History Of Maharashtrian Ornament Nath : मराठमोळं सौंदर्य म्हटलं की, नाकातली नथ ही आलीच पाहिजे. त्याशिवाय मराठी स्त्रीचा श्रृंगार अपूर्णच असतो. नाकात नथ आली की, स्त्रीच्या सौंदर्याला एक वेगळाच उठाव येतो. तिचं हे खुललेलं रुपच महाराष्ट्राची खरी ओळख असते.
वास्तविक नाकात घालण्यासाठी चमकी, नथनी असे अनेक दागिने आहेत. मात्र या सर्व नासिकाभूषणांमध्ये उठून दिसते ती नथच! नथीमुळे स्त्रीच्या सौंदर्यांमध्ये अधिकच भर पडते. 'नथ घालून नाक मुरडून दाखविण्यात एक वेगळीच मजा असते!'
पतीचं ऐश्वर्य म्हणून कधीकाळी या नथीचा नखरा मिरवला जायचा. जेवढा पती धनवान तेवढी जाड नथ असा जणू प्रतिष्ठेचा विषय झाला होता. पण तुम्हाला माहितीये का, ही मराठी सौंदर्यात भर घालणारी नथ आली कधी? नथीचा इतिहास जाणून घेऊया.
जुन्या साहित्याचा जर आढावा घेतला तर जाणून आश्चर्य वाटेल की, स्त्रीच्या केसापासून पायापर्यंत सौंदर्य आणि श्रृंगार, अलंकाराचं वर्णन करताना त्यात नथीचा उल्लेख आढळत नाही. संस्कृत वाङ्मयात देखील नायिकेच्या आपादमस्तक ल्यालेल्या अलंकारांचं वर्णन कवींनी केलेलं आहे, पण गंमत अशी की एकाही नासिकालंकाराचा त्यात उल्लेख नाही. ही आपली परंपरा नाही, याचा पुरावा देखील आहे. म्हणून, हे निःसंकोचपणे म्हणता येईल की स्त्रियांच्या नाकाला टोचणे आणि त्यात दागिने घालण्याची प्रथा नंतर नंतर सुरू झाली.
सुप्रसिद्ध इतिहासकार डॉ. भागवत शरण उपाध्याय एका ठिकाणी असे सांगतात की प्राचीन काळापासून जगभरात सांस्कृतिक देवाणघेवाण होत आहे आणि आज भारतीय वधूच्या नाकातील "नथ" ही या प्रक्रियेचाच परिणाम आहे.
नथ हा प्रकार ईजिप्तच्या रानटी टोळ्यांकडून अरबी लोकांकडे गेला. बायबलच्या 'ओल्ड टेस्टॅमेंट' मध्ये कर्णालंकार आणि नासिकालंकार या दोन्हीचे तुरळक उल्लेख आढळतात. काहीही असलं तरी हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातील वेगवेगळ्या संस्कृतीत नासिकालंकाराचं अस्तित्व हे गेल्या हजार वर्षांचच आहे. संस्कृतमध्ये इतके अलंकार सांगितले आहेत, पण त्यात नथीचा उल्लेख नाही.
तर, दुसरीकडे बर्याच इतिहासकारांचा असा दावा आहे की नथीचा उगम मध्यपूर्वेत झाला. एवढेच नव्हे तर मराठमोळी म्हणून नावाजलेली नथ मुस्लीम राजवटीत आली, असाही तर्क आहे. परंतु नथ ही 5000 वर्ष प्राचीन असल्याचा पुरावा आहे. ती देवी-देवतांच्या चित्रांमधून दिसते.
असे निश्चितपणे म्हणता येईल की 9 व्या आणि 10 व्या शतकात नथीची प्रथा वाढली आणि ती स्त्रीच्या वैवाहिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली. राजे, मंत्री आणि श्रीमंत कुटुंबातील बायका आपली संपत्ती आणि उच्च आर्थिक स्थिती दर्शविण्यासाठी मोती, नीलमणी आणि कुंदनसहित सोन्याची नथ परिधान करत. 15 व्या शतकात सोन्याच्या दागिन्यांच्या वापरामध्ये वाढ झाल्यामुळे नथींचे आकार आणि डिझाइनमध्ये वैविध्यपूर्णता आली होती.
भारतातील संस्कृती आणि प्रदेशानुसार नथींचे विविध प्रकार आहेत. महाराष्ट्रातील स्त्रिया सामान्यत: मोठी नथ घालतात. पंजाबी स्त्रिया नाकात सोन्याच्या तारेचे वलय घालतात. बंगाली स्त्रिया सेप्टम (नाकाच्या मधोमध) छेदन करून नथ घालण्यास प्राधान्य देतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.