Madha Loksabha 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

Madha Loksabha 2024 : माढ्यात मोहितेंची नाराजी भाजपला जड जाणार? काय आहे घराण्याचा इतिहास अन् सध्याची परिस्थिती?

महाराष्ट्राच्या राजकारणात अडगळीला गेलेले मोहिते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी धडपड करत आहेत. आणि धडपडीतूनचं माढा लोकसभा निवडणूक आता प्रतिष्ठेची केली आहे. मोहिते पाटील कोण आहेत, ज्यांची नाराजी भाजपच्या ४५ पार च्या नाऱ्याला सुरुंग लावू शकतो...

Yash Wadekar

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी आता घुमू लागली आहे. २०२४ ची निवडणूक ही ऐतिहासिक होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन महत्त्वाची नावे म्हणजे पवार आणि ठाकरे. या दोन्ही घरांसाठी ही निवडणूक अस्तितवाची लढाई आहे. एका बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले तर पवारांच्या घराला बंडाची वाळवी लागली. पण हे झाले राज्याचे चित्र, महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात एक शक्तिपीठ हे असतंच.. असंच महाराष्ट्राच्या राजकारणावर काही काळ वर्चस्व असणारं घरं म्हणजे अकलूजचे मोहिते पाटील.

महाराष्ट्राच्या राजकारणात अडगळीला गेलेले मोहिते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात कमबॅक करण्यासाठी धडपड करत आहेत. आणि धडपडीतूनचं माढा लोकसभा निवडणूक आता प्रतिष्ठेची केली आहे. मोहिते पाटील कोण आहेत, ज्यांची नाराजी भाजपच्या ४५ पार च्या नाऱ्याला सुरुंग लावू शकतो. माढा लोकसभा आणि सोलापूर मतदार संघात भाजपचं राजकारण संपणार का, हे आपण जाणून घेणार आहोत.

सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पसरलेला माढा लोकसभा मतदारसंघ या ना त्या कारणाने सतत चर्चिला जात असतो. अकलूजचे मोहिते पाटील माढा लोकसभेचा खासदार ठरवतात, अशी जनमाणसांची भावना आहे. सुरूवातीला मोहिते पाटलांविषयी थोडक्यात जाणून घेऊ

मोहिते घराण्याच्या इतिहास काय?

शंकरराव मोहिते पाटील हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासातलं महत्त्वाचं नाव. शंकरराव मोहिते पाटलांविषयी हरिश्चंद्र मगर लिहतात, शेतात निढळाचा घाम गाळून श्रम करणाऱ्या शेतकरी, कष्टकऱ्यांपासून स्व. इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या सर्वांनाच आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्त्व. स्वातंत्र्य चळवळीतील सच्चा देशभक्त, व्यापक समाजहितांची भूमिका मांडून त्यासाठी नवनवीन संकल्पना सातत्याने राबणारा लोकनेता म्हणून शंकररावांकडे पाहिलं जायचं.

शंकराव मोहिते पटालांनी अकलूजचा कायापालट केलाच त्यासोबत सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात काँग्रेसचे हात बळकट करण्याचं नेहमीच काम केल आहे. शंकरराव मोहिते पाटलांच्या नंतर त्यांचा राजकीय वारसदार म्हणून उदयास आले ते विजयसिंह मोहिते पाटील. विजयसिंह मोहिते पाटलांच्या यांच्या लग्नावेळी लक्ष भोजनामुळे शंकररावाचे विधानसभेची उमेदवारी गेली होती. शंकररावांनी उमेदवारी गेली तरी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केलं. पक्षाशी असणारी एकनिष्ठेमुळे मोहिते पाटील घराणं अगदी दिल्लीच्या जवळंच होतं.

शंकरराव मोहिते पाटलांनतर माळशिरस या विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व विजयसिंह मोहिते पाटील करू लागले. १९८० ते २००९ पर्यंत ते माळशिरस तालुक्याचे आमदार होते. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. विजयसिंह मोहिते पाटलांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदही भूषवलं आहे. 2009 साली, माळशिरस मतदारसंघ राखीव झाला आणि विजयसिंह मोहिते पाटलांनी पंढरपूर येथून निवडणूक लढवली. पंढरपूरमधून भारत नाना भालके यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर काही काळ पक्ष कामात मोहिते पाटलांचा वावर राहिला आणि २०१४ साली त्यांनी माढा लोकसभा निवडूक लढवली आणि निवडून आले.

मोहिते घराला तडे गेल्याने प्रतापसिंह मोहिते पाटील आणि विजयसिंह, असा संघर्ष काही काळ सुरू राहिला. प्रतापसिंह मोहिते पाटलांनी गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश केलेला.

माढा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास...

२०१९ ला निवडणुकांच्य तोंडावर विजयसिंह मोहिते पाटलांनी नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. २०१९ ला रणजितसिंह नाईक निबांळकरांना उमेदवारी घोषित झाल्याने मोहिते पाटीलांनी निंबाळकरांसाठी प्रचार केला आणि संजय मामा शिंदेंचा पराभव करण्यात मोलाची भूमिका बजावली, गेली पाच वर्षे मोहिते पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातून गायब होते.

२०२४ च्या लोकसभा लढवण्यासाठी मोहिते पाटील उत्सुक आहेत. गेली वर्षभर धैर्यशील मोहिते पाटील मतदारसंघात दौरे करत आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी फिंल्डिंग लावलेली. पण भाजपने खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिल्याने मोहिते पाटील नाराज झाले आहेत.

२००९ साली माढा लोकसभा मतदार संघ अस्तितवातत आला. शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार, त्यामुळे शरद पवारांना मानणारे विशेष मतदार माढ्यामध्ये आहेत. त्यामुळे माढा लोकसभेसाठी मोहिते पाटलांनी तुतारी हाती घ्यावी यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह दिसत आहे.

असा आहे माढा लोकसभा मतदारसंघ

माढा लोकसभा मतदारसंघ हा सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांनी बनला आहे. सोलापूर जिल्ह्यातील, करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण आणि माण–खटाव या तालुक्यांचा माढा लोकसभा मतदारसंघात समावोश होतो.

करमाळा येथे संजय शिंदे हे आमदार आहेत. माढा येथून बबनदादा शिंदे, सांगोला येथे शिंदेंच्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील, माळशिरसमधून राम सातपुते हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे माढ्यात महायुतीचे वर्चस्व दिसत असताना मोहिते पाटलांची नाराजी ही न परवडणारी असणार आहे.

सोलापूर जिल्हा

• २४४ - करमाळा विधानसभा मतदारसंघ

• २४५ - माढा विधानसभा मतदारसंघ

• २५३ - सांगोला विधानसभा मतदारसंघ

• २५४ - माळशिरस विधानसभा मतदारसंघ

सातारा जिल्हा

• २५५ - फलटण विधानसभा मतदारसंघ

• २५८ - माण विधानसभा मतदारसंघ

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष

पंधरावी लोकसभा

२००९-२०१४ शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सोळावी लोकसभा

२०१४-२०१९ विजयसिंह मोहिते-पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

सतरावी लोकसभा

२०१९- रणजित नाईक-निंबाळकर

भाजप

मोहिते पाटील का महत्त्वाचे?

मोहिते पाटलांची नाराजी ही भाजपला लोकसभेसोबतच विधानसभेलाही घातक ठरू शकते. उदा. माळशिरस येथून भाजपचे राम सातपुते हे आमदार आहेत, ते मोहिते पाटलांच्या पाठिंब्यामुळेच. तसेच माढ्यासोबतच सोलापूर लोकसभा मतदारसंघात ही मोहितेंना मानणारा, एक मोठा वर्ग आहे. मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतल्यास शरद पवार आणि मोहिते पाटील हे समीकरण भाजपसाठी सोलापूरसह माढ्यातही घातक ठरू शकते. सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपने पाय पसरले आहेत. त्यामुळे मोहितेंना दुखावणं भाजपला परवडणार नाही...

रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध का होतोय?

मोहिते पाटलांना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उसळी घ्यायची आहे. २०१९ ला निंबाळकरांना माढा लोकसभा देण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. भाजपमध्ये नवे असणाऱ्या मोहिते पाटलांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पण आता मोहितेंना पुन्हा माढ्याचे राजकारण आपल्या हातात घ्यायचे आहे. खासदार झाल्यापासून निंबाळकरांनी मोहितेंशी संपर्क कमी केल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे मोहिते या वेळेस निंबाळकरांचे काम करणार नाहीत, याची कुणकुण १ वर्षापासूनच सुरू होती.

याला जोड मिळाली ती फलटणचे विधान परिषदेचे आमदार रामराजे निंबाळकरांची, रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर यांच्यात पिढीजात वैर असल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादी पक्ष फुटला नसता तर माढ्यात निंबाळकर विरूद्ध निंबाळकर अशीच लढत होणार हे स्पष्ट होत. पण पक्ष फुटल्याने आपण लोकसभा लढवणार नसल्याचे संकेत रामराजेंनी आधीच दिलेले.

मतदारसंघात ये-जा नसणे, जनतेंशी संपर्कात नसल्याचे आरोप करत अनेक स्थानिक नेत्यांनी रणजितसिंह निंबाळकरांच्या नावाला विरोध केला होतो. पण भाजपने विरोधाला न जुमानता पुन्हा त्यांना संधी दिली.

कोण कोणाच्या बाजूने?

माढ्यात मोहिते पाटील विरूद्ध निंबाळकर असाच सामना रंगणार हे जवळपास निश्चित झालं आहे. पण असा सामना झालाचं तर कोण कोणाच्या बाजूने असेल, याबाबत थोडक्यात आढावा घेऊया..

माढा मतदारसंघात करमाळा, माढा, माळशिरस, माण, सांगोला, फलटण या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. करमाळा मतदार संघातून आमदार असणारे संजय मामा शिंदे हे अपक्ष असले तरी त्यांची ओढ ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे अजित पवारांनी सांगितल्यास संजय शिंदे हे निंबाळकरांच्या पाठिशी उभे राहू शकतात. पण करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटीलांनी मोहिते पाटालांच्या शिवरत्न बंगल्यावर पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीला हजरे लावल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे करमाळा विधानसभेतून मतदानाचे विभाजन होऊ शकतं.

करमाळ्यानंतर महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे, माढा. बबनराव शिंदे हे माढ्याचे आमदार आहेत. पवारांचे जवळचे सहकारी मानले जाणारे बबनदादा पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवारांसोबत गेले आहेत. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निंबाळकरांचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण माढा तालुक्यात शरद पवारांचा फॅक्टर ही महत्त्वाचा ठरतो, त्यामुळे बबनदादा शिंदे निंबाळकरांना माढ्यातून लीड देतील, याबाबत साशंका व्यक्त करण्यात येत आहे.

माढ्यानंतर नंबर लागतो तो माळशिरस तालुक्याचा. माळशिरस हा मोहिते पाटलांचा गड मानला जातो. विजयसिंह मोहिते पाटील माळशिरस मधून १९८० ते २००९ पर्यंत आमदार होते. आताचे माळशिरसचे आमदार राम सातपुते हे मोहितेच्या पाठिंब्यामुळे निवडून आले आहेत. त्यामुळे मोहिते पाटील घरातून उमेदवार असल्यास माळशिरस हा मोहितेंचा हक्काचा मतदारसंघ मानला जात आहे.

सांगोला बद्दल बोलायचं झाल्यास काय झाडी, काय डोंगर फेम शहाजीबापू येथून आमदार आहेत. गणपत आबा पाटलांचा हक्काचा मतदारसंघ सांगोला अगदी थोड्या मताने बापूंनी आपल्याकडे घेतला आहे, अनिकेत देशमुख हे ६६८ मतांनी पराभूत झालेले. मोहितेंच्या बैठकीत अनिकेत देशमुख ही उपस्थित होते. माढ्यातून देखमुखांना उमेदवारी देतील अशा चर्चाही रंगलेल्या आहेत.

सांगोल्यानंतर फलटण आणि माण तालुक्यात निंबाळकरांचे पारडे जड आहे. निंबाळकर हे फलटणचे असल्याने होमपीचवरून त्यांना चांगलं मताधिक्क मिळू शकतं असं बोललं जात आहे. सागर बंगल्यावर झालेल्या बैठकीत रामराजेंची नाराजी ही मावळल्याचे बोलले गेले, त्यामुळे फलटण हे नाईक निंबाळकरांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे,

तसेच माण खटावचे आमदार जयकुमार गोरेंनी निंबाळकरांच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. गोरेंची प्रसिद्धी पाहता माण खटाव मधून ते आपले मित्र नाईक निंबाळकरांसाठी पूर्ण ताकदीने मदत करतील असं चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT