मुंबई - राज्यातील गरीब कुटुंबांतील मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने ‘लेक लाडकी’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेद्वारे त्यांना टप्प्याटप्प्यांत आर्थिक मदत करत लक्षाधीश करण्याचे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठरविण्यात आले.
यानुसार, पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, ११ वीत गेल्यावर आठ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रीतीने एकूण त्या मुलीस एक लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल.
राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना अधिक्रमित करून एक एप्रिल २०२३ नंतर जन्म झालेल्या मुलींसाठी ही नवी योजना राबविण्यात येणार आहे. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी ही योजना राबविण्यात येईल.
एक एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आणि आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘जलविद्युत’मध्ये खासगी गुंतवणूक
सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी स्वतंत्र धोरण राबवून मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणुकीला जलविद्युतमध्ये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात १०, ७५७ मेगावॉट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन झाले आहे. २०२५ पर्यंत ही ऊर्जाक्षमता २५ हजार मेगावॉटपर्यंत वाढविण्याचे ध्येय आहे.
या धोरणाद्धारे उदचंन जलविद्युत प्रकल्पातून (पीएसपी) मेगावॉट लेव्हल एनर्जी स्टोरेज क्षमता विकसित करणे, सद्य:स्थितीतील पंप हायड्रो-सोलर हायब्रीड पॉवर प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, आंतरखोरे हस्तांतरणासाठी प्रोत्साहन देणे तसेच खासगी क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करणे, यांना प्राधान्य देण्यात येईल. या संदर्भातील विकासकाची निवड सामंजस्य कराराद्धारे सरळ वाटप किंवा स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेतून करण्यात येईल.
उदंचन प्रकल्पाच्या माध्यमातून एनर्जी स्टोरेज सिस्टिमद्धारे क्षमता वाढविता येऊ शकते. ते पर्यावरणस्नेही आणि स्वस्त आहे. घाटघर येथील उदंचन प्रकल्प २००८ पासून कार्यान्वित आहे. सौर किंवा पवन ऊर्जेद्वारे निर्माण होणारी ऊर्जा पुरेशी नाही. त्यामुळे अशाश्वत नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये तफावत येऊन एकूणच ग्रीडला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे एनर्जी स्टोरेज सिस्टिमला महत्त्व आहे.
इतर महत्त्वाचे निर्णय
फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता महारेल ऐवजी रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार
सांगली, नगर जिल्ह्यांत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये सुरु करणार
नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन देण्यात येणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात ‘औरंगाबाद’ ऐवजी ‘छत्रपती संभाजीनगर’ असा बदल करण्यास मान्यता
पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना एक एकरापेक्षा कमी जमिनीचे देखील वाटप होणार
यांना योजना लागू
कुटुंबातील एक अथवा दोन मुलींना
एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला
दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये झाल्यास एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.