पुणे : राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यांमध्ये गेल्या पाच वर्षांत कुपोषित बालकांची घटलेली संख्या आणि कुपोषणाच्या वाढीचा घटलेले वेग या कामाची दखल थेट केंद्राने घेतली आहे. या निमित्ताने नीती आयोगाने राज्य सरकारने कौतुक करत एकात्मिक बाल विकास कार्यक्रमाच्या कामगिरीची प्रशंसा केली.
राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यांमध्ये मागील पाच वर्षांत कुपोषित बालकांच्या संख्या सातत्याने कमी झाली आहे. या १२ जिल्ह्यांमध्ये पाच वर्षांखालील कुपोषित बालकांची संख्या आणि त्याच्या वाढीचा वेग घटला आहे. २०१५-१६ ते २०१९-२० या वर्षांमधील आकडेवारीतून हा निष्कर्ष निघाला आहे. राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक सुधारणा नोंदवण्यात आली. तेथे कुपोषित बालकांच्या संख्या १२ टक्क्यांची कमी झाली. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधून कुपोषित बालकांच्या संख्येचे प्रमाण ४४.५ टक्क्यांवरून घटून ३२.५ टक्क्यांपर्यंत कमी झाले.
अहवालातील निष्कर्ष
एकात्मिक बाल कल्याण कार्यक्रमाचा गेल्या वर्षी जूनअखेर अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार राज्यातील सर्वांत चांगली स्थिती असणाऱ्या पहिल्या १२ जिल्ह्यांमध्ये पुण्यासह सांगली, उस्मानाबाद, रायगड, बुलडाणा, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, मुंबई शहर, लातूर आणि वाशीम जिल्ह्याचा समावेश आहे. तुलनेने अधिक कुपोषित बालके आढळून आलेल्या जिल्ह्यांमध्ये नंदूरबार, पालघर, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, नांदेड, परभणी, अमरावती, मुंबई उपनगर आणि वर्धा जिल्ह्याचा समावेश झाला.
कुपोषणाची सद्यःस्थिती
राज्याची कुपोषित बालकांची सरासरी १६.३४ टक्के आहे. तर, सहा वर्षे वयाखालील अतीकुपोषित बालकांचे प्रमाण ४ टक्के इतके आहे.
प्रमुख कारणे
पुरेसा आहार नसणे
सतत संसर्ग होणे
बाळाला आईचे दूध न मिळणे
पूरक अन्न किंवा पोषणाची सुरवात उशिरा करणे
आहारात प्रथिनांचा अभाव असणे
यामुळेही होते कुपोषण
आहारावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये आरोग्याची स्थिती, अन्नाविषयीचे समज, वैयक्तिक आवडीनिवडींचा आहारावरील परिणाम इत्यादी घटकदेखील कुपोषणाला कारणीभूत ठरत आहेत. कुपोषण होण्यामागे दुर्लक्ष, जेवणाच्या चुकीच्या वेळा, पुरेशा प्रमाणात जेवण न मिळणे आणि पालकांमध्ये आहाराविषयी जागृती नसणे यातून बालकांचे कुपोषण वाढते.
कुपोषणावर परिणाम करणारे घटक
विकसनशील देशांमध्ये बालकांच्या पोषणावर सामाजिक-आर्थिक स्थिती, डायरिया, श्वासनलिकेशी निगडित आजार, आईचे शिक्षण आणि पिण्याचे शुद्ध पाणी इत्यादी घटक परिणाम करत असतात.
कुपोषित बालकांमध्ये संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे अशा बालकांना डायरिया, मलेरिया आणि श्वासनलिकेशी संबंधित संसर्ग इत्यादी आजार अधिक प्रमाणात होतात.
बालकांना सुरवातीच्या टप्प्यात पोषण न मिळाल्यामुळे झालेल्या कुपोषणाचा भविष्यातील त्याच्या शारीरिक वाढीवर आणि व्यक्तिमत्त्व विकासावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होतो.
‘’उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक काम झाले आहे. या जिल्ह्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आणि त्यासाठी नियोजनपूर्वक पावले उचलली. संबंधिक काम करणारे मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी नोकरभरती, कामाची देखरेख, पोषण आहाराच्या योजना यावर सातत्याने भर देण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम होत उस्मानाबाद जिल्ह्यात चांगली कामगिरी झाली आहे. इतर जिल्ह्यांमधील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत.”
- रूबल अग्रवाल, आयुक्त, एकात्मिक बाल कल्याण कार्यक्रम, महाराष्ट्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.