दुसऱ्यांचे पक्ष फोडल्यामुळे आज स्वतःच्या आमदारांचे संख्याबळ १०५ असूनही त्यांना १४ मंत्रिपद घेऊन थांबावे लागले आहे, ही शोकांतिका आहे.
सावंतवाडी : राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) हे ‘इंडिया अलायन्स’ सोबतच राहणार आहेत. त्यांच्याबाबत कुठलीही संदिग्धता नाही. ते ताकदीने एनडीएच्या आघाडीवर असल्याचे मत माजी गृह राज्यमंत्री काँग्रेस नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांनी येथे व्यक्त केले.
राज्यातील काँग्रेस एकसंघ असून कोणी कुठेही जाणार नाही. मुळात भाजपचाच जनाधार संपल्याने त्यांना दुसऱ्यांच्या कुबड्याची गरज लागते, अशी टीकाही त्यांनी केली. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील आरपीडी हायस्कूलमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, नागेश मोरे, साईनाथ चव्हाण, रवींद्र म्हापसेकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, सुधीर मल्हार, संजय लाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गचा विचार करता या ठिकाणी काहीशी काँग्रेस मागे गेली असली तरी या ठिकाणी काँग्रेसची विचारधारा मानणारा मतदार अजूनही आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी पुन्हा एकदा काँग्रेसला चांगले दिवस येतील, यात शंका नाही. काँग्रेस ही अविरत चालणारी नदी आहे. त्यामुळे कोण होते आणि कोण गेले, याची चिंता आम्ही करत नाही.
महाविकास आघाडी म्हणून आम्ही राज्यात एकत्र आहोत. आज फॉर्मुला घेऊन आम्ही सगळीकडे वावरत आहोत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद होतील, असे कुठलेही वक्तव्य चुकूनही येऊ नये याची दक्षता आम्ही घेत आहोत. राज्यातील काँग्रेस एकसंघ आहे. काँग्रेसमध्ये सगळं काही व्यवस्थित असून शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेस फुटेल अशी स्वप्न बाळगून असणाऱ्यांची स्वप्नच राहणार आहेत.
मुळात राज्यात भाजपचाच जनाधार संपला आहे. म्हणून त्यांना शिंदे गट, पवार गट यांच्यासारख्यांची कुबडे घेण्याची वेळ आली आहे. दुसऱ्यांचे पक्ष फोडल्यामुळे आज स्वतःच्या आमदारांचे संख्याबळ १०५ असूनही त्यांना १४ मंत्रिपद घेऊन थांबावे लागले आहे, ही शोकांतिका आहे. आज देशात ‘इंडिया अलायन्स’ भक्कम आहे. श्री. पवार हे सुद्धा ‘इंडिया अलायन्स’ सोबत राहणार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आज त्यांच्या संदर्भात उलट सुलट चर्चा सुरू असली तरी आमच्या मनात कोणतीही संदिग्धता नाही. देशात महागाईबरोबरच अशांततेचे वातावरण आहे. केवळ घोषणा करून जनतेला खुश करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. देशाचा विकास हा काँग्रेसच्या काळात झाला. गेल्या नऊ वर्षात देशावरचे कर्ज कोणी वाढवले, याचा विचार जनतेने केला पाहिजे, असंही पाटील यांनी सांगितलं.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लढवण्याबाबत काँग्रेसकडून मायक्रो प्लॅन तयार करण्यात आला आहे. तशा प्रकारची चाचपणही झाली आहे. परंतु, भाजपकडून निवडणुका घेतल्या जात नाहीत. मात्र, निवडणुका लागल्यास काँग्रेस सिंधुदुर्गमध्ये नक्कीच मुसंडी मारेल यात शंका नाही, असेही श्री. पाटील म्हणाले.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर कोल्हापुरात केवळ पर्यटनासाठी येतात, अशी खिल्ली मित्रपक्ष भाजपच्या जिल्हाध्यक्षाकडून उडवली आहे. तसे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे पालकमंत्री म्हणून त्यांच्या कामाबाबत न बोललेलेच बरे, असा चिमटा श्री. पाटील यांनी काढला. पत्रकारांनी केसरकरांच्या कामाबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी वरील विधान केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.