इतिहासात अहंकारामुळे राजाचा रंक झाल्याच्या पुष्कळ कहाण्या आहेत. यामुळे अनेकांचे अस्तित्व संपुष्टात आले. अहंकार मग तो व्यक्तीला असो की संस्थेला किंवा एखाद्या पक्षाला. तो/ती वेळीच सावरले नाहीतर नुकसान अटळ. काहीजण बोध घेतात तर अनेकांना हे लक्षातच येत नाही किंवा लक्षात आलंय पण आम्हाला असंच राहायचंय या ताठर भूमिकेत असतात. मग अशा आडमुठ्या धोरणामुळं आपलं कितीही नुकसान झालं तरी चालेल म्हणजेच 'नवरा मेला तरी चालेल...पण सवत रंडकी झाली पाहिजे' ही भूमिका आत्मघातकी ठरु शकते, याकडे दुर्लक्ष केले जाते. याचा आणि प्रस्तुत लेखात येणाऱ्या मुद्द्यांचा परस्पर काहीच संबंध नाही, आणि संबंध आल्यास तो योगायोगच समजावा.
कितीही जण एकत्रित येऊन आमच्याविरोधात लढले तरी विजय आमचाच आहे, हे वक्तव्य करतानाचा जो आत्मविश्वास (?) होता, निकालानंतर तो कुठेच दिसला नाही आणि दिसणारही नव्हता. त्या आत्मविश्वाचे रुपांतर सगळे एकत्रित लढण्यापेक्षा एक-एकटे आमच्याविरोधात लढा मग बघा, यात झाले. हा यू-टर्न जबरदस्त होता. म्हणजे राजकारणात यू-टर्न वगैरे हे परवलीचे शब्द आहेत. हा यू-टर्न जास्त लक्षातही ठेवला जात नाही. पण यावरुन या वर्षभरात कितीवेळी यू-टर्न घ्यायची वेळ आली, हेही मोजावे लागणार आहे.
गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सहा जांगासाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीला (मविआ) मोठे यश मिळाले. मोठे यश यासाठी की आतापर्यंत ज्या मतदारसंघात अस्तित्व नव्हतं, जो मतदारसंघ वर्षानुवर्षे भाजपचा बालेकिल्ला होता त्या मतदारसंघात महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवारांनी दणक्यात विजय मिळवला. भाजपसाठी खरं तर ही चपराकच आहे. या निवडणुकीच्या निकालावरुन मविआची कामगिरी उल्लेखनीय राहिली असे म्हणता येणार नाही. पण भाजपने नकारात्मकरित्या निभावलेली विरोधी पक्षाची भूमिका कारणीभूत ठरल्याचे प्रथमदर्शनी वाटते. क्षमता असतानाही केवळ नकारात्मक आणि रडीचा डाव खेळला जात असल्याने हळूहळू जी प्रतिमा निर्माण होत आहे. त्याचाच फटका या निवडणुकीत बसल्याचे दिसते. पण हे मान्य करणार कोण ? ना नेते, ना कार्यकर्ते, ना तथाकथित समर्थक.
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची ताकद समजू शकलो नसल्याची प्रतिक्रिया दिल्याचे ऐकिवात आहे. पहिल्यांदाच त्यांनी अशाप्रकारची प्रतिक्रिया दिल्याचे दिसले. आता औत्सुक्य याचे आहे की, यापुढे तरी भाजप आपली रणनीती बदलणार का ?
आमचा एक तर आमदार आला पण शिवसेनेचा तर एकही नाही, असे भाजप नेते आता बोलत आहेत. आता अशा गोष्टी बोलूनच भाजप समाधान मानणार का, असा सवालही विचारला जात आहे. या निकालावरुन काहीही उलथापालथ होणार नाही, किंवा यावरुन पुढील भाष्यही करणे घाईचे ठरेल. पण भाजपने आपल्या रणनीतीवर विचार करण्यास या पराभवाने भाग पाडले असेल असे मानूयात.
तुम्ही आम्हाला 'देशद्रोही' म्हणा, आम्ही तुम्हाला 'महाराष्ट्रद्रोही' म्हणतो...हीच थीम सध्या जोरात आहे. नागरिकांचे खरे प्रश्न बाजूला पडले आहेत. सुशांतसिंह, अर्णव, कंगनासारखे प्रश्न ज्याचाशी सामान्यांचा काहीच संबंध नाही, याच्यावरच जोर दिला जात आहे. सोशल मीडियावर आपल्या पक्षाचं/नेत्याचं समर्थन करताना आपल्या देशाला/ राज्याला कमी लेखले जात आहे. कंगना राणौतने शेतकऱ्यांविरोधात भाष्य केल्यानंतर अभिनेता दिलजित दोसांजने तिचा विरोध केला. त्यावेळी संपूर्ण पंजाब त्याच्यामागे उभा राहिला. परंतु, सुशांतसिंह राजपूत, कंगणा राणौत आणि अर्णव गोस्वामी प्रकरणात महाराष्ट्रात दिसून आले नाही.
लोकांमधून नाराजी समोर येत आहे. पण कोणीच त्यांच्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही. मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष. खालची पातळी सर्वात आधी कोण गाठतो याचीच स्पर्धा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये लागली आहे. परंतु, यावेळी मतदारांनी कदाचित विरोधी पक्षांना या निवडणुकीतून सूचक इशाराच दिला आहे. 'ट्रॅक' बदला नाहीतर येणारा काळ कठीण आहे, असेच मतदार भाजपला पर्यायाने सत्ताधाऱ्यांनाही म्हणत असतील...
दृष्टीक्षेपात निकाल...
* नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड आणि अत्यंत सुरक्षित असा मतदारसंघ मानला जातो. गेल्या 58 वर्षांपासून या मतदारसंघात भाजपचा पराभव झालेला नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचे अनेकवर्षे नेतृत्त्व केलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस हेही या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत.
* नागपूरचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी सातत्याने वाद घालणारे महापौर संदीप जोशी यांना भाजपने उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांनी भाजपच्या गडाला सुरुंग लावला. कधी नव्हे या मतदारसंघातून विरोधी पक्षाचा उमेदवार निवडून आला. हा पराभव पक्षाचा की देवेंद्र फडणवीस यांचा की आपल्या आततायी राजकारणाचा हा विचार करावा लागणार आहे.
* पुणे पदवीधर मतदारसंघही भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील अशी मोठी परंपरा असलेला भाजपचा हा हक्काचा मतदारसंघ. संघटनेत मोठे नेते असले तरी त्याकाळी जनसामान्यांमध्ये जास्त प्रसिद्ध नसलेले चंद्रकांत पाटील हे या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. यावरुन भाजपची या मतदारसंघावरील पकड दिसून येते.
* चंद्रकांत पाटील आता सत्ताधाऱ्यांना एकएकटे लढण्याची भाषा करत असले तरी निवडणुकीपूर्वी त्यांनी वापरलेले शब्द विरोधकांना चिथावणी देणारेच होते. पण मविआच्या नेत्यांनी उभारलेली प्रचाराची फळी भाजपचा अतिआत्मविश्वास कमी करण्यास कारणीभूत ठरल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी भाजपच्या संग्राम देशमुख यांना पराभवाचे पाणी पाजले.
* औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी हॅटट्रीक केली. त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. त्याचप्रमाणे पुणे शिक्षक मतदारसंघात तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. येथे काँग्रेसचे जयंत आसगावकर हे निवडून आले.
* अमरावती शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार मविआचे श्रीकांत देशपांडे यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी बाजी मारली. किरण सरनाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निकटवर्तीय असल्याचे मानले जाते.
* धुळे स्थानिक स्वराज मतदासंघात भाजपचे अंबरिश पटेल हे निवडून आले. पटेल हे मुळचे काँग्रेसचे, त्यांनी पक्षाचा त्याग करुन भाजपत प्रवेश केला आणि निवडून आले. परंतु, हा भाजपचा विजय नव्हे तर पटेल यांचा वैयक्तिक विजय मानला जातो. कारण तेथील अनेक संस्थांवर पटेल यांचे वर्चस्व मानले जाते.
✍ दिग्विजय जिरगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.