एकलहरे (जि.नाशिक) : अनेक संकटांना सामोरे जात महानिर्मिती कंपनीने लॉक डाऊनच्या काळातही वीजनिर्मितीत सातत्य ठेवले. महानिर्मितीची सध्याची स्थापित क्षमता १३ हजार १८२ मेगावॅट इतकी असून, कंपनी देशात दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे सध्या कोळसाटंचाई जाणवत असली, तरी वीजनिर्मितीसाठी सज्ज असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
सद्य:स्थितीबाबत महानिर्मितीचे स्पष्टीकरण
गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे महानिर्मितीला रेल्वेद्वारे साधारण प्रतिदिन १५ रॅक्स, तसेच रस्ता वाहतुक, रोप-वेद्वारे एकूण साधारण ७० हजार मेट्रिक टन इतक्याच प्रमाणात कोळसा प्राप्त होत आहे. कोळसा टंचाईचे संकट एनटीपीसीसह देशातील सर्वच वीज केंद्रांना जाणवत आहे. त्यातच, प्रचंड थकबाकीमुळे कोळसा कंपन्यांचे देणे देण्यासाठी पुरेसा निधी महावितरणकडून उपलब्ध होत नसतानाही यंदा पावसाळ्यापूर्वी १८ एम. एम. टी. कोळशाचा साठा करण्यात आला. तथापि, लॉकडाऊननंतर वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी या काळात महानिर्मितीने वायु आणि जल विद्युतसह प्रतिदिन सुमारे ७ हजार मेगावॅट वीजनिर्मिती साध्य केली असून, ती गेल्या तीन वर्षांतील या काळातील सरासरी तीस टक्क्यांनी जास्त आहे. अर्थात्, या परिस्थितीत औष्णिक संचांचे संचलन करताना महानिर्मितीला कसरत करावी लागत आहे. तरीही, नियंत्रित क्षमतेने औष्णिक संच सुरु राहावेत यासाठी महानिर्मिती कसोशीने इंधन व्यवस्थापनाच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
सर्वतोपरी प्रयत्न
सध्याच्या कोळसा टंचाईतून मार्ग काढण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. कोळसा टंचाईची समस्या दूर करण्यासाठी राज्याचे ऊर्जा खाते, कोळसा मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय व रेल्वे मंत्रालय यांच्यात रोज वरिष्ठ- सचिव पातळीवर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनीही केंद्रातील कोळसा मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून कोळसा टंचाईचे गांभिर्य निदर्शनास आणून दिले आहे. तसेच, महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी व अन्य कर्मचारी संबंधित कोळसा खाण परिसरात उपस्थित असून, जास्तीत जास्त कोळसा प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
आश्वासक परिस्थिती
सध्याची निकड लक्षात घेता मे. वेस्टर्न कोलफिल्ड्स लि. यांच्याकडून कॉस्ट प्लस तत्वावर गौरीदीप, उधनी, भटाडी, उर्धन व न्यू मांजरी या खाण परिसरातून रोज साधारण १ रेक कोळसा चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राला प्राप्त होत आहे. येत्या ३-४ दिवसांत कोळशाची कमतरता कमी होऊन आवक वाढण्याची आश्वासक परिस्थिती आहे. अशा सर्व उपाययोजनांमुळे आगामी काळात लवकरच कोळसा टंचाईवर मात करण्यात यश येणे अपेक्षित आहे, अशी ग्वाही महानिर्मितीने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.