Maharashtra Politics: गेल्यावर्षी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाविरोधात त्यांच्याच पक्षातील आमदारांनी बंड पुकारलं. आणि महाविकास आघाडी प्रेरीत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे युती सरकार कोसळलं. गेल्या काही दिवसात शिवसेनेने उभ्या आयुष्यात कधीही पाहिल्या नाहीत अशा गोष्टींचा सामना करावा लागला आहे.
शिवसेनेतील महत्त्वाची व्यक्ती सोडून गेल्याची हि काही पहिली वेळ नव्हती. या आधी खुद्द बाळासाहेब यांनीच शिवसेनेला रामराम ठोकला होता. त्यांनी आमदारकीचा राजिनामाही दिला होता. जेष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी आपल्या जय महाराष्ट्र या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे. आज बाळासाहेबांची पुण्यतिथी त्यामूळेच त्यांच्या जीवनातील या महत्त्वाच्या किस्स्याबद्दल जाणून घेऊयात.
राजकारणात तळपते आणि रोखठोक आक्रमक विचार मांडणारे पण प्रत्यक्षात मात्र खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल असलेले मराठी शिवसैनिकांचे दैवत स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांची आज पूण्यतिथी आहे. बाळासाहेबांनी महाराष्ट्रातील मराठी भाषिक लोकांना संघटित करण्यासाठी संयुक्त मराठी चळवळ मध्ये प्रमुख भूमिका बजावली.
बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात केशव ठाकरे यांच्या पोटी झाला होता. त्यांचे वडील एक पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते जे जातिव्यवस्थेचे कट्टर विरोधक होते. बाळासाहेबांचा विवाह मीना ठाकरे यांच्याशी झाला होता. त्यांच्यापासून त्यांना बिंदुमाधव, जयदेव आणि उद्धव ठाकरे असे तीन पुत्र झाले.
फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. १९६० मध्ये ‘फ्री प्रेस’मधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून बाळासाहेबांनी स्वत:चे मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले.
व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या प्रश्नासाठी 1966 मध्ये शिवसेना पक्ष स्थापन केला. आणि ते शिवसेना प्रमुख बनले. त्यांच्यासोबत लाखो कार्यकर्ते जोडले गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला.
शिवसेनेच्या सुरवातीच्या काळात बळवंत मंत्री, माधव देशपांडे, श्याम देशमुख हे तर नंतर थोड्याच दिवसात मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी , छगन भुजबळ हे शिवसेनेचे नेते होते. दिवसेंदिवस शिवसेना मोठा पक्ष बनत होता. तसा दबक्या आवाजात बाळासाहेबांच्या हुकूमशाही विरुद्ध आवाज निर्माण होऊ लागला. पण बाळासाहेबांचा शब्दच आदेश मानणारे लाखो कार्यकर्ते होते आणि आजही आहेत.
साधारण 1985 नंतर शिवसेनेत ठाकरेंच्या नव्या पिढीचा सहभाग वाढला. बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे आणि चिरंजीव उद्धव ठाकरे सुद्धा संघटनेमध्ये सक्रिय झाले होते. याच कारणामुळे जुने कार्यकर्ते अस्वस्थ होवू लागले.
अशातच 1990 च्या निवडणूकीत प्रचारात जोर लावून देखील शिवसेनेच्या पदरी अपयश आलं. त्यानंतर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली. यामूळे शिवसेनेत धुमसत असलेले भांडण चव्हाट्यावर आलं. त्यावेळी बाळासाहेबांवर आरोप करण्यात आला की, ते शिवसेनेत घराणेशाही आणत आहेत. असा खुला आरोप माधव देशापांडे यांनी केला. ते असे ही म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या जोरावर उभ्या असलेल्या शिवसेनेचा विनाश बाळासाहेब करत आहेत. हा आरोप सहन न झाल्याने बाळासाहेबांनी राजिनामा दिला.
त्यानंतर त्यांनी काही दिवस बाळासाहेब शांत राहिले. आणि त्यांनी सामनानधून एक अग्रलेख लिहीला. तो वाचून अनेक कार्यकर्ते रडले. भराभर मातोश्रीसमोर कार्यकर्ते जमू लागले. आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी बाळासाहेबांनी सभा घेतली. त्या सभेला अलोट गर्दी जमली होती.
बाळासाहेबांना जीवनात अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले. मग ते राज ठाकरे यांचे पक्ष सोडणे असो किंवा अनेक मोठ्या नेत्यांनी केलेला बंड असो. या सगळ्यात जीवाला जीव देणारे कार्यकर्त्येच बाळासाहेब आणि शिवसेनेची ताकद होती आणि राहतील. असे असले तरी त्यांच्यावर कार्यकर्त्यांची असलेली निष्ठा कधीही कमी झाली नाही. आजही अनेक देवघरात त्यांचे फोटो आहेत.
शिवसैनिकांच्या जीवनातील वाईट दिवस म्हणून गणला जाईल असा हा 17 नोव्हेंबर 2012 रोजीचा दिवस. याच दिवशी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.बाळासाहेबांच्या शेवटच्या सभेत ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांशी बोलले होते. त्यावेळी माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा अशी सादही त्यांनी घातली होती. ते पाहुनही अनेक कार्यकर्त्यांना आश्रू अनावर झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.