कोल्हापूर (Kolhapur) तुंबलं, पाण्यानं भरलं, पंचगंगेनं रौद्ररूप घेतलं आणि नदीकाठच्याच नव्हे, तर सुरक्षित मानल्या जाणाऱ्या भागातही लोकांची दैना उडाली. तसं या प्रकारचं संकट कोल्हापूरला नवं नाही. दर चार-सहा वर्षांनी पंचगंगेची मच्छिंद्री, त्यासोबत नागरी वस्त्यांत पाणी घुसणं हे कोल्हापूर अनुभवतं आहे. संकट परिणामांच्या अंगानं तसंच आहे; मात्र यावेळच्या कोल्हापुरातील जलसंकटाचा आयाम वेगळा म्हणून दखलपात्र; आणि धोरणकर्ते, राज्यकर्ते, नियोजनकर्त्यांच्या कानाजवळ घंटानाद करणारा आहे. ना अलमट्टी भरलं आहे, ना कोयनेतून, राधानगरीतून, काळम्मावाडीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं. अगदी २०१९ च्या महापुराहून अधिक भागात पाणी कसं घुसलं, याचं उत्तर उद्दाम विकासप्रक्रियेत शोधणार की नाही? यावेळी राज्यातील धरणांना, अलमट्टीला दोष देता येत नाही आणि पाणी कळंबा, कात्यायनी, पाचगावकडून नागरी वस्त्यांत शिरत पंचगंगेच्या काठाकडं वाहत गेलं. हे नवं वास्तव नदी इतकंच शहरातील नाल्यांच्या परिसरातील भर, बांधकामं आणि गुन्हेगारी स्वरुपाचं गैरव्यवस्थापन चव्हाट्यावर आणणारं आहे.
पाऊस कायम राहत नाही आणि तो आणत असलेलं संकटही ओसरतंच. तसं ते ओसरल्यानंतर काही झालंच नाही अशा थाटात सारे व्यवहार पुढच्या अनर्थापर्यंत सुरू ठेवण्याचा परिपाठ जर आपण कायम ठेवणार असू, तर या शहरात कोणताच भाग सुरक्षित राहणार नाही. ही भयघंटा आहे, ती ऐकून आपल्या कार्यपद्धतीत बदल करायचा की क्षुद्र राजकीय, आर्थिक स्वार्थापायी कोल्हापूर पुन्हा पुन्हा तुंबत राहील याची बेगमी करायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न.
दोन-चार दिवसांच्या पावसानं कोल्हापूर शहराची दैना उडवली. शहराचा सखल भाग पाण्याखाली गेलाच; पण दक्षिणेकडं तुलनेत उंचावर असलेल्या भागातही ओढ्याचं पाणी शिरलं. उंच इमारतीतून नागरिकांना बाहेर पडावं लागलं, इस्पितळांतून रुग्णांना हलवावं लागलं. अनेक रस्ते पाण्यात गेल्यानं वाहतुकीची दाणादाण झाली. सरकारी यंत्रणा तुलनेत सजग होती. धरणसाठ्याचं नियोजन अधिक सुज्ञपणानं केलं गेलं. एनडीआरएफच्या तुकड्याही गावंच्या गावं पाण्यात जाण्यापूर्वीच डेरेदाखल झाल्या होत्या. मात्र, हे झालं संकटातून सावरण्याचं नियोजन. या वेळी किमान कोल्हापूर शहरात महापुराच्या संकटानं चाल बदलली आहे. त्याची दखल घेणारा नियोजन-धोरण बदल होणार का, हा महापुरानं आणलेला प्रश्न आहे. या वेळी अलमट्टी भरलेलं नाही. तिथून विसर्गही लक्षणीय होत राहिला. कोयना, राधानगरी ही पंचगंगेच्या पुराला कारणीभूत ठरू शकणारी धरणंही भरलेली नव्हती. त्यातून फार पाणी सोडलं जात नव्हतं आणि शहर तुंबलं तोवर झालेला (गुरुवारपर्यंत) पाऊस फार प्रचंड म्हणावा असा नव्हता. तरीही टाकलेल्या भरावाला वळसा घालून, रिटेनिंग वॉल तोडून किंवा बाजूनं वाट काढत पाणी शहरात अनेक ठिकाणी पसरत होतं. ते पंचगंगेतून बाहेर पडणारं नव्हतं, तर पंचगंगेकडं निघालेलं होतं.
सर्वसाधारणपणे राधानगरी, कोकणात मोठा पाऊस झाला की धरणं भरतात. तिथून पाणी मोठ्या प्रमाणात आलं, त्याच वेळी कोयनेतूनही पाणी सोडल्यानं कृष्णेची पंचगंगेला सामावण्याची क्षमता संपली आणि तेव्हाच शहरातही पाऊस असेल तर पूर- महापुराची स्थिती येते. त्याहून काही वेगळं या वेळी घडलं आहे. आधी ओढे-नाल्यांनी आपली जागा सोडली. ते लगतच्या वस्त्यांत घुसले. नंतर पंचगंगेचं पाणी वस्त्यांत आलं. पंचगंगेचं पाणी फुगतं. त्यात ओढे सामावले जात नाहीत, त्यामुळं ते मागं फुगतात आणि पाणी पसरतं, या रूढ चालीच्या उलट अनुभव यंदा येतो आहे. महापूर साकारण्याची ही उलट रचना समजून घ्यायला हवी. हे वेगळेपण अधिक चिंताजनक आहे. धरणक्षेत्रातील पावसासोबतच धरण ते नदी या क्षेत्रातील पाऊस मोजण्याचं, त्याचे परिणाम समजून तयारीचं तंत्र आता विकसित करावं लागेल, हे यंदाचा महापूर सांगतो आहे. तसंच शहरात जिथं जिथं पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडले - अडवले, वळवले, अशा सर्व ठिकाणी दुरुस्ती केली पाहिजे, हेही सांगतो आहे. यात अडवणारे, वळवणारे कोण, याची तमा बाळगायचं कारण नाही. तसंच हे प्रकार पुन्हा होणार नाहीत अशी दक्षता घेण्याची गरजही अधोरेखित करतो आहे.
शहर कवेत घेणारा महापूर कधी तरी शंभर वर्षांतून येतो, असं सांगून मतलब साधणारे शहराला संकटात लोटतात, हे कितीही झोंबणारं असलं तरी वास्तव आहे. ते करणारे, त्याला साथ देणारे सारेच शहर तुंबण्याच्या पापाचे धनी आहेत. महापुरानं ओढे-नाले साफ करण्याचं जे कर्मकांड दरवर्षी केलं जातं ते किती भोंगळ आहे हेही दाखवलं आहे. नाल्यातला कचरा, राडारोडा लगतच पडला असेल तर तो महापुराच्या हाहाकारात भर टाकणार हेही का समजू नये? महापुरात ओढ्याच्या काठानं पाहणी करून नुसती निरीक्षणं नोंदवली असती तरी यंत्रणेला पुढच्या नियोजनात उपयुक्त ठरली असती, असं हे वास्तवदर्शन होतं. पण हे करायचं कोणी?
कोल्हापुरात कधी तरी आपत्ती निवारणाच्या - व्यवस्थापनाच्या पलीकडं जाऊन आपत्ती येणार नाही, आली तरी परिणाम कमीत कमी राहील, याची धोरणात्मक आखणी करणार की नाही, असा खडा सवाल यंदाच्या महापुरानं उभा केला आहे. १९८९ च्या महापुरापासून त्याच गावांत पाणी शिरणं, तिथलं स्थलांतर, मदतीचा ओघ, गावं हलवण्यावर चर्चा, पुन्हा नव्या पावसात नव्यानं तेच ते, हे आवर्तन आपण पाहतो आहोत. देशात कुठं नसतील इतक्या सजग संस्था, व्यवस्था कोल्हापुरात उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळं आपत्ती आल्यानंतर त्यातून मार्ग काढण्यासाठी सहजपणे कोल्हापुरी माणूस धावून येतो.
संकट तात्पुरतं का असेना, निभावून जातं. पण फार प्रचंड पाऊस न पडताही रंकाळा ओसंडून वाहतो तेव्हा आपलं काही तरी चुकलेलं असतं. धरणं भरली नसताना रामानंदनगर परिसरात ओढा घरात घुसतो तेव्हा काही तरी चुकलेलं असतं. धरणातून पाणी फारसं बाहेर पडत नसताना पुणे-कोल्हापूर महामार्गावर पाणी येतं तेव्हा काही गंभीर चुकलेलं असतं. ज्या भागात कधीच पाणी भरताना दिसलं नाही त्या रुईकर कॉलनी परिसरातही पाणी भरू लागतं तेव्हा नक्कीच काही चुकलेलं असतं. हे काय चुकलं, याचा शोध घ्यायचा की अतिपाऊस हे नैसर्गिक संकट म्हणून पाऊस सरताच गणपतीच्या तयारीला लागायचं, हे आता ठरवायचं आहे. हे ठरवायचं आहे या शहराचं व्यवस्थापन ज्यांची जबाबदारी आहे त्या महापालिकेनं, जिल्हा प्रशासनानं, आपण जबाबदार आहोत असं समजणाऱ्या लोकप्रतिनिधींनी.
रंकाळ्याच्या गुळणीचा सांगावा
रंकाळा गुळणी टाकतोय, असं गुरुवारी सायंकाळी या परिसरात लोक सांगू लागले. म्हणजे रंकाळ्याचं पाणी राजघाटावरून बाहेर पडायला लागलं. हे असं या आधी एकदाच २००५ मध्ये झालं होतं. असं होणं म्हणजे रंकाळा नावाच्या तलाव म्हणवल्या जाणाऱ्या, प्रत्यक्षात धरण असलेल्या जलसाठ्याला धोका तयार होणं. रंकाळ्यानं कधीच गुळणी टाकू नये, अशी त्याची रचना केली आहे. एका विशिष्ट मर्यादेनंतर रंकाळ्याचं पाणी एका बाजूनं बाहेर पडतं. राजघाट वाहायला लागतो तेव्हा ही व्यवस्था बिघडलेली असते. मुळात रंकाळा पावसाळ्याआधी रिकामा करावा असं अनेक जण सुचवतात ते असले प्रकार टाळण्यासाठी. मात्र ते होत नाही. कायम गच्च भरलेला रंकाळा हवाच, हा अट्टहास कोणाचा? कशासाठी? तो अनाठायी असेल तर महापालिका का खपवून घेते? रंकाळ्याच्या परतून जाणाऱ्या पाण्यातील अडथळे हटवले तेव्हा राजघाटावरून वाहणारं पाणी बंद झालं. हे अडथळे येतातच कसे? यावर लक्ष ठेवायची जबाबदारी कुणाची? रंकाळ्याच्या बाजूला परताळं आहे. ते खरं तर रंकाळ्याचा श्वास. तिथं भराव टाकून बांधकामांच्या विकासाचा जो उच्चांक होतो आहे तो रंकाळ्याचा श्वास कोंडणारा ठरला तर नवल नाही.
रंकाळ्यातून अतिरिक्त पाणी बाहेर पडावं यासाठीच्या अनेक छोट्या योजना आहेत. त्या सगळ्याकडं दुर्लक्ष झालं तरच रंकाळा गुळणी टाकतो. यंदा हे का घडलं, याची कारणमीमांसा करणार की नाही? हितसंबंध कोणाचे आणि कोण किती वजनदार पुढाऱ्याच्या जवळचा, यावर रंकाळ्याच्या भवितव्याशी खेळणारे निर्णय होत राहतील तोवर रंकाळा गुळणी टाकत राहील. असा मूर्तिमंत धोका उभा असताना हलगी-घुमकं लावून नाचणं हा अनास्थेचा कळसच. सुशोभीकरणाच्या नावाखाली रंकाळ्याची वाट लावण्याच्या प्रयत्नांना कोल्हापूरच्या जनतेनंच हाणून पाडलं होतं. याच कोल्हापूरकरांनी रंकाळ्याच्या स्वास्थ्याशी खेळ मांडणारे प्रकार रोखण्यासाठी आवाज मारायला हवा. भल्याभल्यांच्या हितसंबंधांना गाडणारी वज्रमूठ रंकाळ्याच्या तीरावर नागरिकांनी दाखवल्याचा इतिहास आहेच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.