भाजप आणि ठाकरे शिवसेना या पक्षांसोबत युती केली; पण पक्षाला सापत्न वागणूक मिळाली. मोठा मासा छोट्या माणसाला गिळतो, ही भाजप आणि काँग्रेसची पॉलिसी आहे.
कुडाळ : भाजप व शिवसेनेने (BJP and Shiv Sena) आमच्याशी निवडणुकीपुरतीच युती केली. आता विचारतही नाहीत. सापत्न वागणूक दिली जाते. आम्हालाही त्यांची गरज नाही. येणारी लोकसभा, विधानसभा स्वतंत्र लढून दाखवू, असं महादेव जानकर यांनी म्हटलंय.
सत्ता आमच्याशिवाय बनू शकणार नाही, हे दाखवून देऊ, असा इशाराही राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी येथील पत्रकार परिषदेत भाजपला दिला. राज्यातील सर्व विधानसभेत स्वतंत्र उमेदवार उभे करणार असून, महाराष्ट्रात चमत्कार करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील मराठा समाज सभागृहात झाला.
यावेळी कोकण विभाग अध्यक्ष भगवान ढेबे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड. किशोर वरक, जिल्हा सरचिटणीस जाफर शेख, कोकण विभाग संघटक तानाजी गुरव, जिल्हा संघटक राजेंद्र माने, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश झोरे, रायगड जिल्हाध्यक्ष संपत ढेबे आदी उपस्थित होते. या मेळाव्यानंतर जानकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
जानकर म्हणाले, ‘‘मतदारसंघांमध्ये जागृती करण्यासाठी जनस्वराज्य यात्रा सुरू करण्यात येत आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा घेऊन पक्ष स्थापन केला. पक्षाला वीस वर्षे पूर्ण होत असून, विसावा वर्धापन दिन सोहळा २९ ऑगस्टला पुणे येथे साजरा करणार आहोत.
महाराष्ट्रात सत्ता कोणाची हेच समजत नाही. येत्या काळात विधानसभेत आमचे २० आमदार जिंकून येतील, असा विश्वास आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चमत्कार घडेल. महाराष्ट्रातील जनता सत्य जाणते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या पक्षांचे मनसुबे उधळले जातील.’’
भाजप आणि ठाकरे शिवसेना या पक्षांसोबत युती केली; पण पक्षाला सापत्न वागणूक मिळाली. मोठा मासा छोट्या माणसाला गिळतो, ही भाजप आणि काँग्रेसची पॉलिसी आहे. राष्ट्रीय समाज पक्ष देशातही सक्रिय आहे.
बेंगलोर, आसाम, उत्तर प्रदेशातही आमच्या पक्षाने यश मिळविले आहे. आगामी निवडणुकांत मी खासदारकीची निवडणूक परभणी, माढा, मिर्झापूर (उत्तर प्रदेश) यामधील दोन मतदार संघांतून लढविणार आहे, असे जानकर यांनी स्पष्ट केले.
येत्या काळात कोकणातही पक्षाचे काम वाढविणार आहे. कोकणात १५ दिवस दौरा करणार आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात यश मिळाले आहे; पण कोकणात पक्ष कमी दिसत आहे. पक्षाला कोकणात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत यश नक्कीच मिळेल, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त
केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.