uddhav thackeray, sharad pawar and prithviraj chavan sakal
महाराष्ट्र बातम्या

Mahavikas Aghadi : विधानसभेसाठीही एकजूट; ‘मविआ’चा निर्धार

लोकसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर महाविकास आघाडीने आता विधानसभेची आगामी निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्धार केला आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर महाविकास आघाडीने आता विधानसभेची आगामी निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्धार केला आहे. पक्ष सोडून गेलेल्यांना आता पुन्हा पक्षामध्ये घेणार नसल्याचा सूचक इशारा ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार’ पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिला.

मोदी की गॅरंटी काही खरी दिसत नाही असा टोला हाणत शरद पवार यांनी महायुतीसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच हल्ला चढविला. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप अजिंक्य असल्याचे वातावरण होते पण या अजिंक्य असण्यातला फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिला असल्याची चपराक उद्धव ठाकरे यांनी लगावली.

आगामी विधानसभा निवडणुकीतही आघाडीच विजयी होणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त करत विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन महाविकास आघाडीची शनिवारी दुपारी संयुक्त पत्रकार परिषद झाली.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या खास शैलीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई आदी उपस्थित होते.

म्हणून मोदींचे आभार

‘नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीदरम्यान जिथे जिथे रोड शो आणि सभा घेतल्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीने विजय मिळविला. म्हणूनच पंतप्रधानांचे आभार मानणे मी माझे कर्तव्य समजतो. महाविकास आघाडीसाठी राजकीय वातावरण अनुकूल केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत,’ अशी फिरकी शरद पवार यांनी घेतली. पवार म्हणाले, ‘मोदींची गॅरंटी काय खरी दिसत नाही. ते नाणं चालतयं असे दिसत नाही. त्यामुळे गॅरेंटीचा विश्वास दिला पण ती गॅरंटी प्रत्यक्ष कृतीत येत नाही.’

आता लढाई सुरू झाली आहे - ठाकरे

उद्घव ठाकरे म्हणाले, ‘संपूर्ण देशात भाजपविरुद्ध कोणी लढू शकणार नाही. ते अजिंक्य आहे असे वातावरण होते. या अजिंक्य असण्यातला फोलपणा महाराष्ट्राच्या जनतेने ताकदीने दाखवून दिला. ही लढाई फार विचित्र होती. आर्थिक आणि यंत्रणेच्या दृष्टीनेही ही लढाई विषम होती. संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी ही लढाई होती.

देशभक्त आणि लोकशाहीप्रेमी नागरिकांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला आणि देशात इंडिया आघाडीला कौल दिला. आता या देशाला जाग आली आहे पण हा विजय अंतिम नाही. लढाई आता सुरू झाली आहे. महाविकास आघाडी विधानसभा निवडणूकही एकजुटीने लढेल.’’

येत्या दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागतील. इतर राज्यांतही निवडणुका होतील. मुळात हे मोदी सरकार आता एनडीए सरकार झाले आहे. हे सरकार किती दिवस चालेल? हाही मोठा प्रश्न आहे. आमच्याबद्दल ही युती नैसर्गिक की अनैसर्गिक असे म्हटले जात होते पण दिल्लीत आता जे काही कडबोळे झाले आहे ते नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे? हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे.

- उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे प्रमुख

‘एम’ फॅक्टरही मराठीच

शिवसेनेला मराठी मते मिळाली नाहीत असे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मराठी मते का कमी मिळतील? ‘एम’ फॅक्टरमध्ये मराठी येत नाही का? असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्हाला लोकशाही वाचविण्यासाठी सर्वधर्मीयांनी मतदान केले. त्यात मराठी तर आहेतच.

हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि इतर सर्वच आहेत. रक्त सांडून मिळविलेली मुंबई त्यांच्या डोळ्यांदेखत लुटली जात असेल तेव्हा मराठी माणूस ती लुटणाऱ्या मत देईल का? महाराष्ट्र आणि मुंबई लुटणाऱ्यांना मराठी माणूस झोपेत सुद्धा मत देणार नाही. त्यामुळे भाजपला अजून वास्तवाची जाणीव झाली नसेल तर त्यांना निवडणुकीच्या निकालाच्या वास्तवाला सामोरे जावे लागेल.’’

त्यांना दारे बंदच

लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अपयश आले. त्यामुळे अजित पवारांसोबतचे बरेच नेते अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. अजित पवारांसोबतच्या नेत्यांना घरवापसी करावी अशी वाटली तर त्यांना पुन्हा पक्षात घेणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर ‘सवालही पैदा नही होता’ असे थेट उत्तर पवारांनी दिले. शिवसेना सोडून गेलेल्यांनाही ‘अजिबात परत घेणार नाही’ असे उद्घव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

अजित पवार ब्रॅंडचे काय?

अजित पवारांना घेऊन भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला. त्यावर पवार यांनी त्यांचा अनुभव काय तो त्यांना सांगितला. आम्ही का सांगावे? असे नमूद केले. ‘सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर केला. या सत्तेच्या गैरवापरातून जनतेने भूमिका घेतली. जनतेच्या कौलाने सरकार शहाणपणा घेईल असे वाटले होते पण त्यांनी शहाणपणा घेतला नाही. त्यामुळे तीन चार महिन्यांत लोक विधानसभेत ठोस भूमिका घेतील,’’ असे पवार म्हणाले.

अन् एकचा हशा पिकला

उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएबरोबर दिसतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘बरं ठीक आहे, समजा मला जायचं तर मग यांच्यामध्ये (महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये) बसून तुम्हाला सांगू का?’ असे उत्तर त्यांनी दिले. त्यांच्या या उत्तरावर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण खळखळून हसले.

महाविकास आघाडीकडून सर्वाधिक जागा ठाकरे गटाने लढविल्या होत्या मात्र निवडणूक निकालानंतर तुमच्या मित्र पक्षांचा परफॉर्मन्स चांगला राहिला का? असा प्रश्नही ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ठाकरेंनी माणिक वर्मा यांच्या ‘पारिजात पडला माझ्या दारी’ या गाण्याचे बोल ऐकवताच सर्वजण पुन्हा हसले.

महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले. या निवडणुकीत आमचे तीन पक्ष असले तरी छोटे-मोठे पक्ष आणि काही संघटना आणि काही सामाजिक कार्यकर्ते आमच्याबरोबर होते त्यामुळे या सर्वांचे आभार आम्ही मानतो. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने मोठा पाठिंबा दिला. भाजपला शेतकऱ्यांनी चांगला धडा शिकवला. काही ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न कऱण्यात आला मात्र त्याचा परिणाम झाला नाही.

- पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT