सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेत राजस्थानातून फुगे विक्रीसाठी आलेल्या एका कुटुंबातील सात वर्षाची चिमुकली २० जानेवारीला अचानकपणे बेपत्ता झाली. या प्रकरणी सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला, पण सात महिने पूर्ण होऊनही शहर पोलिसांना त्या चिमुकलीला शोधता आलेले नाही. त्या चिमुकलीची आई अजूनही पोलिसांकडे विचारणा करतेय, दररोज मुलीच्या आठवणीत रडत असल्याची स्थिती आहे.
राजस्थानातील त्या चिमुकलीचे कुटुंबिय दरवर्षी विविध शहरातील यात्रा, जत्रांमध्ये फुगे विकायला जातात. जानेवारीमध्ये सोलापुरातील श्री सिद्धेश्वर यात्रेसाठीही देखील ते आले होते. त्या कुटुंबातील पती-पत्नी व त्यांचा एक मुलगा व तीन मुलीही सोबत होत्या. बेपत्ता झालेली ती चिमुकली हुशार होती, तिला फुगे विक्रीची माहिती होती. २० जानेवारीला ती फुगे विकत असताना अचानकपणे रात्री साडेआठच्या सुमारास ती चिमुकली आईला दिसेनाशी झाली.
संपूर्ण यात्रेत तिचा शोध घेतला, पण ती कोठेही सापडत नव्हती. घाबरलेल्या त्या चिमुकलीच्या मातेने तेथील पोलिसांशी संपर्क साधला, नंतर सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी सुरवातीला शोध घेतला, पण ती सापडली नाही. आता काही दिवसांपूर्वी हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाकडे वर्ग झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी अनेक गुन्ह्यांमध्ये कोणताही पुरावा नसतानाही यशस्वी तपास करून दाखविला आहे. मात्र, सात महिन्यांपूर्वी हरविलेली ती चिमुकली पोलिसांना अजून सापडली नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
सरपंच भाभी गेल्या कोठे? गावकऱ्यांचा प्रश्न अनुत्तरीतच
कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावाच्या सरपंच जैतुनबी शेख ७ सप्टेंबर २०२२ रोजी भर दुपारी गावाच्या शिवारातून बेपत्ता झाल्या. त्यांच्या मुलाने सलगर वस्ती पोलिसांत फिर्याद दिली. स्थानिक पोलिसांसह शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी श्वान पथक नेले, कसून तपास केला. जिल्ह्यातील व अन्य ठिकाणच्या मठात, आश्रमातही चौकशी केली. तरीपण, त्या सरपंच भाभी पोलिसांना सापडल्याच नाहीत. अजूनही गावातील नागरिकांना सरपंच भाभी नेमक्या गेल्या कोठे, या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही.
वृद्ध महिलेचे दागिने चोरणारेही सापडेनात
जुळे सोलापुरातील अनुप्रिया चारूदत्त तुळजापूरकर (वय ६५, रा. जुने संतोषनगर) या ३० जुलैला सायंकाळी साडेपाच-सहाच्या सुमारास भजन क्लासला एकट्या जात होत्या. त्यावेळी संतोषीमाता मंदिराजवळील शिवगंगा नगरातील एलआयसी कार्यालयाच्या बोळात थांबलेल्या एका तरूणाने साध्या वेशातील पोलिस असल्याचे सांगून त्यांच्या हातातील चार लाख रूपयांच्या बांगड्या काढून घेतल्या. आताच एकाच्या गळ्यातील दागिने चोरीला गेले म्हणून त्याच्याकडील पिशवीत दागिने ठेवायला सांगितले आणि हातचलाखी करून तो चोरटा दागिने घेऊन पसार झाला. विजापूर नाका पोलिसांनी सीसीटीव्ही पडताळले, शहर गुन्हे शाखेच्या पथकानेही तपास केला. मात्र, अद्याप ते चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत अशी सद्य:स्थिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.