नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (DR. B. R. Ambedkar) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. ते सर्वच क्षेत्रात विद्वान होते. सखोल अभ्यास, अखंड चिंतन, विशाल दूरदृष्टी, समाजभान असणाऱ्या बाबासाहेबांनी राजकारणापासून तर शैक्षणिक क्षेत्रापर्यंत अशा सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी गेली. आज या महामानवाची जयंती (Ambedkar Jayanti 2022) आहे. बाबासाहेबांसोबत जुळलेल्या आंबेडकरी चळवळीमध्ये आपल्याला निळा रंग दिसतो. मग बाबासाहेब आणि निळा रंग याचं नेमकं नातं काय? आंबेडकरी चळवळीमध्ये नेमका निळा रंग का वापरण्यात आला? या निळ्या रंगाचं महत्वं काय? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण घेणार आहेत.
सुरुवातीला निळा रंग होता का? -
बहुजनांनी ज्यावेळी संघर्ष केला, संघर्षाविरोधात लढा उभारला त्या मोर्चा आणि रॅलीमध्ये निळा रंग दिसतो. तसेच आंबेडकरी चळवळींचा झेंडा देखील निळ्या रंगाचा आहे. पण, सुरुवातीपासून निळा रंग होता का? याबाबत भारतीय दलित पँथरचे महाराष्ट्र संयोजक आणि वकील रमेशभाई खंडागळे सांगतात, ''बाबासाहेबांनी कार्याला सुरुवात केली. त्यावेळी कुठलाही विशेष रंग किंवा झेंडा नव्हता. बाबासाहेबांनी स्वतंत्र कामगार पक्षाची पायाभरणी केली. त्यामध्ये सर्व जाती-धर्मीयांचे लोक सहभागी होते. याठिकाणी बाबासाहेबांनी लाल झेंडा आणि फाईव्ह स्टार वापरले होते. या पक्षाला चांगलं यश मिळालं. देशामध्ये स्वतंत्र कामगार चळवळीसाठी एक आयोग आला होता. त्यासमोर बाबासाहेबांना गोरगरीबांची कैफियत मांडायची होती. त्यावेळी त्यांना विचारण्यात आले होते, की तुम्ही दलितांचे पुढारी म्हणून की स्वतंत्र कामगार पक्षाचे नेते म्हणून कैफियत मांडणार आहात? जर पक्षाचे नेते म्हणून तुम्हाला कैफियत मांडायची असेल तर तुम्हाला दलितांचे प्रश्न मांडता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र संघटना तयार करावी लागेल, असे त्या आयोगाने सांगितले होते. त्यावेळी बाबासाहेबांना खूप मोठा प्रश्न पडला होता.''
निळ्या रंगाची सुरुवात कुठून झाली?
आंबेडकरी चळवळीमध्ये दिसत असलेल्या निळ्या रंगाची सुरुवात नेमकी कुठून झाली? याबाबत खंडागळे सांगतात, ''बाबासाहेबांनी स्वतंत्र कामगार पक्षाला यश मिळाल्यानंतरही शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. त्यावेळी निळा झेंडा वापरण्यात आला. इथंपासून निळ्या रंगाला सुरुवात झाली. तोच झेंडा आता रिपब्लिकन पक्षाने देखील पुढे नेला आहे.''
निळाच रंग का वापरण्यात आला? -
भगवा, लाल, हिरवा असे अनेक रंगाचे झेंडे आपल्याला दिसतात. मग, बाबासाहेबांनी निळाच रंग का वापरला असावा? तर, ''आकाशाचा रंग निळा आहे. आकाशामध्ये जी विशालता आहे ती विशालता आमच्या ध्येय्य, धोरणात आणि पक्षात असणार आहे, असं बाबासाहेब सांगायचे. त्यामुळे हा निळा रंग वापरण्यात आला. त्यानंतर निळ्या झेंड्यावर अशोकचक्र घेतलं होतं. ते घेताना बाबासाहेबांनी सांगितलं, की अशोक चक्र हे गतिमान आहे. ते कधीही थांबत नाही. त्यामुळे आपल्याला देखील त्याप्रमाणे गतिमान व्हायचं आहे. अशारितीने आंबेडकरी चळवळींचा निळ्या रंगाचा झेंडा तयार झाला.'' असं खंडागळे सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.