Lokmanya Tilak Punyatithi  esakal
महाराष्ट्र बातम्या

Lokmanya Tilak Punyatithi : लोकमान्यांच्या अंत्ययात्रेला महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी दिला होता खांदा...

धनश्री भावसार-बगाडे

Lokmanya Bal Gangadhar Tilak Death Anniversary 2023 :

लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची आज १०३ वी पुण्यतिथी आहे. १ ऑगस्ट १९२० मध्ये टिळकांचे मुंबई येथे निधन झाले. लोकमान्य टिळकांनी ताई महाराज प्रकरण संपवण्यासाठी १२ जुलै रोजी पुणे सोडले आणि मुंबईला गेले.

तो त्यांचा शेवटचा रेल्वे प्रवास ठरला. पुण्याहून निघताना त्यांच्या अंगात कणकण होती. पण त्यांनी दरवेळीप्रमाणे यावेळीही दूर्लक्ष केले आणि ते १२ जुलैला सरदारगृहात आले.

प्रकृती खालावली

ठरल्याप्रमाणे १४ जुलैला अर्जाची मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. कामाचा ताण व प्रवासाचा त्रास त्यांना आधीच प्रकृती बरी नसल्याने मानवला नाही. निकालाच्या आदल्या दिवशी म्हणजे २० जुलैला टिळकांचा ताप वाढला. चमनलाल यांच्या गाडीत सुमारे दोन तास त्यांनी गांधींच्या असहकारावर व भारतीय मजूर परिषदेच्या चळवळीवर चर्चा केली. 

२१ जुलैला मुंबई हायकोर्टाने टिळकांच्या बाजूने निकाल दिला व ते यशस्वी झाले. टिळकांनी निकाल ऐकला होता पण निकालाची लेखी प्रत त्यांच्या हातात आली नव्हती. ही प्रत काही दिवसांनी त्यांना मिळाली पण त्यांचे आजारपण वाढल्यामुळे त्यांना ती वाचता आली नाही. 

Lokmanya Tilak Punyatithi

दिग्गजांच्या भेटी

टिळकांच्या मुंबईतील मुक्कामात महात्मा गांधी, मौलाना शौकत अली आणि इतर नेते टिळकांना भेटून गेले. यामध्ये तरुण जवाहरलाल नेहरू हे सुद्धा होते. दि. २३ जुलैला टिळकांच्या ६४ वा वाढदिवस होता. त्यावेळी भेटायला आलेल्या मित्रमंडळींसमवेत त्यांना थोडा आराम वाटला.

दि. २७ जुलैला आराम पडेना म्हणून डॉक्टरांनी निदान केले की, हा मलेरिया नसून न्युमोनिया आहे. या आजारातही ते डॉक्टरांशी थट्टा मस्करी करत बोलत होते.

Lokmanya Tilak Punyatithi

आजार बळावला अन्...

कालांतराने त्यांची फुफ्फूसे सुजली, कोठा फुगला व उचकी सुरू झाली. डॉक्टरांनी ताबडतोब औषध देऊन उचकी बंद केली पण वात बळावला व ताप १०४ डिग्रीपर्यंत वाढला. पहिले मलेरिया मग न्युमोनिया आणि शेवटी शक्तीक्षय अशी टिळकांच्या आजाराची स्थिती डॉक्टरांनी मांडली. पण अचानक घाम आल्याने डॉक्टरांना आजार बरा होण्याची चिन्हे दिसू लागली.

दि. २८ जुलैला आजार आणखी बळावला व दिवसातूम काही काळ शुद्ध सारखी हरपत होती. त्यामुळे त्यांना भेटायला येणाऱ्या काही लोकांनाच ते ओळखू शकत तर काही विस्मृतीत जात. त्यांची अवस्था बघून डॉक्टरही साशंक झाले. नातेवाईकांना बोलवण्यात आले.

Lokmanya Tilak Punyatithi

तब्येतीची विचारणा

टिळकांच्या तब्येतीविषयी महात्मा गांधी, महंमद अली जिना यांच्याकडूनही वारंवार विचारणा होऊ लागली. जनतेत चिंतेचे वातावरण असल्याने रस्त्यावरचा जमाव त्यांना भेटण्यासाठी काही हटत नव्हता. मुंबईच्या दैनिकांमधूम रोज टिळकांच्या आजारपणाविषयी ताजी बातमी देण्यात येत होती.

हृदय विकाराचा झटका

दि. २९ जुलैला त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्याच दिवशी सगळं संपायचं पण डॉक्चरांच्या अथक उपाययोजनांमुळे तो दिवस निभावला. मुंबईतले सर्व डॉक्टर प्रयत्नांची शर्थ करत होते. टिळकांच्या शय्येजवळ तज्ज्ञ माणसांचा जागता पहारा होता.

Lokmanya Tilak Punyatithi

अखेर प्राणज्योत मालवली

दि. ३१ जुलैला त्यांची नाडी क्षीण झाली, पण चालू होती. त्यांना श्वास घेणे जड होऊ लागले. व रात्री नऊ वाजता त्यांना श्वास लागला. दिनांक १ ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजे १२.४० ला टिळकांची प्राणज्योत मालवली. तो दिवस आषाढ कृष्ण प्रतिपदा होता.

लोकमान्यांचे पार्थिव पलंगावरून उचलून खाली ठेवण्यात आले. पहाटेपर्यंत ही बातमी मुंबईत समजली. ताबडतोब नाटक/सिनेमे आदी मनोरंजनाचे कार्यक्रम स्थगित करण्यात आले. पहाटेपासूनच टिळकांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी लोटली होती. लक्षावधी लोक भक्तिभावाने टिळकांचे अखेरचे दर्शन घेत होते. 

Lokmanya Tilak Punyatithi

अंत्ययात्रा

लोकांच्या इच्छेप्रमाणे भरवस्तीच्या भागातून किंचित लांबच्या मार्गाने स्मशानयात्रा काढायचा मार्ग पोलीस कमिशनर यांनी ठरवून दिला. इतका मोठे जनसमुदाय लोटला असतांना स्थानिक सोनापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणे शक्यच नव्हते म्हणूनच चौपाटीच्या वाळवंटात टिळकांच्या अंत्यसंस्काराला सरकारने परवानगी दिली. ही गोष्ट सुद्धा अपूर्वच होती. 

पुण्यात ही बातमी समजताच रेल्वे अधिकाऱ्यांनी एक स्पेशल ट्रेन पुण्याहून सोडली. दुपारी १.३० वाजता सरदारगृह येथून चौपाटीसाठी स्मशानयात्रा सुरु झाली. घराघरांच्या छपरावर टिळकांच्या पार्थिव देहावर पुष्पवृष्टी केली जात होती. त्यादिवशी पावसाचा विशेष जोर होता, पण त्यामुळे अंगावरच्या भिजलेल्या कपड्यांकडे कोणाचेच लक्ष नव्हते. अंत्ययात्रा मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. अंत्ययात्रेत समयोचित टाळ व भजने अखंड ऐकू येत होती. 

महत्मा गाधी, नेहरूंनी दिला होता खांदा

लोकमान्य टिळक यांच्या अंतयात्रेला महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, जवाहरलाल नेहरू, लाला लजपतराय असे अनेक दिग्गज नेते आळीपाळीने खांदा देत होते. चौपाटीवर पोहचल्यावर चंदन काष्ठाचे सरण रचण्यात आले. सारे धार्मिक संस्कार झाले, प्रमुख पुढाऱ्यांची भाषणे झाली आणि संध्याकाळी सहा वाजता सूर्यास्ताला टिळकांच्या पार्थिव देहाला अग्नी देण्यात आला व कालांतराने त्याच जागी लोकमान्यांचा पुतळा उभारला गेला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT