शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेच्या आमदारांसह शिंदे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. शिवसेनेचे निम्म्याहून अधिक मंत्री शिंदे गटात गेले आहेत. तर या गटाकडे आमदारांचा ओढा कायम आहे. अनेक अपक्षांचाही शिंदेंना पाठिंबा आहे. या सगळ्यांसह आता शिंदे राज्यपालांना संख्याबळाबद्दलचं पत्र देणार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षांच्या आता आपापल्या नेत्यांसोबत सतत बैठका सुरू आहेत. (Maharashtra Politics Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray live updates)
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मुंबईच्या बाहेर पडले असून ते दिल्लीला किंवा मुंबईला रवाना होण्याची चिन्हे दिसत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी खुर्चीचा मोह नाही तरीही त्यांनी बंडखोरी केली, त्यांना घातपात झाला की कळेल. त्यांनी स्वत:च त्यांच्या परतीचे मार्ग बंद केले आहेत. त्यांना शिवसेनेचा भगवा सोडून पळावं लागेल.
ते आता कमळाबाईकडे जाणार आहेत पण येत्या ४ दिवसांत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. कारण कायदेशीर लढाई आता चालू झाली आहे. ते बरोबर कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.
आमदारांच्या अपात्रतेबाबत या नोटीसा पाठवण्यात येणार असून शिवसेना नेते आणि विधीमंडळ सभापती यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पुढील ४८ तासांत बंडखोर आमदारांना त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे.
ज्यांनी आपल्याला आव्हाने दिले त्यांचे आव्हानं आपण संपवून पुढे जात राहिलो.
आपल्यामध्ये गद्दारांची औलाद नको असं म्हटलं होतं ते आता समोर आले आहेत. पाठीत खंजीर खुपसणारे आपले लोकं आहेत.
लोकं म्हणाले राष्ट्रवादी, काँग्रेस हे विष आहे तर आम्ही राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन विष प्राषण केलं आहे पण ते आपल्यासोबत राहणारच आहेत.
पक्षाने दिलेले उमेदवार निवडून आणले ही निष्ठा तुम्ही दाखवली आहे. आमदार, नगरसेवक निवडून आणणे हेच आपले वैभव.
एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की राष्ट्रवादी आपल्याला त्रास देते, आमदार म्हणतात की आपण भाजपसोबत गेले पाहिजे. पण मी त्यांना म्हणालो की भाजपने आपला विश्वासघात केलाय.
भाजपकडून व्यवस्थित सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव येऊ द्या असं मी शिंदे यांना म्हटलं होतं पण ते थांबले नाहीत.
मला मुख्यमंत्री पदाचा मोह नाही, ते पद मला दुय्यम आहे, ते मी भोगलंच नाही कारण मी त्यावेळी आजारी होतो.
शिवसैनिकांना मी मान्य नसेल तर मी माझं पद मोकळं करतो. मी सरकार चालवण्यास अपयशी ठरत असेल तर तसं सांगा.
अनेक लोकांना तिथे डांबून ठेवलंय, पण खरी परिस्थिती दाखवली जात नाही. हा भाजपचा खेळ आहे पण त्यांना हे कळत नाही. आता त्यांच्याकडे भाजपशिवाय पर्याय नाही. आज तिकडे गेलेले परत निवडून येणार नाहीत. भाजपचा शिवसेना संपवण्याचा डाव आहे.
मला आजारपण आलं म्हणून मी त्यांना भेटू शकलो नाही म्हणून तुम्ही हे बंड केलं.
या बंडाच्या पाठीमागे मी नाही. मी कधीच माझ्या शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही.
तुम्ही निवडून आलेल्यांना फोडू शकाल पण जिंकून फोडून दाखवा. मी कुणालाही कुणाचा मुलगा म्हणून उमेदवारी दिली नाही.
शिवसेना एक विचार आहे तो कुणी संपवू शकत नाही पण भाजप तो विचार संपवण्याचा प्रयत्न करत आहे.
माझं वैभव तुम्ही आहात. शिवसेनाप्रमुखांनी जोडून दिलेले लोकं हे माझं वैभव आहे. हा शिवसेना परिवार आहे.
जे आपल्यात आहेत ते आपले जे आपल्यात नाहीत ते आपले विरोधक. त्यांना बंड करण्याचा अधिकार आहेत पण साहेब आजारी असताना त्यांनी यावेळचा गैरफायदा घेतला.
बंड केलेले आमदार परतले तर त्यांना शिवसेनेत घेऊया.
देशभर उद्धव ठाकरे यांच्या कार्याचं कौतुक होतंय. राजकीय नव्हे तर सामान्य लोकांकडून कौतुक होतंय. आत्तापर्यंतच्या सर्व्हेत तेच पहिल्या क्रमांकावर राहिले आहेत.
आयपीएलसारखे प्राईस टॅगसारखे लोकं आपल्याला नको आहेत. जे सोडून गेले त्यांचा विचार करायचा नाही. आपण प्रत्येत लढाई आता जिंकण्यासाठी करायची.
शिंदे यांच्या गटाला कायदेशीर कारवाई टाळायची असेल तर विलीनीकरण हाच पर्याय आहे, कारण कायद्यानुसार वेगळा गट स्थापन करता येत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे.
बच्चू कडू यांना या बंडाची कल्पना आधीच होती, विधानपरिषदेच्या मतदानादिवशी त्यांना या बंडाची कल्पना होती. आमचाच मुख्यमंत्री होणार असं ते बोलले होते.
विधानसभा उपाध्यक्ष यांच्यावर शिंदे गटाने अविश्वास ठराव आणल्यानतंर ते आज तब्बल ४ तास विधानभवनात होते.
शिवसेना पक्ष कार्यकारिणीची बैठक उद्या शिवसेना भवन येथे बोलावण्यात आली आहे. ही बैठक उद्या दुपारी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधणार आहेत.
शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमली आहे. शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी केली जात आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात शिंदे गट अविश्वास ठराव आणणार आहेत. कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर हा सल्ला घेण्यात आला आहे.
राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्य कारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच मंत्रालयातील विविध विभागांच्या सचिवांच्या बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा घेतला.
कोरोना, पेरण्या, खतांची उपलब्धता त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन तयारी, आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सुविधा याविषयी महत्वाच्या सूचनाही केल्या आहेत. जनतेशी संबंधित महत्वाची कामे थांबवून ठेऊ नका , ती थेट तातडीने माझ्याकडे घेऊन या असेही त्यांनी निर्देश दिले.
९१ जिल्हाप्रमुखांपैकी ८५ जिल्हाप्रमुख मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. तर दोन जण आजारी असल्याने त्यांना येता आलं नाही. त्यामुळे या बैठकीला १०० टक्के संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुख उपस्थित होते अशी माहिती शिवसेनेचे विनायक राऊत यांनी दिली.
शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली असून बोर्डाची तोडफोड करण्यात आली आहे. तर दिलीप लांडे यांचे पोस्टर्स फाडण्यात आले आहे.
आमच्या संकटकाळात शिवसेनेने आमची विचारपूस केली नाही. आम्ही बंडखोरी केली नाही. शिवसैनिक म्हणूनच आम्ही जीव सोडू, आम्ही शिवसेनेतंच आहोत पण आम्हाला निर्णयाची वेळ का येत आहे हे कळत नाही असं शिवसेना आमदार यामिनी जाधव म्हणाल्या आहेत.
आमच्याकडे जास्त संख्याबळ आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाची भूमिका चुकीची आहे पण अद्याप आम्ही पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतलेला नाही असं शिंदे म्हणाले आहेत. तसेच शिवसेनेची आमदारकी रद्द करण्याची मागणी बेकायदेशीर आहे, कितीही नोटीसा पाठवल्या तरी आम्ही घाबरणार नाही, आम्ही कायद्याने काम करतोय. शिवसेनेचे ४० अपक्ष मिळून ५० आमदार माझ्यासोबत आहेत असं ते म्हणाले.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे विधानभवनात दाखल झाले आहेत. बंडखोर आमदार यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीवर ते विचार करणार आहेत.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वी अविश्वासाचा ठराव मांडला आहे.
एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि नाव मिळणार नाही असं शिवसेनेच्या निलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. दरम्यान त्यांनी संविधानाचे नियम वाचून दाखवले आहेत. शिंदे गटाला भाजप किंवा प्रहार संघटनेत विलीन व्हावं लागेल, त्यांना वेगळा गट स्थापन करत येणार नाही हा राज्यघटनेतील १० व्या परिशिष्ठातील नियम आहे असं वक्तव्य निलम गोऱ्हे यांनी केलं आहे.
आम्ही सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करत असून आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यांच्या पाठीशी आम्ही कायम उभे आहोत. उद्धव ठाकरे यांचं सध्याच्या परिस्थितीवर काय म्हणणे आहे ते आम्ही जाणून घेणार आहोत. जयंत पाटील आणि आम्ही त्यांची भेट घेऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
बंडखोरी केलेले आमदार सेनेचे असतील तर आमच्याकडे बहुमत आहे असं ते म्हणाले. विधीमंडळाबाबत अध्यक्ष निर्णय घेतील असंही ते म्हणाले.
कालच्या शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, ते बोलले तर मी काही बोलत नाही, त्यांच्यानंतर बोलायला माझी लायकी नाही, मी महाराष्ट्रापुरतं बघतो ते बाहेरचं बघतात असं ते म्हणाले आहेत.
शिंदे गटाच्या आमदारांची आज सायंकाळी बैठक होणार आहे. त्याआधी शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. ते कशासाठी रवाना झाले आहेत आणि कुणाला भेटणार आहेत याची माहिती समोर आली नाही. दरम्यान महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडील खाते अजून काढून घेतलेले नाही म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम असे दोन महत्त्वाचे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत.
या गोष्टी होणारच होत्या, ही आघाडी फार काळ टिकणार नव्हती कारण ती अनैसर्गिक आघाडी होती. शिवसेनेने तेव्हाच निर्णय घेतला असता तर आघाडी झाली नसती पण शिवसेनेने ऐकलं नाही.
धमकी देणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवणार आहोत, पण कुणाचं नाव घेऊन तोंडाची चव नाही घालवणार असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांशी संवाद साधल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत आणि शिंदे गटाविरूद्ध घोषणाबाजी करू लागले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद, काय म्हणाले वाचा
जिल्हा आणि तालुकाप्रमुखांशी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधला
मला सत्तेचा लोभ नाही आणि कशाचाच मोह नाही.. वर्षा सोडून मातोश्रीवर आलोय, पण जिद्द कायम आहे. आणि आत्ताही मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे.
स्वप्नात देखील विचार केला नव्हता की, सोबतचे असे वागतील
कोरोनामुळे डोळ्यात पाणी ते अश्रू नव्हते.
मी बरा होऊ ने म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते
मला वाटलं सीएम पदाची खुर्ची हलतेय... पण ते मानेचं दुखणं होतं.
शरीराचे काही भाग बंद पडत होते, त्यामुळे दोन वेळा ऑपरेशन करण्याची वेळ आली होती. मी अजून जिद्द सोडली नाही, जिद्द अजून कायम आहे.
माझं नाव, माझा फोटो आणि शिवसेना हे नाव न वापरत जगून दाखवा, तुमच्याकडून शिवसेना फोडण्याचं पाप झालंय. तुकडे तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा. मी बाळासाहेबांचे फोटो वापरून ब्लॅकमेल करत नाही.
भाजपसोबत जायला पाहिजे म्हणून काहींचा दबाव आहे पण मी शांत आहे षंढ नाही.
संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप होऊनही मी त्यांना सांभाळलं.
आदित्यला बडवे म्हणायचे आणि स्वत:चा पोरगा खासदार, त्यांना काय कमी केलं? नगरविकास खातं त्यांच्याकडं दिलं, अजून काय हवं होतं? हे सारं भाजपने केलंय, त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल.
बाळासाहेबांचं माझ्याहूनही लाडकं आपत्य म्हणजे - शिवसेना
मला या गोष्टींचा वीट आलाय पण हीच वीट डोक्यात हाणणार
मी बाळासाहेबांचा मुलगा आहे हे विसरून जा आणि शिवसेना पुढे घेऊन जा, तुम्ही समर्थ आहात.
नाशिकमध्ये संतापलेल्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरवरील फोटोवर काळी शाई फेकली आहे. तसंच अंडीही फेकली आहे.
एकनाथ शिंदे हॉटेल रेडिसन बाहेर पडले आहेत. ते एअरपोर्ट कडे जाणाऱ्या मार्गाने गेले आहेत. मात्र नेमके कुठे गेले याची माहिती नाही. सोबत आमदार नाहीत, सर्व आमदार हॉटेल मध्येच थांबले आहेत.
शिवसेनेने १२ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती. आता याच १२ जणांमध्ये आणखी पाच जणांची भर पडली आहे. खालील आमदारांचं निलंबन करा, अशी मागणी सेनेकडून जोर धरू लागली आहे. याबाबत शिवसेना लवकरच अर्जही दाखल करणार आहे.
सदा सरवणकर
प्रकाश आबिटकर
संजय रयमुळकर
बालाजी कल्याणकर
रमेश बोरनारे
दरम्यान, काही वेळापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर मविआ सरकार आणखी अडीच वर्षे पूर्ण करणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच आमचा सामना करण्यासाठी मुंबईत या आम्ही तयार आहोत, असं आव्हानही राऊतांनी शिंदे गटाला दिलं आहे.
शिवसेनेच्या १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीहून मुंबईत दाखल झाले असून आशिष शेलार यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. चर्चेदरम्यानची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. या सगळ्यामुळे आता राज्यातली राजकीय परिस्थिती आणि सत्तेचा पेच आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकशाहीत आकड्यांना महत्त्व असतं आणि आमच्याकडे ५० हून अधिक आमदार आहेत, असा दावा शिंदेंनी केला आहे. सेनेचे ४० आणि अपक्ष १२ असं संख्याबळ आपल्याकडे असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.
शरद पवारांना नारायण राणेंची धमकी!
महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही .रस्त्यात अडवू.अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो.ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल..पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही, असं ट्वीट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
भाई, परत चला; गुवाहाटीत शिवसैनिकाचं शिंदेंना भावनिक आवाहन
शिवसेनेचे सातारा उपजिल्हाप्रमुख संजय भोसले गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे राहत असलेल्या हॉटेलसमोर तो एक पोस्टर घेऊन उभे आहेत. "एकनाथ शिंदे (भाई), मातोश्रीवर परत चला. उद्धवजी, आदित्यजींना साथ द्या". त्यांना आता गुवाहाटी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
शिंदेंचा मार्ग मोकळा; 37 आमदारांच्या सह्यांचं पत्र पोहोचलं
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यातून आता अधिकृतरित्या सुटका होण्याची शक्यता आहे. कारण या कायद्याच्या नियमानुसार कारवाई होऊ नये यासाठी लागणाऱ्या दोन तृतीयांश शिवसेना आमदारांच्या सह्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे एकूण ५५ आमदार असून पक्षातून वेगळा गट स्थापन करायचा असल्यास किमान दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ पाठीशी असावे लागते. त्यासाठी शिंदे यांना ३७ आमदारांची गरज होती ती आता पूर्ण झाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आसामच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले..
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की, नाही हे मला माहीत नाही. इतर राज्यातील आमदारही आसाममध्ये येऊन राहू शकतात, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ते पुढं म्हणाले, पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकतं. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडं कोणतीही माहिती नाही, असंही त्यांनी शेवटी नमूद केलं.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक आज दुपारी १२ वाजता शिवसेना भवनात होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.