नागपूर : राज्यासह शहरामध्ये देखील कोरोना आजारा संबंधित सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. तब्बल दोन वर्षानंतर होळी आणि धुलिवंदनाचा रंगोत्सव साजरा करण्यास नागपूरकर उत्सुक झाले आहे. मात्र, महागाईमुळे ‘धुलिवंदनाचा रंग फिकाच’ असे म्हणायची वेळ उत्साही नागरिकांवर आली आहे.
निर्बंध हटविण्यात आल्यामुळे ठोक बाजारपेठेत रंगाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने यंदा १० ते १५ रुपयांनी धुलिवंदनासाठीचा रंग महागला आहे. होळी हा सण तीन ते चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे इतवारी, महाल, बर्डी आदी प्रमुख बाजारपेठा गुलाल, रंग, पिचकारी आणि इतर साहित्यांनी फुलल्या आहेत. इतवारीतील ठोक व्यापाऱ्यानुसार आज ठोक बाजारपेठेत मध्यम दरात ३८ ते ४० रुपये प्रती किलो गुलाल विक्री होत आहे. तर, चांगल्या दर्जाचा गुलाल ६० रुपये किलोने विकला जात आहे. यात १२ विविध रंगात गुलाल उपलब्ध आहे.
महत्त्वाचे म्हणजे, यावर्षी किरकोळ व्यापाऱ्याकडून गुलालाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत बाजारपेठेत माल उपलब्ध नाही. त्यामुळे दर वाढलेले आहेत. तसेच ज्यापासून गुलाल तयार होता असा आरारोडच्या किमती वाढल्याच्याही परिणाम झाला आहे. त्यामुळे दोन वर्षापूर्वी आणि यंदाच्या किमतींमध्ये १० ते १५ रुपयांची वाढ झाली असल्याचेही व्यावसायिकाने सांगितले.
प्रयासमध्ये उत्सवाचेही नियोजन
कोरोनाचा धोका काही प्रमाणात टळल्यामुळे नागरिकांनी यंदा होळी निमित्त उत्सवाचे नियोजनही केले आहे. धरमपेठेतील भोले पेट्रोल पंपाजवळील विशेष मुलांच्या प्रयास शाळेमध्ये गुरवारी (ता. १७) दुपारी २ वाजता होळी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष मुलांचे मनोरंजन व्हावे या उद्देशाने आणि होळी सणाचे महत्त्व कळावे म्हणून हा उत्सव आयोजित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.