Raj Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : ‘केवळ मोदींसाठी महायुतीला पाठिंबा’

केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी म्हणून आपण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या महायुतीला पाठिंबा देत आहोत,’ अशी घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - ‘लोकसभेची आगामी निवडणूक ही देशाचे भवितव्य ठरविणारी असून सध्या देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी म्हणून आपण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्या महायुतीला पाठिंबा देत आहोत,’ अशी घोषणा करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना पुढील विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागण्याचे आवाहन केले.

शिवाजी पार्क येथे आयोजित गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते. राज यांनी यावेळी जनतेकडून अपेक्षा व्यक्त करताना राजकीय व्यभिचाराला मान्यता देऊ नका असे आवाहन देखील केले. मी ‘मनसे’चाच अध्यक्ष राहणार असून शिंदे सेनेचा प्रमुख होणार नाही असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या दिल्लीतील भेटीवर भाष्य करताना राज म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला एकत्र येण्याबाबत विचारणा करत होते. त्यामुळेच मी शहा यांना फोन करून भेटण्यासाठी वेळ मागितली होती. त्याप्रमाणे मी त्यांना दिल्लीत जाऊन भेटलो. या भेटीत सगळे विषय निघाले. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवावी? येथपर्यंत प्रकरण आले.

मी मात्र ‘मनसे’चाच अध्यक्ष राहण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी त्यांचे कौतुक केले होते. तसेच ते पंतप्रधान व्हावेत असे म्हणणारा मी पहिलाच आहे. मात्र त्यांचे जे निर्णय पटले नाहीत तेव्हा त्यांच्या विरोधात लाव रे तो व्हिडिओ म्हणत मीच २०१९ मध्ये उभा राहिलो होतो. आता महाराष्ट्राचा कॅरम चुकीचा फुटला आहे. त्यामुळे कोण कोणत्या पक्षात आहे? हेच कळत नाही. या परिस्थितीतून आपल्याला पुढे जाताना मार्ग शोधायचा आहे.’

म्हणून दुसरा विचार नाही

आधीच्या राजकीय आठवणींना उजाळा देताना राज म्हणाले, ‘तेव्हा ३२ आमदार सहा-सात खासदार म्हणाले होते की आपण एकत्र बाहेर पडू. माझा दौरा मी सुरू केला. त्यांना वाटले मी काँग्रेसमध्ये जाईन. मी त्यांना पहिल्यांदाच सांगितले होते की, मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही. आता माझ्या मनात विचार नाही. उद्या पाऊल उचलले तर स्वत:चा पक्ष काढेन पण मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही.

बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरीही एकाला संधी दिली होती पण त्यांना ते समजलेच नाही. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अथवा अध्यक्ष होणार नाही. मी जे ‘मनसे’ नावाचे अपत्य जन्माला घातले त्याचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. आता पक्षाला अठरा वर्षे झाली असल्याने मनाला दुसरा विचार देखील शिवत नाही.’’

राज ठाकरे म्हणाले,

- विधानसभेसाठी राज्याचा दौरा करणार

- मोदींकडून तरुणाईच्या मोठ्या अपेक्षा

- सरकारने रोजगारासाठी प्रयत्न करावेत

- पुढील दहा वर्षांत देश वयस्कर होणार

- कराच्या बदल्यात राज्याला न्याय्य वाटा हवा

- अमित शहांसोबत जागावाटपाची चर्चा नाही

- शिंदे सेनेचे प्रमुख पद स्वीकारणार नाही

- रेल्वे इंजिन या चिन्हावर तडजोड होणार नाही

- पदाच्या मोहापायी कुणावरही टीका नाही

डॉक्टर, नर्सला पाठिंबा

पालिकेचे डॉक्टर आणि नर्स यांना निवडणुकीच्या कामासाठी जुंपण्यात आल्याच्या घटनेबाबत बोलताना राज म्हणाले, ‘हे डॉक्टर निवडणुकीच्या कामात मतदाराची नाडी मोजणार की नर्स मतदारांचे डायपर बदलणार आहेत? निवडणूक आयोग आपली एक समांतर फळी का उभारत नाही? नर्स आणि डॉक्टरांनी निवडणुकीच्या कामावर जाऊ नये, तुम्हाला कोण नोकरीवरून काढतो? ते मी पाहतो.’

मैदानातच सोडला रोजा

राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी शिवाजीनगर परिसरातून अनेक मुस्लिम मनसैनिक हे शिवाजी पार्क मैदानात दाखल झाले होते. एकीकडे रमजान सुरू असल्यामुळे दिवसभराचा उपवास ठेवून त्यांनी शिवाजी पार्क मैदानातच रोजा सोडला. तसेच त्याठिकाणी त्यांनी नमाज पठणही केले. ‘मनसे’च्या सभेसाठी मुंबईच्या परिसरातून विशेषतः नवी मुंबईसह, वसई, विरार, कल्याण, कोकण आणि उपनगरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले होते. बस, जीप, खासगी वाहने घेऊन कार्यकर्त्यांनी सभास्थळ गाठले.

सस्नेह स्वागत ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा अत्यंत आभारी आहे. आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या!

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

विकसित भारताच्या संकल्पासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशाचे खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांच्या या पाठिंब्यामुळे महाराष्ट्रातील भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांची महायुती अधिक मजबूत झाली आहे. त्यांच्या या निर्णयाचे मनापासून स्वागत.

- चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

राज ठाकरे हे दिल्ली दरबारी गेले त्याचवेळी ते भाजपबरोबर जाणार हे मराठी जनतेला कळले होते. वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असे वाटले नव्हते. वाघाची शेळी झाली आहे.

- विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे नेते

भाजपला लाभले नवे ठाकरे

महाराष्ट्रामध्ये राज यांच्या निमित्ताने भाजपला पुन्हा एकदा नवे ठाकरे मिळाले आहेत. महाविकास आघाडीच्याविरोधातील लढाईसाठी एक प्रभावी शस्त्र आपल्या हाती आल्याची भावना भाजप नेत्यांकडून व्यक्त होत आहे. राज यांच्या ताज्या भूमिकेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वागत केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या परिसरात राज यांच्या किमान दहा सभांचे भाजपचे नियोजन आहे. राज यांचा ज्या ठिकाणी प्रभाव आहे त्या ठिकाणी या सभांचे आयोजन करण्यात येईल. येत्या दोन दिवसांत राज यांना भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सहभागी होण्याचे निमंत्रण पाठविले जाऊ शकते.

राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या (ता.१०) कन्हान (जि. नागपूर) येथे दुसरी सभा होत असल्याने या सभेला राज यांनी हजेरी लावावी म्हणून भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. हिंदुत्ववादी विचारधारेला सोडचिठ्ठी देत काँग्रेससमवेत गेलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायला आता राज ठाकरे समवेत आल्याने मोठी सोय झाल्याचे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेनेचे आमदार, पक्ष, चिन्ह आणि नाव असे सगळे भाजपकडे आले असले तरी ठाकरे या नावाचा वारसा मात्र त्यांच्यासोबत नव्हता. आता राज यांनी मोदींना दिलेल्या पाठिंब्यामुळे आमच्याकडे ठाकरे आहेत असे भाजपला अभिमानाने म्हणता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT