Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Budget 2024 : घोषणांची गर्जना ; निधीचा वर्षाव

युवक, महिला, शेतकरी चिंब; राज्यावर ७ लाख ८२ हजार ९९१ कोटींचे कर्ज

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अवघे राज्य पावसाची चातकासारखी वाट पाहात असताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पातून विविध घटकांवर घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला.

युवक, शेतकरी, महिला आदी घटकांना काही ना काही तरी देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला दिसतो. विरोधकांनी हा अर्थसंकल्प म्हणजे आश्‍वासनांची अतिवृष्टी असल्याची टीका केली तर सरकारने ते दिशाभूल करत असल्याचा उलटवार केला.

२१ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये, राज्यातील ५२ लाख कुटुंबांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर, राज्यातील दहा लाख युवकांना दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन, राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये अशा आश्वासनांची बरसात करण्यात आली.

राज्यावरील सात लाख ८२ हजार ९९१ कोटींचे कर्ज अधोरेखित करणारा एक लाख दहा हजार ३५५ कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी चालू आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो सादर केल्यानंतर त्यांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. पवार यांनी वित्त व नियोजनमंत्री म्हणून मार्च २०११ मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. आज त्यांनी सादर केलेला दहावा अर्थसंकल्प आहे.

वारकऱ्यांसाठी महामंडळ

वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीच्या जागतिक नामांकनासाठी ‘युनेस्को’कडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, ‘निर्मल वारी’साठी ३६ कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. २१ ते ६० वर्षे वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना’, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना, राज्यातील ५२ लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ जाहीर करण्यात आली.

‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा सरकारी आदेशही उशीरा राज्य सरकारने काढत या योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असणे गरजेचे आहे.

युवकांसाठी कार्यप्रशिक्षण

महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’, त्यांच्यासाठी १५ लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, फार्मसी, वैद्यकीय, शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती देणाऱ्या ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’चीही घोषणा यावेळी करण्यात आली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान

‘मुख्यमंत्री बळिराजा सवलत योजनें’तर्गत राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा, दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, नवी मुंबईत ‘महापे’ येथे ‘जेम्स अॅन्ड ज्वेलरी पार्क’ची निर्मिती, सिंधुदुर्ग येथे ६६ कोटींच्या आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा डायव्हिंग केंद्राची निर्मिती, बारी समाजासाठी ‘संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना, किल्ले रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन अशा विविध घोषणांचा या अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यात आला आहे.

पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार

पेट्रोल व डिझेल वरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या बदलामुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोल प्रतिलिटरमागे अंदाजे ६५ पैसे व डिझेल अंदाजे २ रुपये ७ पैसे स्वस्त होणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

अर्थमंत्री पवार म्हणाले, पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्यादृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर २४ टक्क्यांवरून २१ टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रतिलिटर पाच रुपये १२ पैसे वरून, २५ टक्के अधिक प्रतिलिटर पाच रुपये १२ पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच उद्योग व व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.

अभंगाने सुरूवात

अजित पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पी भाषणाची सुरूवात संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने केली.

उदंड पाहिले उदंड ऐकिले।

उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे।।

ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर।

ऐसा विटेवर देव कोठे।।

ऐसे संतजन ऐसे हरिचे दास।

ऐसा नामघोष सांगा कोठे।।

तुका म्हणें आम्हां अनाथाकारणें।

पंढरी निर्माण केली देवें।।

या अभंगाचा त्यांनी उल्लेख केला.

अशाही घोषणा

  • मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा

  • महिलांना रिक्षा व्यवसायासाठी मदत

  • ५२ लाख कुटुंबांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर

  • ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा

  • दहा लाख युवकांना दरमहा दहा हजार

  • ‘महापे’ येथे ‘जेम्स अॅन्ड ज्वेलरी पार्कची उभारणी करणार

  • वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना

  • सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्र

  • पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान

अशीही तरतूद (प्रमाण कोटी रुपयांत)

  • ६,१२,२९३ - एकूण तरतूद

  • ४,९९,४६३ - महसूली जमा

  • ५,१९,५१४ - महसूली खर्च

  • १,९२,००० - वार्षिक योजनांसाठी खर्च

  • २०,०५१ - महसुली तूट

  • १,१०,३५५ - राजकोषीय तूट

अडीच वर्षे त्यांनी ‘लाडला बेटा’ राबविली. औरंगजेब आणि याकूब मेमनला फादर मानले. त्यांना आता चादरीशिवाय काय दिसणार? विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्राला प्रगतिपथावर अग्रेसर करण्यासाठी अर्थसंकल्पातून योजना मांडल्या आहेत. त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी निधी उभारण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता आमच्यात आहे.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या दरडोई उत्पन्नात हा अर्थसंकल्प वाढ करेल. महाराष्ट्रात साडे आठ लाख नवे सौरकृषीउर्जा पंप तयार होणार आहेत. १८ महिन्यात साडेनऊहजार फीडर बसणार आहेत,

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

अजित पवार यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने जो काही त्यांना दणका दिला त्याने सत्ताधाऱ्यांचे डोळे थोडेसे किलकिले झालेले दिसत आहेत.

- उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT