध्या छोट्या-मोठ्या ७८ आयटी कंपन्यांद्वारे काम सुरु आहे. त्यांना एकत्र आणून एमआयडीसीत सुविधा देण्याची गरज आहे. तसे पाहिले तर ते काम फार सोपे आहे. हायस्पीड इंटरनेट, विद्युत पुरवठा, अडथळ्याविना परवाने, कर सवलत अशा जुजबी सोयी दिल्यास निश्चितपणे शक्य होईल. पाण्याची गरज नसलेल्या अशा उद्योगातून सोलापूरच्या विकासाच्या कक्षा रुंदावणार हे मात्र निश्चित!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.