17 जिल्ह्यांमधील अजूनही 20 टक्के व्यक्ती लसीकरणापासून दूरच आहेत.
सोलापूर : राज्यातील पाच जिल्हे लसीकरणात पिछाडीवर असून गडचिरोली, हिंगोली, बीड, नांदेड व नंदूरबार हे जिल्हे लसीकरणात रेड झोनमध्ये आहेत. तर 17 जिल्ह्यांमधील अजूनही 20 टक्के व्यक्ती लसीकरणापासून दूरच आहेत. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधित लस टोचून घ्यावी म्हणून राज्य सरकारने प्रबोधनासह विविध बाबींवर जवळपास 110 कोटींचा खर्च केला आहे. आता आशासेविकांना प्रत्येक दहा घरांसाठी दोनशे रुपये देऊन लसीकरण वाढविण्याचा निर्णयही आरोग्य विभागाने घेतला आहे.
कोरोनाच्या दोन्ही लाटेतील अनुभवानंतर राज्य सरकारने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, प्रतिबंधित लसीकरणातून नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार व्हावी, या हेतूने लसीकरणावर भर दिला आहे. मुंबई, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, सातारा, गोंदिया, रत्नागिरी, कोल्हापूर, वर्धा, सांगली व चंद्रपूर या जिल्ह्यांमधील 87 ते 100 टक्के व्यक्तींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. अजूनही राज्यातील 18 वर्षांवरील दीडकोटी व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर दुसरीकडे दोन कोटी व्यक्तींनी दुसऱ्या डोसचा कालावधी पूर्ण करूनही तो घेतलेला नाही. त्यांना टार्गेट करून आरोग्य विभागाने माध्यमांद्वारे प्रबोधन, जनजागृती, लस टोचणारे, ऑनलाइन नोंदणी करणारे, इंटरनेट सेवा देणारे, आशासेविकांवर अंदाजित 110 कोटींचा खर्च केला आहे. लस न टोचणाऱ्यांवर आगामी काळात आणखी कडक निर्बंध घातले जातील, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
गडचिरोली, हिंगोली, बीड, नांदेड व नंदूरबार हे जिल्हे लसीकरणात पिछाडीवर असून 70 टक्क्यांपेक्षा कमी व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ठाणे, पालघर, औरंगाबाद, अमरावती, वाशिम, नाशिक, बुलढाणा, उस्मानाबाद, नगर, जालना, अकोला, सोलापूर, यवतमाळ, धुळे, परभणी, जळगाव व लातूर हे जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आहेत. त्या जिल्ह्यांमधील 80 टक्के व्यक्तींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
लसीकरणातून राज्यावरील कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. लस टोचणाऱ्यांना दररोज पाचशे, ऑनलाइन नोंदणी करणाऱ्यांनाही पाचशे रुपये आणि घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करणाऱ्या आशासेविकांना प्रत्येक कुटुंबासाठी 20 रुपयांप्रमाणे दररोज दहा कुटुंबांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्यातील जवळपास 30 हजार आशासेविकांच्या माध्यमातून डिसेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.