मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात मविआ सरकार कोसळलं आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. दरम्यान महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नवीन सरकारबाबत एक मोठी बाब समोर आली आहे. शिंदे फडणवीस सरकारमधील तब्बल 75 टक्के मंत्र्यांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील 75 टक्के मंत्र्यांनी स्वत:वर गुन्हे असल्याचे उघड केले आहे.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या सर्व मंत्र्यांच्या स्व-प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले, त्यामधून ही माहिती समोर आली आहे.
या विश्लेषणानुसार, 15 (75 टक्के) मंत्र्यांनी स्वत:वर फौजदारी खटले जाहीर केले आहेत आणि 13 (65 टक्के) मंत्र्यांनी स्वत:वर गंभीर गुन्हे दाखल असल्याचे जाहीर केले आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वाधिक 18 गुन्हे दाखल झाले असून त्यात एका गंभीर प्रकरणाचा समावेश आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चार गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या अहवालानुसार, सर्व मंत्री कोट्यधीश आहेत आणि त्यांच्या मालमत्तेचे सरासरी मूल्य 47.45 कोटी रुपये आहे. एडीआरने म्हटले आहे की, सर्वाधिक घोषित एकूण संपत्ती असलेले मंत्री मलबार हिल मतदारसंघातील मंगल प्रभात लोढा आहेत, त्यांच्याकडे 441.65 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सर्वात कमी घोषित एकूण संपत्ती असलेले मंत्री पैठण मतदारसंघातील संदीपन आसाराम भुमरे हे आहेत, ज्यांची संपत्ती ही 2.92 कोटी इतकी आहे. दरम्यान राज्यातील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सध्या एकाही महिलेला स्थान दिलेले नाही.
शिंदेच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचे शिक्षण किती?
या अहवालात शिंदे-फडणवीस सरकरामधील मंत्र्यांच्या शिक्षणाबद्दल माहिती देखील देण्यात आली आहे. यात म्हटले आहे की आठ (40 टक्के) मंत्र्यांनी त्यांची शैक्षणिक पात्रता 10वी ते 12वी दरम्यान घोषित केली आहे, तर 11 (55 टक्के) यांनी पदवी किंवा त्याहून अधिक उत्तीर्ण असल्याचे घोषित केले आहे. एका मंत्र्याकडे डिप्लोमा आहे. चार मंत्र्यांचे वय 41 ते 50 वर्षे आणि उर्वरित मंत्र्यांचे वय हे 51 ते 70 वर्षे आहे.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा सत्तास्थापनेनंतर 40 दिवसांनी विस्तार करण्यात आला. ज्यामध्ये शिंदे गटातील आणि भाजपच्या प्रत्येकी 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली म्हणजेच एकूण 18 नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिंदे सरकारला टीकेला देखील सामोरे जावे लागले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.